सातारा Satara Crime News : महाराष्ट्राचं मिनी काश्मीर असलेल्या महाबळेश्वरमध्ये (Mahabaleshwar) हरणाच्या शिकारीची घटना उघडकीस आलीय. स्थानिक शिकाऱ्यांनी बंदुकीनं पिसोरी हरणाची शिकार केलीय. याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे. शिकाऱ्यांकडून गावठी बंदूक, वाघर, कोयता आणि मृत पिसोरी हरीण, असा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय.
रात्रगस्तीवेळी शिकारी सापडले तावडीत : साताऱ्याचे सहाय्यक वनसंरक्षक, मेढा आणि महाबळेश्वरचे वनपरिक्षेत्र अधिकारी हे रविवारी कर्मचाऱ्यांसोबत रात्रगस्तीवर होते. महाबळेश्वरातील मोळेश्वर फाटा- सह्याद्री नगर (राजमार्ग) रस्त्यावर राखीव वनातील फॉ. कं. नं. 284 मध्ये दोन जण संशयितरित्या आढळून आले. अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडील पिशवी ताब्यात घेतली. पिशवी पाहिली असता वाघर, कोयता, काडतूस सापडलं. त्यांची कसून चौकशी केली असता, त्यांनी शिकार केल्याची कबुली दिली. तसेच शिकारीमध्ये आणखी दोन साथीदारांचा सहभाग असल्याचंही सांगितलं.
शिकारीचं साहित्य जप्त, चौघांवर गुन्हा दाखल : संशयितांकडून शिकारीसाठी वापरण्यात आलेली गावठी बंदुक, काडतूस, कोयता, वाघर आणि बंदुकीने मारलेले पिसोरी हरीण जप्त करण्यात आलंय. याप्रकरणी शिवाजी चंद्रकात शिंदे, आदित्य दीपक शिंदे, दीपक शंकर शिंदे (तिघेही रा. कुरोशी ता. महाबळेश्वर) आणि गणेश कोंडिबा कदम (रा. गोगवे, ता. महाबळेश्वर) यांच्यावर वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, 1972 चे कलम 9,39,50 व 51 नुसार गुन्हा नोंद करण्यात आलाय.
या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी केली कारवाई : साताऱ्याच्या उपवनसंरक्षक आदिती भारद्वाज यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक (वनीकरण) महेश झांजुर्णे, महाबळेश्वरचे वनपरिक्षेत्र अधिकारी गणेश महांगडे, मेढा वनपरिक्षेत्र अधिकारी अर्जुन गंबरे, वनपाल निलेश रजपूत, अर्चना शिंदे, वनरक्षक रमेश गडदे, अभिनंदन सावंत, लहू राऊत, स्वप्नील चौगुले, राहुल धुमाळ, स्नेहल शिंगाडे, संगिता शेळके, संदीप पाटोळे यांनी ही कारवाई केली. या गुन्ह्याचा तपास वनपरिक्षेत्र अधिकारी गणेश महांगडे करत आहेत.
हेही वाचा -
- ग्रीन कार्डच्या हव्यासापोटी मित्रांबरोबर अदला-बदली करण्याची बळजबरी, अमेरिकेहून परत येताच महिलेची पतीविरोधात तक्रार - Meerut Wife Swapping Case
- तालिबानपेक्षाही भयंकर! पंजाबमध्ये महिलेला विवस्त्र करत काढली धिंड, काय आहे संपूर्ण प्रकरण - NAKED PARADE women punjab
- मागासवर्गीय कामगाराचं अपहरण करुन मारहाण केल्याप्रकरणी दोघांना अटक, मुख्य आरोपीसह 4 फरार - Latur Crime News