नागपूर Nagpur Crime News : शहरातील एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत राहणाऱ्या महिलेने लिव्ह इन संबंधातुन जन्मलेल्या मुलीचा गळा आवळून हत्या केली. त्यानंतर त्या महिलेने मुलीचा मृतदेहासह पोलीस स्टेशन गाठले आणि आपल्या गुन्ह्याची कबुली दिलेली आहे. ट्वींकल रामा राउत असे महिलेचे नाव आहे. महिलेच्या लिव्ह इन पार्टनरच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसांनी त्या महिलेला अटक करून तपास सुरू केला आहे.
काय आहे प्रकरण? : आरोपी महिला ट्वींकल रामा राउत ही गेल्या ४ वर्षांपासून एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीतील एस.के पेपर प्रॉडक्ट कंपनीच्या आवारात लिव्ह इन पार्टनरसोबत राहत होती. ट्वींकल आणि रामा दोघेही भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथील असून ते नातेवाईक आहेत. गेल्या ४ वर्षांपासून सोबत राहात होते, त्यांना तीन वर्षांनी मुलगी देखील होती. मात्र,ट्वींकल आणि रामाचे वाद होऊ लागले होते. त्या रागातून ट्वींकलने रात्री उशिरा मुलीचा गळा आवळून हत्या केली व थेट पोलीस ठाण्यात जाऊन मुलीच्या हत्येची बाब पोलिसांना सांगितली. पोलिसांनी आरोपी ट्वींकला ताब्यात घेतले आणि मुलीला वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी मुलीला मृत घोषित केले आहे. त्यानंतर पोलिसांनी महिलेचा लिव्ह इन पार्टनर रामा राउत यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.
ट्वींकल घ्यायची रामाच्या चारित्र्यावर संशय : रामा व ट्वींकल हे मागील ४ वर्षापासुन सोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. त्यांना एक मुलगी होती. काही दिवसांपासून रामा आणि ट्वींकलचे आपसात पटत नव्हते. दोघे एकमेकांवर संशय घेत असल्याने त्यांच्यात रोजच्या रोज भांडण व्हायचे. सोमवारीही त्यांच्यात भांडण झाले. त्यानंतर रागाच्या भरात ट्वींकलने मुलीला अमर नगरकडे जाणाऱ्या रोडवरील एका झाडाखाली नेऊन हत्या केली.