मुंबई Lok Sabha Election Results 2024 : मी प्रदेशाध्यक्ष पदाची सुत्रे हाती घेतली तेव्हाच कॉंग्रेसला महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकावर आणण्याचे ध्येय समोर ठेवले होते. महाराष्ट्रातील जनतेने आम्हाला साथ दिली व कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी साथ दिली. त्यामुळे कॉंग्रेस पक्ष राज्यात प्रथम क्रमांकावर आला आहे. त्याचा आनंद आहे, असं मत कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केलं. पटोले यांनी महाराष्ट्रातील तरुणांचे, शेतकऱ्यांचे, गरीबांचे कॉंग्रेस पक्षातर्फे मनापासून आभार व्यक्त केले.
लोकशाहीत प्रत्येकाला मताचा अधिकार : देशात परिवर्तनाची लाट आली त्याचे नेतृत्व राहुल गांधींनी केले. मोदी सरकार विरोधात जनतेची लढाई होती. या लढाईला खऱ्या अर्थाने राहुल गांधींनी वाचा फोडली. कन्याकुमारी ते काश्मीर भारत जोडो यात्रा व मणिपूर ते मुंबई अशी न्याय यात्रा काढली हे त्याचे फलित आहे. मोदींशिवाय कोणीही नेता प्रभावशाली राहू शकत नाही, असा विचार रुजवला जात होता. लोकशाहीत प्रत्येकाला मताचा अधिकार दिला आहे. त्या मताच्या आधारे सत्तेचा गर्व करणाऱ्यांना सत्तेबाहेर काढण्याचे काम जनतेने केले आहे. माझ्यापेक्षा कोणीही मोठा नाही असा विचार असणाऱ्यांना परिवर्तन करून दाखवले आहे. असंविधानिक व्यवस्था चालू शकणार नाही ही शिकवण दिली, असे पटोले म्हणाले. पत्रकार परिषदेला खासदार चंद्रकांत हंडोरे, माजी मंत्री आरिफ नसीम खान उपस्थित होते.
गुणवत्तेवर निर्णय व्हावा हीच भूमिका : जनतेपेक्षा देशात कोणीही मोठा नाही, हे लोकशाहीने समजावून सांगितले आहे. या परिवर्तनात सहभागी झालेल्या सर्वांचे आभार पटोले यांनी व्यक्त केले. हा विजय खऱ्या अर्थाने कार्यकर्त्यांचा, जनतेचा आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या अधिकाराने नरेंद्र मोदी यांच्या हुकूमशाही प्रवृत्तीला मतांच्या अधिकाराने खुर्चीवरून खाली खेचले, असे पटोले म्हणाले. आगामी चार महिन्यांनी राज्यात विधानसभेच्या निवडणुका आहेत. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार एकत्रित आणण्याचे आमचे ध्येय आहे. जागावाटपात ज्या गडबडी होतात त्याचा अंदाज घेऊन गुणवत्तेवर निर्णय व्हावा अशी आमची भूमिका होती, असं नाना पटोले म्हणाले.
भाजपामध्ये खेला होईल : जे झाले त्यावर आता चर्चा नको. विधानसभेला एकत्रित बसून चांगला निर्णय घेऊ असा मला विश्वास आहे. जाहिरातीच्या माध्यमातून प्रतिमा तयार करण्याचा प्रयत्न भाजपा सरकारने केला; मात्र जनतेने त्यांना योग्य प्रतिसाद दिल्याचे पटोले म्हणाले. राहुल गांधींनी दिलेली आश्वासने हमीसह देण्यात आलेली आहेत. त्यामुळे ती निश्चितपणे पूर्ण होतील. नरेंद्र मोदींची आश्वासने जुमलेबाज होती. हा फरक देशातील जनतेने ओळखला म्हणून परिवर्तन घडवले. भाजपामध्ये आता रात्री खेला होईल, असा टोलाही कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले त्यांनी लगावला.
भाजपाने तिजोऱ्या लुटण्याचे काम केले : प्रशासक आणि सरकारच्या माध्यमातून राज्यकारभार करण्याचे पाप भाजपाने केले. त्याचा फटका त्यांना बसला आहे. सरकारने केलेल्या भ्रष्ट्राचाराची प्रकरणे आम्ही कागदपत्रांसोबत जनतेसमोर आणणार आहोत. महापालिका, जिल्हा परिषदांच्या तिजोऱ्या भाजपाने लुटण्याचे काम केले आहे ते आम्ही सर्वांसमोर आणू, असा इशारा नाना पटोले यांनी यावेळी दिला.
हेही वाचा :
- लोकसभा निवडणुकीच्या निकालावर शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले... - sharad pawar news
- अजित पवारांना 'दे धक्का'! बारामतीत सुप्रिया सुळेंचाच डंका, तब्बल दीड लाखानं नणंदबाईंना हरवलं - Baramati Lok Sabha Results 2024
- राज्यातील महाविकास आघाडीनं एनडीएचं वाढविलं टेन्शनं, वाचा विजयी उमेदवारांची यादी - maharashtra lok sabha 2024 winner list