मुंबई Raj Thackeray Condition : राज्यात २० मे रोजी पाचव्या आणि अंतिम टप्प्यात १३ जागांसाठी मतदान होत असून मुंबईतील ६ जागांचा यामध्ये समावेश आहे. याकरता आज महायुतीतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत शिवाजी पार्कवर महासभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मुंबईतील महायुतीचे सर्व ६ उमेदवार व महायुतीचे अनेक नेते उपस्थित होते.
मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री उद्धव ठाकरेवर बरसले : २०२४च्या लोकसभेच्या रणसंग्रामात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना महायुतीत सामील करण्यासाठी भाजपा त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून अनेक प्रयत्न केले गेले; परंतु जागा व चिन्हावरून वाद झाल्याने अखेरकार राज ठाकरे यांनी फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकरिता महायुतीला बिनशर्थ पाठिंबा जाहीर केला. यानंतर राज ठाकरे यांनी महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी सभासुद्धा घेतल्या. आज महायुतीची शिवाजी पार्कवर महासभा झाली. त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत राज ठाकरे मंचावर असल्याने त्यांच्या भाषणाकडे सर्वांचे लक्ष लागलं होतं. आपल्या बेधडक व आक्रमक शैलीसाठी प्रसिद्ध असलेले राज ठाकरे आज त्यांच्या भाषणामध्ये महाविकास आघाडी नेत्यांचे त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांच्यावर कशा पद्धतीने शरसंधान साधतात, त्यांचे कशा पद्धतीने वाभाडे काढतात, याकडे इथे उपस्थित हजारो जनसमुदायाचं लक्ष लागलं होतं. परंतु राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात केवळ महाविकास आघाडीचे नेते त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांची काही लायकी नसल्याने त्यांच्यावर बोलून विनाकारण आपला वेळ वाया घालवू नये असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सांगितलं. तर दुसरीकडे आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे त्यांच्या मागण्या वाचून दाखवल्या.
राज ठाकरे यांच्या मागण्या :
1) मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा
2) मराठा साम्राज्याचा इतिहास शालेय मुलांना लहानपणापासून शिकवला जावा
3) शिवरायांच्या गड किल्ल्यांना पुन्हा वैभव प्राप्त करून घेण्यासाठी एक राष्ट्रीय समिती नेमावी
4) देशात अनेक रस्ते तुम्ही बनवले. पण मुंबई-गोवा महामार्ग लवकरात लवकर व्हावा. जो आजही खड्ड्यात आहे
5) या देशाचं संविधान कधीच बदलले जाणार नाही. उद्धव ठाकरे व काँग्रेसला जे मुसलमान मदत करतात. कारण त्यांना मागच्या १० वर्षात डोकं वर करता आलं नाही आहे. हे मुठभर आहेत. त्यांचा कायमचा बंदोबस्त करावा.
6) मुंबईतील रेल्वेवर विशेष लक्ष द्यावे.
आगीत तेल ओतण्याऐवजी पाणी ओतलं : या सभेत भाषण करताना अगोदर अजित पवार त्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि नंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीवर जोरदार हल्ला चढवला. विशेष करून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्या बदललेल्या भूमिकेबद्दल त्यांचे वाभाडे काढण्याची कुठलीच संधी सोडली नाही. याच दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी मंचावर उपस्थित झाले आणि राज ठाकरे यांनी भाषणाला सुरुवात केली. राज ठाकरे यांच्या भाषणापूर्वी तिन्ही नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या शाब्दिक हल्ल्यात राज ठाकरे तेल ओतण्याचे काम करतील अशी अपेक्षा महायुतीच्या नेत्यांना, सर्वसामान्य कार्यकर्त्यांना असताना राज ठाकरे यांनी हा मुद्दाच शांत केला व आपल्या मागण्या मोदींसमोर मांडल्या.
जनतेला अपेक्षा असणं वावगं नाही : या मुद्द्यावर बोलताना भाजपा प्रवक्ते निरंजन शेट्टी म्हणाले की, राज ठाकरे यांच्याकडून जशी अपेक्षा होती त्या पद्धतीचं भाषण त्यांनी केलं आहे. राज ठाकरे यांच्या आक्रमक शैलीच्या भाषणाची सवय जनतेला झाली असून जनतेला त्यांच्याकडून तशा भाषणाची अपेक्षा असणं यात काही वावगं नाही. परंतु राज ठाकरे यांनी केलेल्या मागण्यांची दखल ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली आहे.
हेही वाचा :
- "महाराष्ट्राच्या पाठीत वार केला तर,..."; बीकेसी मैदानातून उद्धव ठाकरेंचा थेट पंतप्रधान मोदींना इशारा - lok sabha election
- मणिपूर हिंसाचारात 'सुपरपॉवर'चे काय झाले? प्रकाश आंबेडकर यांची मोदींवर टीका - Prakash Ambedkar Criticized PM Modi
- मोदी सरकार फसवेगिरी करणारं, त्यांच्यावर विश्वास ठेवू नका; मनमाडच्या सभेत शरद पवारांचा घणाघात - Sharad pawar