पिंपरी चिंचवड MLA Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे रविवारी पिंपरी चिंचवड दौऱ्यावर असून, शिवसैनिकांनी पिंपरीत भव्य रॅली काढून त्यांचं जंगी स्वागत केलं. त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी पिंपरीत महान्याय सभा घेतली. तळेगाव दाभाडे एमआयडीसीत येणारी वेदांत फॉक्सकॉन कंपनी सरकारनं गुजरातला पाठवली आहे. त्यामुळं हजारो तरुणांच्या नोकऱ्या गेल्या. राज्यकर्ते सर्व उद्योग गुजरातमध्ये घेऊन जात आहेत. महाराष्ट्रावर अन्याय करणारे कलम राज्य घटनेत समाविष्ट केलं आहे का? असा टोलाही आदित्य ठाकरे यांनी शिंदे सरकारला लगावलाय.
राज्यात असंवैधानिक खोके सरकार : राज्यात असंवैधानिक खोके सरकार पुन्हा डोक्यावर बसलं तर मंत्रालय, तहसील कार्यालयही गुजरातमध्ये हलवलं जाईल, असा हल्लाबोल आमदार आदित्य ठाकरे यांनी केलाय. गद्दारांपैकी एकालाही लोकसभा, विधानसभेची पायरी चढता येणार नाही. पेपर फोडणाऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी. याबाबत कायदा करण्याची मागणीही आदित्य ठाकरे यांनी केलीय.
कंपन्या गुजरातनं पळवल्या : वेदांत, फॉक्सकॉनसह 160 कंपन्या महाराष्ट्रात येणार होत्या. मात्र, त्यापूर्वीच या कंपन्या परराज्यात गेल्या आहेत. त्यामुळं महाराष्ट्रातील लाखो तरुणांचा रोजगार गेला. लाखो तरुण बेरोजगार झाले आहेत. काही लोकांनी विश्वासघात केला, त्यामुळं या कंपन्या दुसरीकडं गेल्याचं ठाकरे म्हणाले. वेदांत, फॉक्सकॉन कंपनी यापुढं गुजरातमध्ये होणार नाही. त्यांनी करार रद्द केला आहे. कारण तिथं कंपनी स्थापन करायला सात वर्षे लागणार होते. त्यामुळं कंपनीनं देशातून हद्दपार होण्याचा निर्णय घेतल्याचं ठाकरे म्हणाले.
पेपर फोडणाऱ्यांना फाशी द्या : देशात फक्त महाराष्ट्रावरच अन्याय होत आहे. यासाठी नवीन कलम लागू करण्यात आलं आहे. पण महाराष्ट्रानं किती दिवस अन्याय सहन करायचा? आता या मिंधे सरकारला पुन्हा सत्तेत आणलं तर राज्याचं मोठं नुकसान होईल. तसंच ते राज्यातील मंत्रालय देखील गुजरातला हलवतील, अशी टीका ठाकरे यांनी केलीय. तलाठी भरतीत घोटाळा झालाय. काहींना 200 पैकी 214 गुण मिळाले. ज्यांना खातं सांभाळता येत नाही, अशा व्यक्तीला मुख्यमंत्री केलं गेलं, असा हा भरती घोटाळा आहे. त्यामुळं पेपर फोडणाऱ्यांना फाशीची शिक्षा देण्यासाठी कायदा आणला पाहिजे, असंही ते म्हणाले. यावेळी ठाकरे गटाचे संपर्कप्रमुख आमदार सचिन अहिर, राज्य संघटक एकनाथ पवार, जिल्हाप्रमुख गौतम चाबुकस्वार, मावळ संघटक संजोग वाघेरे, तळेगाव शहरप्रमुख शंकर भेगडे आदी उपस्थित होते. तसंच डॉ. शैलेश मोहिते-पाटील यांनी ठाकरे गटात प्रवेश केलाय.
हे वाचलंत का :