अमरावती Buldhana Panchamrut : विषयुक्त रासायनिक खतांच्या ऐवजी घरीच बनवलेल्या पंचामृताची फवारणी करून शेतात पिकांचं भरपूर उत्पन्न घेता येतं. यासोबतच महत्त्वाची बाब म्हणजे या घरगुती पंचामृत औषधीच्या फवारणीच्या गंधामुळं शेत उध्वस्त करणारी जनावरं शेतात फिरकत देखील नाहीत. एकूणच शेतकऱ्यांना समृद्ध करणारं असं फवारणीसाठी घरगुती औषध अमरावती शहरातील सधन शेतकरी रवींद्र मेटकर यांनी अंजनगाव बारी येथील आपल्या शेतात तयार केलं आहे. रवींद्र मेटकर हे भारतीय कृषी संशोधन परिषदेचा पुरस्कार प्राप्त शेतकरी असून ते केंद्रीय कृषी मूल्य व किंमत आयोगाचे शेतकरी प्रतिनिधी सुद्धा आहेत. रवींद्र मेटकर यांच्या या खास पंचामृत प्रयोगासंदर्भात 'ई टीव्ही भारत' नं आढावा घेतलाय.
असं आहे पंचामृत : अंडी, ताक, चुना, गूळ आणि तुरटी यांच्या मिश्रणातून खास पंचामृत रवींद्र मेटकर यांनी तयार केलं आहे. अंड्यांमध्ये अमिनो ऍसिड आणि प्रोटीन असल्यामुळं पिकांची वाढ चांगली होते. ताक हे बुरशीनाशक असल्यामुळं पिकांना बुरशी लागत नाही. तुरटी ही जंतुनाशक असल्यामुळं पिकांना कीड लागत नाही. चुन्यामध्ये असणाऱ्या कॅल्शियममुळं पिकांना कॅल्शियम मिळतं. या सर्व द्रावणामध्ये जे किटाणू तयार होतात, त्या किटाणूंना खाद्य मिळावं यासाठी या द्रावणात गूळ देखील अतिशय महत्त्वाचा असल्याची माहिती रवींद्र मेटकर' यांनी ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.
एकरी खर्च केवळ शंभर रुपये : पंचामृताचं हे द्रावण तयार करणं शेतकऱ्यांना सहज सोपं आहे. दीड लिटर ताकामध्ये 12 अंडी फोडून टाकायची. त्यामध्ये 100 ग्रॅम गूळ, 100 ग्रॅम तुरटी आणि 100 ग्रॅम चुना टाकायचा आहे. हे सर्व मिश्रण ढवळून घेतल्यावर ते 15 ते 20 दिवस विरजण घातल्यासारखं ठेवून द्या. त्यानंतर 500 मिलिमीटरच्या पंपाद्वारे या द्रावणाची शेतात फळझाडांसह कोणत्याही पिकांवर फवारणी करायची. एक एकर शेतात फवारणीसाठी केवळ 100 रुपयात हे पंचामृत तयार होतं, असं रवींद्र मेटकर म्हणाले.
पंचामृतामुळं असा झाला फायदा : सोयाबीन पिकावर या पंचामृताची चारवेळा फवारणी करण्यात आली. सोयाबीन हे अगदी वाटाण्यासारखं माझ्या शेतात आलं. यावर्षी एकरी दहा क्विंटल उत्पन्न मला झालं असल्याचं रवींद्र मेटकर म्हणाले. पंचामृताच्या फवारणीमुळं तूर तीस क्विंटल झाली. पंचामृताच्या फवारणीमुळं वजनदार कांदा आला. काही शेतकऱ्यांच्या शेतात मी ज्वारीवर फवारणीसाठी पंचामृत दिलं असता त्यांना एकरी 25 क्विंटल ज्वारीचं उत्पन्न मिळालं, असं देखील रवींद्र मिटकरी यांनी सांगितलं.
पंचामृतामुळं शेत सुरक्षित : कुठल्याही रासायनिक औषधांची फवारणी करण्याची गरज पंचामृतामुळं भासत नसल्यानं शेतातील मातीत विष मिसळत नाही. पंचामृतांचा गंध हा रानडुक्कर, रोही, माकडं आणि पक्षांना सहन होत असल्यामुळं शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी डोकेदुखी असणारी ही जनावर शेतात फिरकत नाहीत. हा सर्वात मोठा फायदा असल्याचं देखील रवींद्र मेटकर यांनी सांगितलं.
मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल : आता रब्बी हंगामासाठी 11 जून रोजी मुंबईला केंद्रीय कृषी मूल्य व किंमत आयोगाची बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाली. आयोगाचे सदस्य म्हणून रवींद्र मेटकर हे देखील या सभेला उपस्थित होते. यावेळी रवींद्र मेटकर यांनी आपल्या पंचामृतासंदर्भात माहिती दिली असता, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या पंचामृताची दखल घेत आपल्या शेतात देखील हा प्रयोग करणार असं सांगितल्याचं रवींद्र मेटकर म्हणाले. कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी देखील या पंचामृताची माहिती घेतली असल्याचं रवींद्र मेटकर यांनी सांगितलं.
दिवसाला एक लाख वीस हजार अंड्यांचं उत्पादन : रवींद्र मेटकर यांचं अमरावती शहरापासून काही अंतरावर असणाऱ्या अंजनगाव बारी येथे शेत आहे. नवनवे प्रयोग करणारे रवींद्र मेटकर यांच्या शेतात अत्याधुनिक असा पोल्ट्री फार्म असून त्यांच्याकडे एक लाख 80 हजार कोंबड्या आहेत. त्यांना दिवसाकाठी एक लाख वीस हजार अंडी मिळतात. मध्य प्रदेशातील भोपाळ, खंडवा, बऱ्हाणपूर, इंदूर, झांसी यासह गुजरातच्या सुरत शहरात मेटकर यांच्या पोल्ट्री फार्ममधून नियमित अंडी जातात.
आयएएस अधिकाऱ्यांना केले मार्गदर्शन : मसूरी येथे 12 डिसेंबर 2022 ते 12 मे 2023 या काळात प्रशिक्षण घेत असलेल्या 185 आयएएस अधिकाऱ्यांना रवींद्र मेटकर यांनी 7 मार्च 2023 ला उत्तराखंडच्या मसूरी येथील लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासकीय अकॅडमी येथे शेतकऱ्यांची वास्तविक परिस्थिती काय? या संदर्भात जाणीव करून देण्यासाठी खास मार्गदर्शन केलं आहे. प्रशासकीय स्तरावर शेतकऱ्यांच्या महत्त्वासह शेतकऱ्यांच्या अडचणी कळाव्यात या संदर्भात शासनाकडून मिळालेली ती मोठी संधी होती, असं देखील रवींद्र मेटकर सांगतात.
हेही वाचा