मुंबई Building Slab Collapse In Mumbai : मालाड येथे इमारतीचा स्लॅब कोसळल्यानं तीन मजुरांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मालाड पूर्व गोविंद नगर परिसरातील 'नवजीवन बिल्डिंग' या इमारतीचं काम सुरू असून, सदर इमारत 23 माळ्यांची आहे. या इमारतीचा स्लॅब कोसळल्यानं एकूण 6 मजूर ढिगाऱ्याखाली अडकले होते. यातील 3 मजुरांचा मृत्यू झाला असून 2 मजुरांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलं. तर अन्य एका मजुरावर अस्थी तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू असल्याची माहिती पालिकेनं दिली आहे.
'नवजीवन बिल्डिंग' इमारतीचा कोसळला स्लॅब : याबाबत अधिक माहिती अशी की, दोन वाजता पालिकेच्या 1916 या हेल्पलाईन नंबरवर मालाड पूर्व गोविंद नगर परिसरातील 'नवजीवन बिल्डिंग' या इमारतीचा स्लॅब कोसळल्याची माहिती देणारा फोन आला. स्थानिकांनी ढिगाऱ्याखाली काही मजूर अडकल्याची माहिती अग्निशमन दलाच्या जवानांना दिली. सदर घटनेची माहिती मिळताच पालिकेच्या अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि तत्काळ मदत कार्याला सुरुवात केली.
तीन जणांचा जागेवरच मृत्यू : पालिकेने दिलेल्या माहितीनुसार, दुर्घटना झालेली सदर इमारत तळमजला अधिक 23 माळे अशा स्वरूपाची असून, यातील विसाव्या मजल्यावर स्लॅब कोसळला. सदर इमारत झोपडपट्टी पुनर्वसन विभाग अंतर्गत विक्री केली जाणाऱ्या इमारतींमध्ये असून, घटनास्थळी झोपडपट्टी पुनर्वसन विभागाचे अधिकारी देखील असल्याची माहिती पालिकेनं दिली आहे. या सर्व सहा जणांना एम डब्ल्यू देसाई या मालाड येथील पालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यातील तीन जणांचा जागेवरच मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. तर, अन्य दोघांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलं असून, त्यांच्यावर अधिकचा उपचार सुरू आहे. आणखी एका मजुरावर अस्थि तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीत उपचार सुरू असल्याची माहिती पालिकेनं दिली आहे. दरम्यान, मृत आणि जखमी सर्व मजुरांची नावं अद्याप रुग्णालय प्रशासनानं प्रसिद्ध केली नसल्याची माहिती पालिकेनं दिली आहे.
हेही वाचा -