मुंबई Bombay High Court : दत्तक प्रक्रियेसाठी दिलेलं बाळ उच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर पुन्हा आईच्या कुशीत आलंय. उच्च न्यायालयाचे सुट्टीकालीन न्यायमूर्ती नितीन बोरकर व न्यायमूर्ती सोमशेखर सुंदरेसन यांच्या खंडपीठासमोर याबाबत सुनावणी झाली होती. अॅड वर्षा भोगले देशमुख यांनी याचिकाकर्त्या आईतर्फे बाजू मांडली. तब्बल दोन महिन्यांनी बाळ आईच्या कुशीत विसावलं.
काय आहे नेमकं प्रकरण : लैंगिक अत्याचारानंतर जन्मलेलं बाळ आईनं काळजावर दगड ठेवून दत्तक प्रक्रियेसाठी दिलं खरं. मात्र, तिला बाळाला दूर केल्यावर झोप येत नव्हती व तिचं मन लागत नव्हतं. दिवस-रात्र तिला आपल्या बाळाची काळजी सतावत होती. त्यामुळं तिनं बाळ देण्याची प्रक्रिया रद्द करुन बाळ परत मागितलं होतं. मात्र, बाळाचा ताबा मिळत नसल्यानं तिला उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावावा लागला. न्यायालयानं या याचिकेची गांभीर्यानं व सहानुभूतीनं दखल घेत बाळाचा ताबा पुन्हा आईला देण्याबाबत निर्णय घेण्याचे निर्देश बाल कल्याण समितीला दिले. बाळाला जन्म दिल्यानंतर आईनं बाळ दत्तक प्रक्रियेसाठी दिलं होतं. मात्र आईची ममता तिला आपल्या मुलीपासून दूर ठेवू शकली नाही. त्यामुळं तिनं ही दत्तक प्रक्रिया रद्द करण्यासाठी व बाळ परत मिळण्यासाठी अर्ज केला. मात्र त्या अर्जावर निर्णय होत नसल्यानं तिनं मुंबई उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. मुंबई उच्च न्यायालयानं या प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेत बाल कल्याण समितीला या संदर्भात निर्णय घेण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार बालकल्याण समितीनं पुन्हा आईच्या ताब्यात देण्याचे निर्देश दिले
गर्भपात न करता बाळाला जन्म देण्याचा निर्णय : सदर 23 वर्षीय अविवाहित आई दुबईमध्ये काम करत असताना तिच्यावर लैंगिक अत्याचार झाले. भारतात परतल्यानंतर पोटाच्या व्याधीच्या तक्रारीमुळं डॉक्टरांकडे गेली. तेव्हा ती गरोदर असल्याचं समोर आलं. त्या महिलेनं गर्भपात न करता बाळाला जन्म देण्याचा निर्णय घेतला. जन्म झाल्यानंतर त्या बाळाला त्यांनी दत्तक प्रक्रियेसाठी सोपवलं खरं. मात्र, बाळ अतिशय लहान असून ते रात्रभर जागं राहतं. बाळाला भूक लागली तर त्याला दुधाची व्यवस्था कोणी आपलेपणानं करत असेल का ? बाळ रडत असेल तर बाळाला कोण आपलेपणानं शांत करत असेल का, या काळजीतून आई कासावीस होत होती. त्यामुळं तिनं बाळ परत घेण्याचा निर्णय घेतला.
आईच्या याचिकेत काय : तिनं याचिकित म्हटलंय की, तिच्यावरील संस्कार, देवाची भीती या सर्व गोष्टींचा विचार करुन तिनं गर्भपात न करता बाळाला जन्म देण्याचा निर्णय घेतला होता. जे जे रुग्णालयात तिची प्रसूती झाली व तिला कन्यारत्न प्राप्त झालं. मात्र, त्यानंतर दत्तक प्रक्रियेसाठी आशा सदनच्या मार्फत तिनं बाल कल्याण समितीकडे हे बाळ सोपवण्याचा निर्णय घेतला. आशा सदनमध्ये नवजात बालके व त्यांच्यासोबत त्यांचं वर्तन चांगलं असलं तरी तेथील काही मावशी झोपेसाठी लहान मुलांना नवजात बालकांना बाथरुममध्ये बंद करुन कडी लावून झोपतात असा आरोप तिने केला. त्यामुळं आपल्या मुलीची तिला काळजी वाटू लागली. बाळाच्या काळजीनं आईला रात्रभर झोप येत नव्हती. त्यामुळं एका क्षणी तिनं हे बाळ आपण पुन्हा परत मिळवायचं असा निर्णय घेतला व लढा सुरु केला. मात्र, बाल कल्याण समितीनं तिला सकारात्मक प्रतिसाद न दिल्यानं तिनं न्यायालयात दाद मागितली.
हेही वाचा :