मुंबई Ganeshotsav 2024 : गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. गणेशोत्सव समित्यांनी तयारी सुरू केली आहे. मुंबईत घरगुती गणपती आणि सार्वजनिक गणपती असे दोन प्रकार आहेत. घरगुती गणपती हे दीड दिवस, सात दिवस आणि दहा दिवसांचे आहेत. तर, सार्वजनिक गणपती दहा दिवस ते अनंत चतुर्थीपर्यंत बसतात. त्यामुळे एका बाजुला मुंबईकर लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी तयारीला लागले असून, दुसरीकडं महानगरपालिका मुंबईकरांच्या लाडक्या बाप्पाच्या विसर्जनाच्या तयारीला लागली आहे. मुंबईत गणपती बाप्पांच्या आगमन मिरवणुका प्रसिद्ध आहेत. तसेच विसर्जन मिरवणूक देखील प्रसिद्ध आहेत. आपल्या बाप्पाला थेट पुढच्या वर्षी भेटता येणार, या भावनेतून गणपतीचं मूर्त रूप आपल्या डोळ्यात साठवून ठेवण्यासाठी संपूर्ण मुंबई विसर्जनाच्या दिवशी रस्त्यावर उतरलेली दिसते. अशा या लाडक्या बाप्पाच्या विसर्जनाची तयारी पालिकेनं केली असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी कृत्रिम तलावांची संख्या वाढवली आहे.
महापालिकेनं यावर्षी वाढवली कृत्रिम तलावांची संख्या : महापालिकेनं मागील वर्षी 194 कृत्रिम तलाव विसर्जनासाठी बनवले होते. यात एकूण 76 हजारांहून अधिक गणेशमूर्तींचं विसर्जन करण्यात आलं. यावर्षी पालिकेनं गणेशमूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची संख्या वाढवली असून, यंदा मुंबईत एकूण 204 कृत्रिम तलाव विसर्जनासाठी बनवण्यात आले आहेत. याशिवाय 69 नैसर्गिक विसर्जन स्थळांची व्यवस्थाही उपलब्ध करून दिली जाणार असल्याचं पालिकेनं म्हटलं आहे. पालिकेनं दिलेल्या माहितीनुसार, कृत्रिम तलावांमध्ये विसर्जनासाठी येणाऱ्या भाविकांच्या संख्येत देखील वाढ होत असून, मागील 11 वर्षांत कृत्रिम तलावांमध्ये गणेश विसर्जनाच्या संख्येत 371 टक्क्यांनी वाढ झाल्याचं पालिकेनं म्हटलं आहे.
पर्यावरणपूरक गणेशोत्सवावर महापालिकेचा भर : पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी पालिका प्रशासनानं मूर्तीकारांना शाडू मातीही दिली आहे. मात्र, तरीही अनेक ठिकाणी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्ती आणल्या जातात. प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींचं नैसर्गिक पाणवठ्यांमध्ये विसर्जन केल्यानं पाणी दूषित होते. त्यामुळे या मूर्तींचं विसर्जन कृत्रिम तलावात करावं, असं आवाहन देखील पालिका प्रशासनानं केलं आहे. पालिकेच्या म्हणण्यानुसार, प्रशासनानं मुंबईकरांना गणपती विसर्जनासाठी आपल्या घराजवळ कृत्रिम तलाव उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे कृत्रिम तलावात मूर्ती विसर्जनाचं प्रमाणही वाढत असल्याचं पालिकेचं म्हणणं आहे.
कोरोना काळात वाढली कृत्रिम तलावाची संख्या : कोरोना काळात गणेशभक्तांना कृत्रिम तलावात मूर्तीचं विसर्जन करावं लागलं. त्यानंतर पालिकेनं कृत्रिम तलावांची संख्या वाढविल्याचं दिसून येते. दरम्यान, मागील 10 वर्षांत पालिकेनं कृत्रिम तलावांची संख्या वाढवल्याचं दिसून येते. 2012 मध्ये केवळ 27 कृत्रिम तलाव होते. गेल्या 10 वर्षांत ही संख्या 204 वर पोहोचली आहे. तर, 2012 मध्ये 16 हजार 276 घरगुती आणि सार्वजनिक गणपती मूर्तींचं विसर्जन करण्यात आलं. गेल्या वर्षी ही संख्या 76,709 होती.
हेही वाचा :