चंद्रपूर Sudhir Mungantiwar : राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार हे यावेळी भाजपाचे उमेदवार असणार आहेत. आपण लोकसभा लढण्यास इच्छुक नाही, असं त्यांनी यापूर्वी जरी स्पष्ट केलं असलं तरी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत ते भाजपाचा चेहरा असणार याची कल्पना त्यांना होती. विशेषतः केंद्रीय पातळीवर झालेले उपक्रम आणि कार्यक्रमात मुनगंटीवारांचे नेतृत्व यातून अंदाज लावता येऊ शकतो.
केंद्रीय पातळीवरून तयारीला सुरुवात : 2019 मध्ये संपूर्ण देशात नरेंद्र मोदी यांची लाट होती. सलग दोन वेळा निवडून आलेले तत्कालीन केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर हे भाजपाचे उमेदवार होते. तर त्यांच्या विरोधात काँग्रेसकडून बाळू धानोरकर उमेदवार होते. धानोरकर हे कुणबी समाजाचे नेतृत्व करतात. त्यांना उमेदवारी दिल्याने कुणबी समाजाचे एकगठ्ठा मतदान धानोरकर यांना पडले तर हंसराज अहीर यांना पराभवाचा सामना करावा लागला. तेव्हापासून भाजपाने चंद्रपूर लोकसभा क्षेत्राकडे विशेष लक्ष देणं सुरू केलं.
निवडणुकीचे अत्यंत सूक्ष्म नियोजन : कुठल्याही निवडणुकीचे अत्यंत सूक्ष्म नियोजन भाजपा करत असते. सुरुवातीला देशात जिथे जिथे भाजपा पराभूत झाली तिथे संघटन बांधणी आणि काम करण्याची जबाबदारी केंद्रीय मंत्र्यांना देण्यात आली. चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्राची जबाबदारी ही केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पूरी यांना देण्यात आली. पुरी यांनी दोनदा या लोकसभा क्षेत्राचा दौरा केला. यानंतर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची सभा देखील आयोजित करण्यात आली. या सभेच्या माध्यमातून भाजपाने लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले. यानंतर डिसेंबर महिन्यात केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी यांच्या हस्ते वरोरा तालुक्यातील खेमजई येथे विकसित भारत संकल्पना योजनेअंतर्गत कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले.
मुनगंटीवारांचा राष्ट्रीय कार्यक्रमांचा सपाटा : सुधीर मुनगंटीवार यांनी देखील राष्ट्रीय पातळीवर कार्यक्रम आणि उत्सवांचा सपाटा सुरू केला. नवी संसद तयार होणाऱ्या सेंट्रल विस्टा प्रकल्पासाठी बल्लारपूर लाकूड डेपोतून उच्च प्रतीचे लाकूड पाठविण्यात आले. यानंतर अयोध्या येथे तयार होणाऱ्या प्रभू श्रीरामांच्या मंदिरासाठी देखील अशाच उच्च दर्जाचे लाकूड पाठविण्यात आले. या काष्ठपूजन सोहळ्यात देशभरातील कलावंतांना बोलाविण्यात आले. रामायण मालिकेतील कलावंतांची देखील येथे उपस्थिती होती. यानंतर शालेय राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा बल्लारपूरात पार पडली. जिथे प्रत्येक राज्याचे प्रतिनिधित्व करणारे संघ देशभरातून सामील झाले होते. याचे आयोजन देखील भव्यदिव्य पध्दतीनं करण्यात आले. याचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर ताडोबा महोत्सव, इंडस्ट्रियल एक्स्पो सोबत घेण्यात आले. बोटॅनिकल गार्डनचे अद्याप काही काम बाकी असताना याचे लोकार्पण करण्यात आले. एसएनडीटी महिला महाविद्यालय आणि अमृत 2 योजनेच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम उरकण्यात आला. विधानसभा निवडणुकीला वेळ असताना लोकसभा निवडणुकीची टायमिंग साधण्यात आली.
'मन की बात'मध्ये ताडोबातील तंत्रज्ञानाचा उल्लेख : मुनगंटीवार हे राज्याचे वनमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. त्यांच्याच जिल्ह्यातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात मानव-वन्यजीव संघर्ष कमी व्हावा यासाठी एआय (आर्टिफिशिअल इंटेलिजन्स) प्रणालीचा वापर करण्यात आला. याचं कौतुक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात' मध्ये केलं. याची चर्चा राष्ट्रीय पातळीवर सुरू होती.
मुनगंटीवारंच का? : राज्याच्या राजकारणात मुनगंटीवार हे प्रभावी व्यक्ती आहेत. त्यांचा जनसंपर्क दांडगा असून सर्व परिचित असा चेहरा आहे. भाजपासाठी ते एक सक्षम पर्याय आहेत. भाजपा कुठलीही गोष्ट करताना त्याचे सूक्ष्म नियोजन करत असते. त्यामुळे मुनगंटीवार यांना लोकसभेची उमेदवारी देणं हा त्यांच्या सूक्ष्म नियोजनाचा भाग आहे, असं बोलल्या जात आहे.
फडणवीस यांचे प्रतिस्पर्धी मुनगंटीवार? : सुधीर मुनगंटीवार हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिस्पर्धी समजले जातात; मात्र मुनगंटीवार यांनी याबाबत कधी जाहीर वक्तव्य केलं नाही. असं असलं तरी त्यांच्यात असलेल्या अंतर्गत धुसफूसीबाबत अंतर्गत गोटात चर्चा होत असते. मुनगंटीवार यांना दिल्लीत पाठवून राज्यातील मुनगंटीवार यांचे आव्हान संपुष्टात येईल अशी खेळी फडणवीस यांनी खेळली असल्याची चर्चा आहे; मात्र यात काही तथ्य आहे की, निव्वळ अफवा हे येत्या काळात स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
काय म्हणाले राजकीय विश्लेषक? : मुनगंटीवार यांना लोकसभा निवडणूक लढावी लागणार याबाबतच्या सूचना आठ महिन्यांपूर्वीच पक्षश्रेष्ठींनी दिली होती. याबाबत मुनगंटीवार मात्र अनिच्छुक होते. कारण राज्याच्या राजकारणात त्यांचा दबदबा होता. असं असलं तरी वेळेवर जबाबदारी आल्यास त्या दृष्टीनं त्यांनी तयारी करायला सुरुवात केली होती. राष्ट्रीय पातळीचे अनेक इव्हेंट त्यांनी घेण्यामागे हीच भूमिका होती, असं मत राजकीय विश्लेषक आणि ज्येष्ठ पत्रकार संजय तायडे यांनी व्यक्त केलं.
हेही वाचा :