ठाणे BJP MLA Ganpat Gaikwad Firing : उल्हासनगर शहरातील हिललाईन पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या केबिनमध्ये शिवसेना शिंदे गटाचे कल्याण शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावरील गोळीबार प्रकरणी आतापर्यंत भाजपा आमदार गणपत गायकवाड यांच्यासह 5 जणांना अटक करण्यात आली होती. अटकेतील सर्व आरोपींना 14 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. आज बुधवारी या सर्वांना सकाळी नऊ वाजता न्यायालयात हजर केलं असता आमदार गायकवाडांसह पाचही आरोपींची 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी केलीय. विशेष म्हणजे अनुचित प्रकार घडू नये, यासाठी न्यायालयाच्या परिसरात संचारबंदीही लागू करण्यात आली होती.
आज न्यायालयात केलं हजर : 2 फेब्रुवारी रोजी हिललाईन ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांच्या केबिनमध्ये भाजपाचे आमदार गणपत गायकवाड यांनी त्यांच्या परवानाधारक रिव्हॉल्व्हर मधून महेश गायकवाड यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. याप्रकरणी गणपत गायकवाड, हर्षल केणे, संदीप सरवणकर, विकी गोणात्रा, रणजित यादव यांना अटक करण्यात आली होती. न्यायालयाच्या आदेशानुसार अटकेतील आरोपींना 14 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्यात आलं होतं. आज पोलीस कोठडी संपल्यानं या सर्वांना उल्हासनगरच्या न्यायालयात हजर केल्याची माहिती आमदार गायकवाड यांचे वकील उमर काजी यांनी दिलीय.
न्यायालय परिसरात संचारबंदी : गोळीबार प्रकरणात यापूर्वी गणपत गायकवाड यांच्या समर्थकांनी उल्हासनगर न्यायालयाच्या समोर जोरदार घोषणाबाजी केली होती. आता पुन्हा काही अनुचित प्रकार घडू नये, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी न्यायालयाच्या आवारात पोलिसांनी थेट संचारबंदीच लागू केली होती. तसंच वाहतुकीत देखील बदल करण्यात आले. 200 मीटर पर्यंत कोणालाही न्यायालयाच्या आवारात फिरकता येणार नाही. तसंच माध्यम प्रतिनिधींना देखील मज्जाव करण्यात आला होता.
तळोजा कारागृहात रवानगी : गोळीबार केल्यानंतरही आमदार गणपत गायकवाड यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत मी गोळीबार केला असून, मला कोणताही पश्चाताप नसल्याचं विधान करत मुख्यमंत्र्यांवर आरोप केले होते. तसंच दुसऱ्या दिवशी गणपत गायकवाड यांना न्यायालयात हजर केलं असता त्यांनी थेट पोलीस व्हॅनच्या बाहेर डोकं काढत प्रसार माध्यमांशी बोलण्याचा प्रयत्न केला होता. याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी पोलिसांनी माध्यम प्रतिनिधींना लांब ठेवल्याचं बोललं जातंय. आमदार गायकवाडांसह पाचही आरोपींची रवानगी नवी मुंबईतील तळोजा कारागृहात करण्यात आल्याची माहिती तपास पोलीस अधिकारी तथा वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांनी दिलीय.
हेही वाचा :