मुंबई Lok Sabha Election Results 2024 : लोकसभा निवडणुकीत महायुतीनं 40 प्लसचा नारा दिला होता. मात्र, महायुतीला 17 जागावर समाधान मानावं लागलं. या 17 जागांमध्ये भाजपाला 9, शिवसेनेला 7 राष्ट्रवादी काँग्रेसाला 1 जागा मिळालीय. दरम्यान, निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर महायुतीकडून पराभवाचं आत्मपरीक्षण करण्यात येत आहे. पराभवाला कोणती कारणं जबाबदार आहेत, यावर विचारमंथन महायुतीकडून करण्यात येत आहेत. दुसरीकडं लोकसभा निवडणुकीत भाजपानं आम्हाला अपमानास्पद वागणूक दिली, तसंच शिवसेना पक्षासाठी भाजपा कार्यकर्त्यांनी काम केलं नाही. त्यामुळं सरकारमध्ये राहायचं की, बाहेर पडायचं हा निर्णय लवकरच घेण्यात येईल, असा खळबळजनक आरोप शिवसेना प्रवक्ते वैजनाथ वाघमारे यांनी केलाय. आज वाघमारे यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत गंभीर आरोप केले.
..म्हणून आमच्या जागा कमी झाल्या : वैजनाथ वाघमारे म्हणाले की, शिवसेनेकडून महायुतीचा धर्म पाळण्यात आला. राज्यभर शिवसेना पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांनी महायुतीसाठी झोकून देत काम केलं. मात्र, दुसरीकडं भाजपातील नेते आमच्यासाठी काम करताना दिसले नाहीत. तसंच राज्यातील विदर्भ, मराठवाडा, कोकण आदी भागात भाजपा कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना सन्मानाची वागणूक दिली नाही. ज्या ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार होते, तिथं भाजपानं चांगलं काम केलं नसल्याचं वाघमारे म्हणाले. त्यामुळं आमचे चार ते पाच खासदार पराभूत झाले असून, आमच्या जागा कमी झाल्या. भाजपाकडून सहकार्य मिळालं असतं, तर आमचे चार-पाच खासदार निवडून आले असते, असं वाघमारे म्हणाले.
निर्वाणीचा इशारा : निवडणूक प्रचारात भाजपाच्या अहंकारामुळं आम्हाला कमी जागा मिळाल्या. त्याचा फटका भाजपाला बसला आहे. त्यामुळं त्यांनी 28 पैकी नऊ जागा जिंकल्या. या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत आम्हाला दुय्यम दर्जाची वागणूक भाजपातील कार्यकर्त्यांनी दिली. ही बाब पक्ष श्रेष्ठींच्या निदर्शनास आणून दिली आहे. परंतु दुसरीकडं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एनडीएला जाहिर पाठींबा दिला आहे. भाजपाच्या या सापत्नीक वागणुकीमुळं महायुतीत राहायचं की नाही? हा निर्णय कार्यकर्ते करतील, असा निर्वाणीचा इशारा वैजनाथ वाघमारे यांनी दिला.
भाजपाच्या अहंकारामुळं पिछेहाट : भाजपानं शिवसेनेच्या अंगीकृत विभागास अपमानजनक वागणूक दिली. भाजपानं शिवसेनेच्या नेत्यांना अहंकारवादी वागणूक दिली. परिणामी भाजपानं स्वतःचे 10 उमेदवार आणि शिवसेनेचे 5 उमेदवार गमावले, असं वैजनाथ वाघमारे म्हणाले. यामुळे दिल्ली सरकार पाठिंबा दयायचा का नाही?, यावर लवकरच निर्णय घेण्यात येईल असं वाघमारे यांनी म्हटलंय.
हे वाचलंत का :
- अपेक्षेपेक्षा अधिक जागा मिळाल्यानं काँग्रेससह शिंदेंच्या शिवसेनेची विधानसभेला बार्गेनिंग पॉवर वाढेल? - Maharashtra Assembly Election 2024
- महाराष्ट्रातील दोन नेते दिल्लीत घडवणार भूकंप? विनोद तावडेंनी घेतली अमित शाह यांची भेट, देवेंद्र फडणवीसांची संध्याकाळी बैठक - Vinod Tawde meets Amit Shah
- महाराष्ट्रात 48 खासदारांपैकी 26 नवे खासदार मराठा, तर 9 ओबीसी: वाचा संपूर्ण लिस्ट फक्त एका क्लिकवर.... - MP Equation Maharashtra