मुंबई Bihar Political Crisis : बिहारमध्ये नितीश कुमार यांनी पुन्हा भाजपासोबत सरकार स्थापन केलंय. त्यामुळं बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा राजकीय भूकंप झालाय. राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालू प्रसाद यादव यांचा पाठिंबा सोडून नितीश कुमारांनी भाजपाचं कमळ हातात धरलं आहे. बिहारचे भाजपा राज्य प्रभारी विनोद तावडे (Vinod Tawde) हे बिहारमधील या सर्व राजकीय घडामोडींवर बारकाईनं लक्ष ठेवून होते. सत्ताबदलाच्या या नाट्यमय घडामोडीत त्यांची महत्त्वाची भूमिका होती.
तावडेंच्या उपस्थितीत बैठक : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपानं शनिवारी प्रभारींची घोषणा केली. यात विनोद तावडेंना बिहारची जबाबदारी देण्यात आली. त्यानंतर तावडेंच्या उपस्थितीत भाजपा आमदारांची बिहारमध्ये बैठक झाली. यावेळी भाजपानं नितीश कुमारांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळं बिहारमध्ये एनडीएचं सरकार स्थापन झालं आहे. विधिमंडळात पक्षाच्या उपनेतेपदी अनुक्रमे सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा यांची निवड करण्यात आली. हे दोन्ही नेते नव्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदावर विराजमान झाले आहेत. सम्राट चौधरी हे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आहेत.
अगोदर राजीनामा की पाठिंबा पत्र : भाजपाचे विनोद तावडे दोन दिवसापासून पाटण्यात तळ ठोकून बसले होते. विनोद तावडे यांच्याकडं बिहार निवडणुकांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तावडे पाटण्यात असून, त्यांनी बिहारच्या सत्तानाट्यावर बोलण्यास नकार दिला आहे. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांना बिहारमधील चालू घडामोडीबाबत विचारले असता ते म्हणाले की, आम्ही राज्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं आम्ही यावर चर्चा करू. यापूर्वी बिहारमध्ये विधानसभा निवडणूक 2020 मध्ये झाली होती. तेव्हा संयुक्त जनता दलाचे नितीश कुमार यांनी भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीसोबत निवडणूक लढवली होती. त्यानंतर नितीश कुमार मुख्यमंत्री झाले. पण, दोनच वर्षात 2022 मध्ये नितीश कुमारांनी भाजपाची साथ सोडून लालू प्रसाद यादव यांची मदत घेतली होती. त्यानंतर संयुक्त जनता दल, राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसनं बिहारमध्ये सरकार स्थापन केलं होतं. आता नितीश कुमारांनी पुन्हा एकदा पलटी मारल्यानं नवीन राजकीय समीकरणे तयार होत आहेत.
मजबूत सरकार देण्याकडे लक्ष : महत्त्वाचं म्हणजे बिहारमधील राजकारण वेगळ्या वळणावर पोहोचलं असताना त्याला योग्य दिशा देण्याचं काम विनोद तावडे करत आहेत. विनोद तावडे गेल्या दोन दिवसांपासून पाटण्यात तळ ठोकून आहेत. नितीश कुमार यांचा पूर्वीचा इतिहास पाहता भाजपानं सावध पावलं टाकली होती. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, भाजपा प्रदेशाध्यक्ष सम्राट चौधरी, माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांच्याशी वारंवार संवाद साधला जात होता. 2020 मध्ये नितीश कुमार यांनी भाजपासोबत निवडणूक लढवली होती. पण अल्पावधीतच त्यांनी भाजपाशी फारकत घेतली. त्यानंतर त्यांनी लालूप्रसाद यादव यांच्या राजदसोबत सरकार स्थापन केलं होतं. आता पुन्हा एकदा ते लालू यादव यांना सोडून भाजपासोबत सरकार स्थापन केलं आहे.
हे वाचलंत का :