धुळे Bharat Jodo Nyay Yatra : काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचं आज 13 मार्च रोजी धुळे शहरात आगमन होत आहे. राहुल गांधी यांचं 12 मार्च रोजी धुळे जिल्ह्यात आगमन झालं आहे. त्यांची यात्रा दोंडाईचा इथं मुक्कामी होती. त्यांच्या उपस्थितीत धुळ्यात रोड शो, चौक सभा आणि महिला हक्क परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे.
धुळे जिल्हा काँग्रेसमय : राहुल गांधी यांच्या स्वागतासाठी धुळे शहर सज्ज झालं असून, त्यांचं उत्स्फूर्तपणे जंगी स्वागत केलं जाणार आहे. त्यांच्या आगमनामुळं धुळे शहरात आणि जिल्ह्यात काँग्रेसमय वातावण आहे. दौरा मार्ग आणि सभा स्थळांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील आणि सहायक पोलीस अधिक्षक ऋषीकेश रेड्डी यांनी काँग्रेस पदाधिकारी आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत पाहाणी केली.
राहुल गांधी यांचा आजचा नियोजित दौरा : भारत जोडो न्याय यात्रेचा धुळे जिल्ह्यात बुधवार 13 मार्च रोजीचा दौरा निश्चित करण्यात आला आहे. 13 मार्च रोजी सकाळी 7.30 वाजता खासदार राहुल गांधी दोंडाईचा इथून धुळ्याकडं निघतील. सकाळी 8.15 वाजता चिमठाणे येथील क्रांती स्मारकाला अभिवादन करण्यात येईल. त्यानंतर सकाळी 9 वाजतापासून ते 10.45 वाजेदरम्यान सोनगीर, सरवड फाटा, देवभाने फाटा, नगाव, नगाव बारी, दत्त मंदिर धुळे, एसएसव्हीपीएस कॉलेज धुळे, देवपूर मशीद, धुळे येथे राहुल गांधी यांचे रॅली मार्गावर काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे पदाधिकारी स्वागत करणार आहेत. तर सकाळी 11.10 वाजता कराचीवाला खुंट येथे शिवसेना (उबाठा) पदाधिकारी राहुल गांधी यांचे स्वागत करतील. सकाळी 11 ते 11.30 वाजतादरम्यान महात्मा गांधी पुतळा ते छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मनोहर टॉकीजपर्यंत पदयात्रा होणार आहे. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज पुतळा मनोहर टॉकीजजवळ राहुल गांधी यांची चौक सभा होईल. धुळे येथील सूरत बायपासजवळ दुपारी 12 वाजता होणार्या महिला हक्क परिषदेला ते संबोधित करतील.
'या' नेत्यांची असेल उपस्थिती : भारत जोडो न्याय यात्रेत राज्यातील तसेच दिल्लीतील दिग्गज नेते सहभागी होणार आहेत. त्यात काँग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले, विधीमंडळ नेते आमदार बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मंत्री सतेज पाटील, माजी मंत्री यशोमती ठाकूर, महाराष्ट्र काँग्रेसच्या नेत्या प्रतिभा शिंदे, काँग्रेस कार्याध्यक्षा प्रणिती शिंदे, आमदार कुणाल पाटील, शिवसेना नेते अशोक धात्रक, महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षा श्रीमती संध्या सव्वालाखे, प्रवक्ता अतुल लोंढे, माजी मंत्री शोभा बच्छाव, प्रदेश उपाध्यक्ष नाना गवांदे आदी नेते उपस्थित राहणार आहेत.
धुळे शहरात विविध चौकात झेंडे, बॅनर : खासदार राहूल गांधी यांच्या नेतृत्वाखाली मणिपूर ते मुंबई अशी भारत जोडो न्याय यात्रा सुरु आहे. भारत जोडो न्याय यात्रा 12 आणि 13 मार्च रोजी धुळ्यात राहणार आहे. त्यामुळे काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे नेते यात्रेच्या तयारीला लागले. रॅली मार्गासह धुळे शहरात विविध चौकात झेंडे, बॅनर लागले असून सर्वत्र काँग्रेसमय वातावरण आहे.
जनतेमध्ये उत्साह : भारत जोडो यात्रेबाबत माहिती देताना आमदार कुणाल पाटील यांनी सांगितले की, "भारत जोडो न्याय यात्रेनिमित्त खासदार राहुल गांधी यांचं धुळ्यात आगमन होत आहे. त्यांच्या स्वागताची धुळे जिल्ह्यात जय्यत तयारी झाली आहे. राहुल गांधी धुळे जिल्ह्यात येत असल्यानं गावागावात उत्साह आहे. त्यामुळे जनतेमध्ये भारत जोडो यात्रेची उत्सुकता निर्माण झाली. कमी वेळेत आणि आचारसंहिता लक्षात घेवून राहुल गांधी हे वाहनातून भारत जोडो न्याय यात्रा करत आहेत. धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथून निघाल्यावर प्रत्येक मार्गावर लागणार्या प्रत्येक गावात त्यांचं स्वागत केलं जाणार आहे. धुळ्यात आल्यावर राहुल गांधी हे महात्मा गांधी पुतळ्यापासून आग्रारोड मार्गे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत पदयात्रा करणार आहेत. भारत जोडो यात्रेत सहभागी व्हावं," असं आवाहन आमदार कुणाल पाटील यांनी केलं आहे.
महिला न्याय हक्क परिषद : भारत जोडो न्याय यात्रेचं औचित्य साधून राहुल गांधी यांच्या उपस्थितीत धुळे येथे 13 मार्च रोजी दुपारी 12 ते 1 वाजता महिला हक्क परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. या परिषदेकडं संपूर्ण देशाचे लक्ष लागून आहे. महिला हक्क परिषदेला तब्बल पंधरा हजार महिला उपस्थित राहणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. गेल्या पाच दिवसापासून महाराष्ट्र महिला काँग्रेसच्या नेत्या प्रतिभा शिंदे आणि अश्विनी कुणाल पाटील या महिला परिषदेची तयारी करुन घेत आहेत.
हेही वाचा :