मुंबई August Kranti Maidan : मुंबई हे ऐतिहासिक शहर आहे. या ठिकाणी अनेक हेरिटेज इमारती आहेत. मुंबईच्या प्रगतीची साक्ष देणाऱ्या अनेक गोष्टी तुम्हाला मुंबईत पाहायला मिळतात. देशाच्या स्वातंत्र्य चळवळीतील एक महत्त्वाचा टप्पा याच मैदानातून सुरू झाला होता. मात्र, आज हे मैदान मुंबईत येणाऱ्या पर्यटकांच्या नजरेतून गायब झाल्याचं दिसून येत आहे. ज्या मैदानावरून चले जाव आंदोलनाचा नारा देण्यात आला, त्या मैदानाचा मुंबईकरांना विसर पडलेला दिसतोय. महात्मा गांधींनी 9 ऑगस्ट 1942 रोजी ब्रिटीशांच्या विरोधात चले जावचा नारा दिला होता. या घटनेला शुक्रवारी 82 वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्तानं देशाच्या स्वातंत्र्यलढ्याची साक्ष देणाऱ्या या मैदानाचा इतिहास आपण जाणून घेणार आहोत.
इंग्रजांविरुद्ध करो या मरोचा नारा : 9 ऑगस्ट 1942 रोजी महात्मा गांधींनी मुंबईतल्या एका मैदानात इंग्रजांविरोधात 'करो या मरो'चा नारा दिला होता. त्यानेळी ब्रिटीशकालीन मुंबईला बॉम्बे म्हटलं जायचं. त्यावेळी ऑगस्ट क्रांती मैदानाला गोवालिया टँक ग्राउंड म्हटलं जात होतं. 9 ऑगस्ट रोजी जेव्हा गांधीजींनी चले जावचा नारा दिला. तेव्हा या मेदानात उपस्थित असलेत्या प्रत्येक स्वातंत्र्यसैनिकात नवचेतना निर्माण झाली होती. याच सभेनंतर ब्रिटीश राजवटीविरोधात अखेरचा लढा उभा राहिला. याच आंदोलनाला आपण भारत छोडो आंदोलन नावानं ओळखतो. याबाबत अधिक माहिती अशी की, 1942 साली 8 ऑगस्ट रोजी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीनं मुंबईत अधिवेशन बोलावलं होतं. त्यावेळी हे अधिवेशन गोवालिया टँक ग्राउंडवर झालं होतं. गांधीजींच्या सभेनंतर देशात क्रांतीची चेतना निर्माण झाली. त्यानंतर या मैदानाचं नाव बदलून ऑगस्ट क्रांती मैदान करण्यात आलं.
महात्मा गांधींसह अनेक नेत्यांना अटक : देशाची स्वातंत्र्य चळवळ 1942 मध्ये महत्त्वाच्या वळणावर पोहोचली होती. ब्रिटीश सरकारनं भारतीय जनतेच्या अटी मान्य केल्या नाहीत, तर लोक त्यांचे आदेश मानणार नाहीत, असं त्यावेळी ठरवण्यात आलं. यावर गोवालिया टँक ग्राउंडवरील सभेतील उपस्थित लोकांनी सहमती दर्शवली. गोवालिया टँक ग्राउंडवरील सभेनंतर उभी राहिलेली 'चले जाव' चळवळ देशभरात वणव्यासारखी पसरली. मग प्रत्येक वेळेप्रमाणे इंग्रजांनी आंदोलन दडपण्यासाठी अनेक नेत्यांना अटकही केली. यामध्ये तत्कालीन भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांना समावेश होता. यामध्ये महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल आणि अबुल कलाम आझाद आदींनाही अटक करण्यात आली होती.
ऑगस्ट क्रांती मैदानावरी भाषणाची इतिहासात नोंद : 8 ऑगस्ट 1942 रोजी गोवालिया टँक मैदानात स्वातंत्र्यसैनिकांची भाषणं रात्री 10 वाजेपर्यंत चालली. या दिवशी एकूण चार जणांनी भाषणं केली. या भाषणाची इतिहासात नोंद झाली. मौलाना अबुल कलाम आझाद यांनी पहिलं भाषण केलं. यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, शेवटी मोहनदास करमचंद गांधी (महात्मा गांधी) यांनी जाहीर सभेला संबोधित केलं. याच दिवशी स्वातंत्र्य चळवळीतील 'ग्रँड ओल्ड लेडी' म्हणून प्रसिद्ध असलेल्या अरुणा असफ अली यांनी गोवालिया टँक मैदानावर भारतीय ध्वज फडकवला होता.
आजही होतात आंदोलन : शुक्रवारी याच ऐतिहासिक घटनेला 82 वर्ष पूर्ण होत आहेत. आजही या मैदानानं 1942 च्या आठवणी जपल्याचं दिसून येतय. आजही या मैदानावर विविध आंदोलन होत असतात. त्यातील एक महत्त्वाचं आंदोलन म्हणजे नागरिकत्व सुधारणा विधेयकाविरोधात (CAA) झालेलं आंदोलन. या आंदोलनात अनेक सेलिब्रिटी आणि मोठे नेते सहभागी झाले होते. त्यामुळे एखादी चळवळ उभारण्याचा वारसा या मैदानानं आजही जपला आहे.