नागपूर Anil deshmukh On Devendra Fadnavis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 4 वर्षांपूर्वीची घटना उकरुन काढत माझ्याविरुद्ध दिल्लीच्या मदतीनं सीबीआयनं एफआयआर दाखल केलाय. 4 वर्षांपूर्वी मी गृहमंत्री असताना जळगाव येथील एका घटनेत भाजपाचे नेते गिरीश महाजन यांच्यावर कारवाई करण्यासाठी मी जळगावच्या पोलीस अधिकाऱ्यावर दबाव टाकला होता, असा आरोप माझ्यावर करण्यात आलाय. माझ्या माहितीनुसार माझ्यावर धाडी टाकून मला अटक करण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस करत आहेत, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलाय.
मी माझ्या अटकेची वाट बघतोय : तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुखांवर जळगावच्या एका पोलीस अधिकाऱ्यांवर दबाव टाकल्याप्रकरणी सीबीआयनं आठ दिवसांपूर्वी गुन्हा दाखल केलाय. यासंदर्भात बोलताना अनिल देशमुख म्हणाले, "देवेंद्र फडणवीसांनी दिल्लीच्या मदतीनं सीबीआय आणि ईडी या संस्थेला हाताशी धरुन महाराष्ट्राचं राजकारण अतिशय खालच्या स्तरावर आणलंय. मी त्यांना सांगू इच्छितो की, मी माझ्या अटकेची वाट पाहतोय."
देवेंद्र फडणवीस यांच्या इशाऱ्यावरुन : पुढं देशमुख म्हणाले, "तीन वर्षांपूर्वी अशा पद्धतीनं देवेंद्र फडणीस यांनी परमवीर सिंग आणि सचिन वाजे याला बरोबर घेतलं आणि त्यांना माझ्यावर आरोप करायला लावलं. त्या दोघांनी माझ्यावर आरोप केले होते. त्यांनी आरोप केल्यानंतर त्यांची चौकशीही झाली. चौकशी झाल्यानंतर केस हायकोर्टामध्ये गेली. त्यावेळी हायकोर्टानं निकाल दिलाय अनिल देशमुख यांच्या विरुद्ध कोणतेही पुरावे नाही. केवळ ऐकीव माहितीच्या आधारे अनिल देशमुख यांच्यावर आरोप झालेत. ते प्रकरण आटोपत असताना आता मी पोलीस अधिकाऱ्यांवर दबाव टाकल्याचं नवं कारस्थान रचलं गेलंय. भारतीय जनता पार्टीच्या नेत्याला अटक करा, अशा पद्धतीनं पोलीस अधिकाऱ्यावर दबाव टाकला असा त्यांचा आरोप आहे. हे सर्व देवेंद्र फडणवीसांचं कारस्थान आहे. तीन वर्षांपूर्वी त्यांनी अशाच पद्धतीनं माझ्यावर खोटा आरोप केला. मात्र, चौकशीला मी सामोरं जाईल", असं अनिल देशमुख म्हणालेत.
हेही वाचा -
- "माझ्या विरोधात नवं कारस्थान रचण्यात आलं...", अनिल देशमुखांचा देवेंद्र फडणवीसांवर आरोप - Anil Deshmukh
- "अनिल देशमुखांना नोटीस पाठवण्यात फडणवीसांचा हात", रोहित पवारांचा गंभीर आरोप, देशमुखांचाही उपरोधिक टोला... - Rohit Pawar On Devendra Fadnavis
- "अनिल देशमुख आणि मी नागपूरमुळंच..."; संजय राऊतांचा देवेंद्र फडणवीसांवर निशाणा - Sanjay Raut