अमरावती Comrades Marathon : धावण्याच्या स्पर्धेतील अतिशय कठीण समजली जाणारी कॉमरेड्स मॅराथॉन स्पर्धा दक्षिण आफ्रिकेतील डरबन इथं 9 जून रोजी पार पडणार आहे. या स्पर्धेसाठी देशभरातून 323 स्पर्धक सामील होत असून त्यात अमरावतीच्या सहा जणांचा समावेश आहे. 4 जून रोजी सायंकाळी अमरावतीहून मुंबईसाठी प्रस्थान करुन ते डरबन इथं पोहोचणार असल्याची माहिती अमरावती रोड रनर्सचे मुख्य मार्गदर्शक तथा अमरावती हाफ मॅराथॉनचे संचालक प्रशिक्षक दिलीप पाटील यांनी दिलीय.
अमरावतीमधून कोण होणार सहभागी : दिलीप पाटील यांच्यासह दीपमाला साळुंखे-बद्रे, पोलीस निरीक्षक अनिल कुरळकर, अतिरिक्त कार्यकारी अभियंता मंगेश पाटील, पोलीस कर्मचारी राजेश कोचे, पोलीस निरीक्षक सतिश उमरे असे एकूण सहा जण या स्पर्धेत सहभागी होणार आहेत.
कोण आहेत दिलीप पाटील : दिलीप पाटील हे महाराष्ट्र शासनाच्या विक्री कर विभागातून 2016 ला उपायुक्त म्हणून सेवा निवृत झाले आहेत. त्यांना लहापणापासूनच तंदुरुस्त राहण्याची आवड आहे. 2004 मध्ये पहिल्यांदा त्यांनी टाटा मुंबई मॅराथॉन मधून धावण्यास सुरुवात केली. नंतर त्यांनी मागं वळून पाहिलं नाही. आजपर्यंत त्यांनी देश विदेशातील 58 अर्ध आणि 30 मॅरॅथॉन पूर्ण केल्या आहेत. न्यूयॉर्क, शिकागो, लंडन, बर्लिन, आम्स्टरडॅम, मुनीच, दुबई, अबुधाबी, लेह-लडाख, स्वित्झर्लंड, पॅरिस आणि टोकियो मॅरॅथॉन मध्ये सहभाग नोंदवलाय. एवढेच नव्हे तर जगातील सर्वात कठीण आणि खडतर मानली जाणारी 90 किमीची कॉमम्रेड मॅरॅथॉन त्यांनी तब्बल आठ वेळा पूर्ण केलीय. 9 जून 2024 रोजी दक्षिण आफ्रिकेतील डरबन इथं होणाऱ्या कॉमरेड्स मॅरॅथॉन साठी सज्ज असल्याचं त्यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितलं. तसंच संपूर्ण भारतातून 323 धावपटू या स्पर्धेत सहभागी होत आहेत. त्यापैकी सहा धावपटू अमरावतीचे आहेत. 2023 ला मी आणि दीपमाला साळुंखे-बद्रे असे दोन जण सहभागी झालो होतो. परंतु या वर्षी पहिल्यांदाच अमरावती सारख्या शहरांमधून कॉमरेड्स मॅराथॉनसाठी सहा जण सहभागी होत असल्याचं त्यांनी सांगितलं.
कशी असते कॉमरेड्स मॅराथॉन स्पर्धा : कॉमरेड्स मॅरेथॉन ही 90 किलोमीटरची मॅरेथॉन स्पर्धा आहे. दक्षिण आफ्रिकेतील डरबन आणि पीटर मरीडसबर्ग या दोन शहरांदरम्यान ही स्पर्धा आयोजित करण्यात येते. या स्पर्धेत 90 किलोमीटर अंतर पार करताना सहा टप्पे असतात. ते सर्व टप्पे ठराविक वेळेत स्पर्धकांना पूर्ण करावे लागतात. 90 किलोमीटर अंतर बारा तासात पूर्ण करणाऱ्यांनाच पदक दिलं जातं. मॅराथॉनमध्ये धावण्यासाठी योग्य धावक मिळावेत या उद्देशानं अमरावती रोड रनर्स हा ग्रुप 2020 साली सुरू केलाय. आजपर्यंत ग्रूपमधील शंभरच्या वर धावपटूंनी विविध मॅराथॉनमध्ये सहभाग घेतलाय. 64 वर्षीय दिलीप पाटील सांगतात की, "गेल्या पाच महिन्यांपासून माझ्यासह आम्ही एकूण सहा जण धावण्याचा सराव करत आहोत."
आता मागील रेकॉर्ड मोडणार : राज्य सरकारच्या गृहनिर्माण विभागात उप अभियंता पदावर काम करीत असलेल्या दीपमाला साळुंखे-बद्रे यांनी सांगितलं, "गेल्या वर्षी मी कॉमरेड्स मॅराथॉनमध्ये सहभागी झाले होते. तेंव्हा 11 तास 50 मिनिटांत स्पर्धा पूर्ण केली होती. यावेळी भरपूर सराव केला असून मला माझा मागील रेकॉर्ड मोडून कमी वेळेत स्पर्धा पूर्ण करायची आहे. शरीरासोबतच मानसिकदृष्ट्या सुद्धा सशक्त असणं गरजेचं आहे. शरीराची झीज भरुन काढण्यासाठी सकस आणि प्रथिनेयुक्त आहार महत्त्वाचा आहे."
हेही वाचा :