अमरावती Soil and Water Conservation : सातपुडा पर्वत रांगेत वसलेल्या मेळघाटातील कुपोषण आणि स्थलांतराच्या विविध समस्यांवर त्या भागातील मृद आणि जलसंधारणाच्या माध्यमातून मात करता येईल का? या संदर्भात विभागीय प्रशिक्षण संस्था नाशिकमार्फत मृद आणि जलसंधारण अधिकारी वर्ग 2 यांचा विशेष दौरा आयोजित करण्यात आला होता. दोन दिवसीय दौऱ्यात मेळघाटातील शेतीची परिस्थिती आणि पद्धती जाणून घेतल्यानंतर या संदर्भातील अहवाल शासनाकडे सादर केला जाणार आहे.
अधिकाऱ्यांनी जाणून घेतल्या मेळघाटातील अडचणी : विभागीय प्रशिक्षण संस्था नाशिक मार्फत मृद व जलसंधारण विभागाचे एकूण 53 वर्ग 2 अधिकारी दोन दिवस मेळघाटात होते. मेळघाटात पावसाळ्यात भरपूर पाऊस पडतो. मात्र, या पावसाचं 75 टक्के पाणी वाहून जातं. त्यामुळं मेळघाटात मृद व जलसंधारण अत्यंत गरजेचं आहे. शासनाच्या वतीनं नरेगा अंतर्गत मृद व जलसंधारणाची कामं केली जात आहेत. असे असले तरी मेळघाटातील आदिवासी गावातील मृद व जलसंधारणाच्या समस्यांबाबत या अधिकाऱ्यांनी भावई व चिखलदरा येथील ग्रामस्थांशी संवाद साधला.
मृदा आणि जलसंधारणाच्या मेळघाटात अशा आहेत अडचणी : मेळघाटात उंच डोंगरावरून वाहणाऱ्या पाण्याबरोबरच शेतीसाठी उपयुक्त असणारी सुपीक मातीही मोठ्या प्रमाणात वाहून जाते. एका तांत्रिक अधिकाऱ्याकडे तीन ग्रामपंचायतींची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तीन ग्रामपंचायती अंतर्गत एकूण दहा गावांमध्ये सुरू असलेली कामं तांत्रिकदृष्ट्या योग्य असतील, असं होत नाही. यातून योजना राबवणे आणि गावकऱ्यांना मजुरी मिळवून देणे एवढेच काम होतं. मात्र, मृद व जलसंधारणाचे महत्त्वाचं उद्दिष्ट सर्वच ठिकाणी यशस्वी होत नसल्याचं अधिकाऱ्यांच्या लक्षात आलं.
असे केले जातात प्रयत्न : माती आणि जलसंधारणाचे नियोजन वरपासून खालपर्यंत केले जाते. डोंगराच्या उंच भागावर 'चर' खोदून मधल्या भागात दगडी बांध तयार केला जातो. त्यामुळे पाणी अडवण्यास मदत होऊन भूजल पातळी वाढते. त्यामुळंच या भागातील शेतकरी हे आडव्या पद्धतीनं पीक पेरणी करतात. ही पीक पेरणी ही मृदा आणि जलसंधारणासाठी अतिशय उपयुक्त आहे. आदिवासी बांधवांच्या या पारंपारीक शेती पद्धतीचा अभ्यास करण्यासाठी मृद आणि जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांनी मेळघाटाचा दौरा केला.
पिण्याच्या पाण्याची समस्या : मेळघाटात भरपूर पाऊस पडत असला तरी या ठिकाणी पाणी साठवण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आलेले नाहीत. गंभीर बाब म्हणजे मेळघाटात पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर आहे. दुर्गम भागात असलेल्या अनेक गावांमध्ये पावसाळ्यातही पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागत असल्याची परिस्थिती आहे. या दौऱ्यात अधिकाऱ्यांनी पिण्याच्या पाण्याच्या समस्येचीही दखल घेतली.
शासनाला प्रकल्प करणार सादर : "मृद आणि जलसंधारण विभागाचे हे प्रशिक्षण अधिकारी गावपातळीवरील समस्या समजून घेण्यासाठी दोन दिवसीय अभ्यास दौऱ्यासाठी मेळघाटात आले होते. अधिकारी स्वत: तळागाळात जाऊन मृदणी जलसंधारण संदर्भातील समस्या जाणून घेतल्या आहेत. या समस्यांवर नेमकं कसं काम करायचं, या उद्देशानं या अधिकाऱ्यांनी दोन दिवस मेळघाटातील जलसंधारणाच्या विकासकामांचं निरीक्षण केलं. या अभ्यास दौऱ्या संदर्भात प्रशिक्षण अधिकारी जो काही प्रकल्प अहवाल तयार करतील, तो शासनाला सादर केला जाईल," असं मंत्रालयातील उपसचिव तथा नाशिक प्रबोधिनीच्या संचालक जयरेखा निकुंभ यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितलं.
मेळघाटातील जैवविविधता या विषयांचा अभ्यास- "मेळघाटच्या दोन दिवसीय दौऱ्यात नाशिक प्रबोधिनी येथे प्रशिक्षण घेत असलेल्या राज्य सेवेतील अधिकाऱ्यांनी शाश्वत विकास वन्यजीव, पर्यावरण संवर्धन, मृद, जलसंधारण आणि मेळघाटातील जैवविविधता या विषयांचा अभ्यास केला. या नवीन अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना मला आनंद झाला. भविष्यात हे सर्व अधिकारी आपली जबाबदारी चोखपणे पार पाडतील," असा विश्वास महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळाचे माजी सदस्य तथा अमरावती प्रबोधिनी येथील प्रशिक्षक यादव तरटे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केला.
हेही वाचा