मुंबई : अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे असलेले घड्याळ चिन्ह विधानसभा निवडणुकीदरम्यान गोठवावे, अशा प्रकारची मागणी करणारी याचिका शरदचंद्र पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने शरद पवारांच्या पक्षाची ही मागणी फेटाळून लावलीय. शरद पवारांच्या मूळ पक्षाचे म्हणजेच राष्ट्रवादीचे जुने निवडणूक चिन्ह असलेले घड्याळ अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला वापरण्यास मनाई करावी, अशी मागणीही याचिकेत करण्यात आली होती. परंतु त्यावर निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयानं अजित पवारांच्या पक्षाला दिलासा दिलाय.
घड्याळ चिन्ह अजित पवारांच्या पक्षकडेच राहणार : येत्या विधानसभा निवडणुकीत अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवता येईल, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिलाय. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला हा मोठा धक्का मानला जात असून, या निर्णयामुळे अजित पवार यांच्या पक्षाला ऐन निवडणुकीच्या तोंडावर मात्र मोठा दिलासा मिळालाय. अजित पवारांनी बंड केल्यानंतर शरद पवारांकडे असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर दावा केला होता. त्यानंतर मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष याची मालकी अजित पवारांकडे असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात आला होता. त्यामुळे घड्याळ चिन्हदेखील अजित पवारांच्या पक्षाला देण्यात आले होते. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला तुतारी फुंकणारा माणूस हे चिन्ह देण्यात आले होते. मात्र, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या पक्षाने अजित पवारांच्या पक्षाला देण्यात आलेले घड्याळ चिन्ह गोठवण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयात केली होती. त्यावर मंगळवारी न्यायालयाने निकाल देत घड्याळ चिन्ह गोठवण्यास नकार दिला, त्यामुळे घड्याळ चिन्ह अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला वापरण्याची परवानगी कायम राहिली आहे.
ऐन निवडणुकीच्या तोंडावर याचिका : या याचिकेच्या सुनावणीदरम्यान अजित पवारांच्या वकिलांतर्फे या याचिकेच्या मागणीला जोरदार विरोध करण्यात आलाय. ऐन निवडणुकीच्या तोंडावर ही मागणी करता येणार नाही, आमच्या पक्षाच्या उमेदवारांना घड्याळ या चिन्हावर लढण्यासाठी पक्षातर्फे अधिकृत एबी फॉर्मदेखील उमेदवारांना देण्यात आल्याची माहिती वकिलांनी सर्वोच्च न्यायालयाला देऊन त्यांचे लक्ष वेधले.
हेही वाचा :