पुणे : सोलापूरमधील माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी येथील ग्रामस्थांनी ईव्हीएमवर आक्षेप घेत आज (3 डिसेंबर) बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याचं जाहीर केलं होतं. यासाठी ग्रामस्थांकडून संपूर्ण तयारी करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर प्रशासनाकडून गावात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले. गावात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनानं जमावबंदी लागू केली. तसंच जमावबंदीमध्ये मतदान झालं तर लोकांवर गुन्हे दाखल होतील, असा इशारा पोलिसांकडून देण्यात आला. त्यामुळं अखेर ही मतदान प्रक्रिया रद्द करण्यात आली. यावरच आता प्रसिद्ध वकील असीम सरोदे (Asim Sarode) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पोलिसांनी ग्रामस्थांना आपला लोकशाही हक्क वापरु द्यावा, असंही ते म्हणालेत.
काय म्हणाले असीम सरोदे? : यासंदर्भात बोलताना असीम सरोदे म्हणाले, "राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत जो निकाल लागलाय, त्याबाबत नागरिकांच्या मनामध्ये प्रचंड शंका निर्माण झाल्यात. असं असताना मारकडवाडी ग्रामस्थांनी बॅलेट पेपरवर मतदान करुन मतमोजणी करण्याचा निर्णय घेतला. यासंदर्भात त्यांनी तहसीलदारांकडं अर्जही केला. मात्र, त्यानंतर पोलिसांकडून जमावबंदी लागू करण्यात आली. सध्या गावात एकूण लोकसंख्येपेक्षा जास्त पोलीस तैनात करण्यात आलेत. हे लोक आपली प्रक्रिया शांततेत राबवत असताना पोलिसांचा हस्तक्षेप वाढविण्यात आला. पोलिसांनी गावातील लोकांना त्यांचा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर करु द्यावा."
पोलिसांनी गुन्हेगारीकरण करू नये : पुढे ते म्हणाले, "आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर करणे हा गावातील नागरिकांचा हक्क आहे. ते लोकशाहीच्या मार्गानं निषेध व्यक्त करत एक वेगळा प्रयोग करताय. त्यांच्या या प्रयोगामध्ये कुठेही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत नाही. त्यामुळं पोलिसांनी तिथं गुन्हेगारीकरण करू नये."
हेही वाचा -