मुंबई Absconding Criminal arrested : मुंबईच्या शिवडी पोलीस ठाण्यात 1983 मध्ये सशस्त्र दरोडा टाकल्या प्रकरणी शौकतअली इमाम शेख या आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपी शौकत अली याला 1983 मध्येच अटक करण्यात आली होती. त्यानंतर जामीन मिळाल्यावर फरार झाल्यानं आरोपी विरुद्ध सत्र न्यायालयानं 1987 मध्ये स्टँडिंग अजामीनपात्र वॉरंट जारी केलं होतं. गेल्या 37 वर्षांपासून फरार असलेल्या या आरोपीला पुण्यातील कात्रज येथून अटक करण्यात शिवडी पोलिसांना यश आल्याची माहिती पोलीस उपायुक्त संजय लाटकर यांनी दिली आहे.
आरोपी विरोधात अजामीनपात्र वॉरंट : आरोपी विरोधात अतिरिक्त सत्र न्यायालय कोर्ट क्रमांक 22 मुंबई यांचेकडून स्टँडिंग अजामीनपात्र वॉरंट शिवडी पोलिसांना प्राप्त झालं होतं. यानंतर पोलीस उपनिरीक्षक महाजन आणि टिबे, पोलीस शिपाई शेख आणि बडे हे रवाना झाले होते. सदर आरोपीचा पथकानं शोध घेतला असता तो त्याच्या राहत्या पत्त्यावर मिळून न आल्यानं गुप्त बातमीदारा मार्फत त्याच्या मुलाचा वरळी येथील पत्ता मिळवून त्या पत्त्यावर पथक गेलं. तिथं त्यांचा मुलगा अश्फाक शौकत बागवान उर्फ शेख हा वरळी येथील सिद्धार्थ नगर इथं मिळून आला. त्याच्याजवळ पथकानं चौकशी केली असता त्यानं सुरुवातीला उडवा उडवीची उत्तरं दिली. त्यानं त्याच्या वडिलांचं नाव शौकत इमाम बागवान असल्याचं सांगितलं. त्यानुसार पोलीस पथकानं गुप्त बातमीदाराकडून माहिती प्राप्त केली असता आरोपी हा त्याचा मुलगा वसीमयाच्या सोबत कात्रज पुणे इथं राहायला असल्याचं कळालं.
कात्रज घाटात मिळाला आरोपी : त्या अनुषंगानं पोलीस शिपाई शेख यांनी त्याच्या पत्नीचा मोबाईल नंबर मिळवून लोकेशन ट्रेस केलं. यानंतर मिळालेल्या लोकेशननुसार पुणे इथं जाऊन भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या पोलिसांची मदत घेऊन लोकेशन नुसार मिळालेल्या पत्त्यावर जाऊन चौकशी केली असता आरोपी हा पुण्याच्या कात्रज परिसरात मिळून आला. यानंतर आरोपीला ताब्यात घेऊन त्याचं नाव, पत्ता विचारलं असता त्यानं त्याच्या मुंबईतील वास्तव्याची कबुली दिली. त्याची चौकशी केल्यावर आरोपी हा शिवडी पोलीस ठाण्याच्या गुन्ह्यातील वॉन्टेड आरोपी असल्याचं समजलं. यानंतर त्याला पथकानं मुंबईत आणून अटक करण्यात आलीय.
हेही वाचा :