छत्रपती संभाजीनगर Raju Shetty And Abdul Sattar : अद्रक खरेदी धोरणाबाबत पावसाळी अधिवेशनात घोषणा झाली तरी, त्याची अंमलबजावणी न झाल्यानं शेतकरी नेते राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी शेतकऱ्यांसह पणन मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांची भेट घेतली. या भेटीत राज्यात जुने आणि नवीन अशी तफावत न करता अद्रकची (Ginger) सरसकट खरेदी करण्यात यावी अशा प्रकारचे निर्देश राज्यातील बाजार समितीला दिले आहेत. यासाठी तातडीने शासन निर्णय जारी केल्या जाईल असं स्पष्ट करत बाजार समिती आणि व्यापाऱ्यांनी याची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. या निर्णयाची अंमलबजावणी न करण्याऱ्या बाजार समिती, व्यापाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असा इशारा, मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिला आहे.
नवीन धोरणाची अंमलबजावणी होईना : अद्रक खरेदीबाबत शेतकऱ्यांची व्यापारी पिळवणूक करत होते. याबाबत अनेक तक्रारी राज्यसरकारला मिळाल्या होत्या. जुना अद्रक आणि नवीन अद्रक असा फरक करून शेतकऱ्यांची फसवणूक केली जात होती. जुना अद्रक असेल तर जास्त दर आणि नवीन असेल तर कमी अशी कोंडी केली जात होती. दरांमध्ये तफावत जरी केली जात असली तरी, सर्व सामान्यांना मात्र एकाच दरात तो विक्री केला जात आहे. त्यामुळं शेतकरी तोट्यात आणि व्यापारी अधिक नफा कमावत आहे. याबाबत पावसाळी अधिवेशनात आदेश देऊनही, कोरेगाव बाजार समिती व्यतिरिक्त राज्यात कोणत्याही बाजार समितीने आदेशाचे पालन केलं नाही. त्यामुळं पणन मंत्र्यांपर्यंत पुन्हा यावं लागलं अस स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सांगितलं.
एकाच दरात अद्रक खरेदी : राज्यातील अद्रक आणि इतर शेतमाल उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी आणि शासनाने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासंदर्भात राजू शेट्टी आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पणन मंत्री अब्दुल सत्तार यांची सिल्लोड येथे भेट घेतली. या भेटीत मंत्री अब्दुल सत्तार आणि शेतकरी संघटनेच्या नेत्यांमध्ये अद्रक दराबाबत चर्चा झाली. यावेळी अब्दुल सत्तार यांनी नवीन धोरण अंमलबजावणीबाबत माहिती जाहीर केली. राज्यातील सरकार हे शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून शेतकरी - शेतमजुरांना केंद्रबिंदू मानून राज्यसरकारची वाटचाल सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक क्रांतिकारी निर्णय घेतले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मागणीप्रमाणे आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी शेतकऱ्यांचा शेतमाल त्यांनी बांधावर अथवा बाजारात विकावा यासाठी शेतकऱ्यांना स्वातंत्र्य असेल असं सत्तार यांनी सांगितलं.
हेही वाचा -
- राजू शेट्टींचा लोकसभा निवडणुकीत पराभव का झाला? राज्यव्यापी बैठकीत 'स्वाभिमानी' करणार विचारमंथन - Swabhimani Shetkari Sanghtana
- संजय शिरसाट यांना पुन्हा हुलकावणी : अब्दुल सत्तार यांची छत्रपती संभाजीनगरच्या पालकमंत्री पदी वर्णी - Abdul Sattar New Guardian Minister
- आरक्षणावरून महायुतीत विसंवाद; मुस्लिम आरक्षणाबाबत मंत्री अब्दुल सत्तार आक्रमक, 'ही' केली मागणी - Abdul Sattar On Muslim Reservation