नागपूर : एका वकिलाने मुलाच्या मदतीने पक्षकार मित्राचीच हत्या केली. हरीष दिवाकर कराडे (६०) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर अश्विन मधुकर वासनिक आणि आविष्कार अश्विन वासनिक असे आरोपींचे नावं आहेत. जरीपटका पोलिसांनी आरोपी बाप आणि मुलाला अटक केली असून तपास सुरू केलेला आहे.
मित्र झाला वैरी : या प्रकरणातील मृतक हरीष दिवाकर कराडे हे वायुसेनेत नोकरीवर होते. काही वर्षांपूर्वी त्यांना एका प्रकरणात नोकरीतून निलंबित करण्यात आले होते. त्यावेळी हरीष दिवाकर कराडे यांची न्यायालयात वकील अश्विन वासनिक यांनी बाजू मांडली होती. त्यामुळे हरीष कराडे यांना त्यांची नोकरी देखील परत मिळाली होती. त्यानंतर या दोघांमध्ये कौटुंबीक संबंध निर्माण झाले होते. दोन वर्षांपूर्वी हरीष हे वायुसेनेतून सेवानिवृत्त झाले होते. एवढंच नाही तर हरीष कराडे आणि वकील अश्विन वासनिक रात्री उशिरापर्यंत दारू पित बसायचे. काल देखील दोघांनी दारू पार्टी आयोजित केली. मात्र, पैश्याच्या घेवाण-देवाणवरून दोघांमध्ये जोरदार वाद झाला, त्यानंतर आरोपी अश्विन वासनिकने मुलगा आविष्कार यांच्या मदतीने हरिष कराडेच्या मानेवर जोरदार कुऱ्हाडीने वार करून हत्या केली.
या प्रकरणी हरीष कराडे यांची पत्नी सोनाली हरीष कराडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून जरीपटका पोलीस ठाण्यात आरोपी वकील अश्विन व त्याच्या मुलाविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करून दोघांनाही अटक केली आहे.