बुलडाणा FIR On Sanjay Gaikwad : शिवसेना आमदार संजय गायकवाड मोठ्या वादात अडकण्याची शक्यता आहे. बुलडाणा येथे शिवजयंतीच्या दिवशी एका वृत्तवाहिनीशी बोलताना संजय गायकवाड यांनी आपल्या गळ्यातील माळेत वाघाचा दात असल्याचा दावा केला होता. गायकवाड यांच्या दाव्यानंतर वनविभाग या प्रकरणाची चौकशी करणार आहे. वनविभागानं संजय गायकवाड यांच्या गळ्यातील माळ जप्त केली आहे. आमदार गायकवाड यांनी वाघाची शिकार करुन त्याचा दात गळ्यातील माळेत बांधल्याचा दावा केला होता. त्यांच्या या वक्तव्यामुळं आता त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे.
वाघाच्या दातासारखी सदृश वस्तू वन विभागानं ताब्यात घेतली असून देहराडून येथील वाइल्ड लाइफ इन्स्टिट्यूटमध्ये डीएनए तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहे. - अभिजीत ठाकरे, वनपरिक्षेत्र अधिकारी
वाघाची शिकार केल्याचा दावा : बुलडाण्यात शिवजयंतीनिमित्त एका वाहिनीशी बोलताना संजय गायकवाड यांनी गळ्यातील माळेत वाघाचा दात असल्याचं वक्तव्य केलं होतं. "1987 मध्ये मी वाघाची शिकार करुन त्याचा दात काढून गळ्यातील माळेत घातला. तसंच मी वाघाची शिकार केली असून बिबट्या पळवून लावायचो," असा दावा त्यांनी केला आहे.
गायकवाड यांच्यावर कारवाईची शक्यता : 19 फेब्रुवारी रोजी बुलडाणा येथे शिवजयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला शिवसेनेचे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी हजेरी लावली. यावेळी आमदार गायकवाड शिवरायांच्या मावळ्याची वेशभूषा करुन तलवार हातात घेऊन कार्यक्रमस्थळी आले होते. डोक्यावर फेटा, गळ्यात मोत्यांची माळ आणि हातात तलवार असा त्यांचा पेहराव होता. यावेळी गायकवाड यांनी दावा केला की, "त्यांच्या गळ्यात एक माळ असून त्यात वाघाचा दात आहे. त्यांनी 37 वर्षांपूर्वी वाघाची शिकार करुन त्याची माळ तयार केली." दरम्यान, गायकवाड यांच्या वक्तव्याची वनविभागानं दखल घेतली असून याप्रकरणी कारवाई होण्याची शक्यता आहे.
अहवालाकडं लागलं सर्वांच लक्ष : बुलडाण्यात आमदार संजय गायकवाड यांनी दावा केलेली वाघाचा दात सदृश्य वस्तूही वनविभागानं जप्त केली आहे. आता वाघाच्या दातासारखी ही वस्तू डीएनए चाचणीसाठी 'वाइल्ड लाइफ इन्स्टिट्यूट इंडिया' डेहराडून येथे पाठवली जाणार आहे. तेथून या संदर्भातील अहवाल आल्यानंतर वस्तुस्थिती स्पष्ट होईल. डेहराडूनच्या अहवालानंतर संजय गायकवाड यांच्या गळ्यातील दात वाघाचा निघाल्यास त्यांच्या अडचणी वाढणार आहेत.
हे वाचलंत का :