सांगली : आटपाडीमध्ये ओढ्याला नोटांचा पूर आल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. 500 रुपयांच्या नोटा ओढ्यातून वाहून आल्याचा प्रकार घडला. यानंतर या नोटा गोळा करण्यासाठी ओढ्यामध्ये नागरिकांची मोठी झुंबड उडाली आहे. गावातल्या अंबाबाई ओढ्यामध्ये या नोटा वाहत आल्या आहेत. शनिवारच्या आठवडी बाजारानिमित्त आलेल्या नागरिकांना ओढ्यातून पाचशेच्या नोटा वाहत असल्याचं निदर्शनास आलं. यानंतर नागरिकांनी नोटा गोळा करण्यासाठी ओढ्यामध्ये उड्या घेतल्या. जवळपास दोन ते अडीच लाख रुपये या ओढ्यातून नागरिकांनी गोळा केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येतोय.
आठवडी बाजाराच्या दिवशीच ओढ्यात वाहत आल्या नोटा : घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, आटपाडी शहरात आज शनिवारचा आठवडा बाजार असतो. गावातल्याच अंबाबाई मंदिरा शेजारील सुख ओढा या ठिकाणी हा बाजार भरतो. बाजाराच्या निमित्तानं सकाळच्या सुमारास नागरिकांची ये-जा सुरू होती. सकाळी नऊ वाजताच्या सुमारास या ठिकाणाहून बाजारासाठी आलेल्या काही नागरिकांना ओढ्यातून नोटा वाहत असल्याची बाब निदर्शनास आली. यानंतर काही नागरिकांनी पाण्यामध्ये उतरुन त्या नोटा खऱ्या आहेत का ? याची चाचपणी केली. यामध्ये पाचशेच्या या नोटा खरे असल्याचं समजल्यानंतर ही बातमी वाऱ्यासारखी परिसरात पसरली. त्यानंतर सुख ओढ्यामध्ये नोटा गोळा करण्यासाठी नागरिकांनी धडाधड उड्या घेतल्या. जवळपास 100 ते 200 मीटर आसपासच्या परिसरामध्ये या नोटा आढळून येतो होत्या. यावेळी अनेक लोकांना पाचशेच्या दहा, पंधरा, वीस, पंचवीस आणि 50 नोटा हाताला लागल्या आहेत, अशी माहिती स्थानिक नागरिकांनी दिली.
या नोटा कोठून आल्या, याचा शोध सुरू : दरम्यान या घटनेनंतर आटपाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. यानंतर पोलिसांनी ओढ्यातून नागरिकांना बाहेर काढून या ठिकाणी ओढ्यात सापडत असलेल्या नोटा गोळा करण्याचं काम सुरू केलं. मात्र या नोटा कोठून आल्या ? कोणाच्या ? का टाकल्या ? हे अद्याप समजू शकलेलं नाही. मात्र या ठिकाणी सापडलेल्या पाचशेच्या सर्व नोटा खऱ्या असल्यानं नागरिकांची चांगलीच चंगळ झाली.
हेही वाचा :