नाशिक : राज्यात परतीच्या पावसाचा फटका सर्वाधिक नाशिक जिल्ह्याच्या शेतकऱ्यांना बसला आहे. 1 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबरला झालेल्या जोरदार पावसामुळं नाशिक जिल्ह्यातील 26 हजार हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं आहे. राज्यात एकूण 30 हजार हेक्टर पिकांचं नुकसान झाल्याचा आकडा समोर आला आहे.
पावसामुळं पिकांचं नुकसान : ऐन पीक कापणीच्या वेळेस परतीच्या पावसानं शेतकऱ्यांना मोठा तडाखा दिला आहे. राज्यात 30 हजार 506 हेक्टरवरील पिकांचं अतिवृष्टीमुळं अतोनात नुकसान झालं असून हातातोंडाशी आलेला घास पावसानं हिरावल्यानं शेतकरी हताश झाला आहे. या पावसामुळं नाशिक जिल्ह्यातील 26 हजार 338 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं आहे. त्या खालोखाल सांगली जिल्ह्यात 2 हजार 42 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झाल्याचं कृषी विभागानं सांगितलं. 1ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबर या काळात काढणीला आलेल्या कांदा, मका, कापूस, सोयाबीन, बाजरी, भात, ज्वारी, मूगसह भाजीपाल्याचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळं चार महिन्यांचे कष्ट वाया गेल्यानं बळीराजा हताश झाला आहे.
चार जिल्ह्यांना सर्वाधिक फटका : परतीच्या पावसाचा फटका राज्यातील चार जिल्ह्यांना सर्वाधिक बसलाय. यात नाशिक, सांगली, भंडारा आणि ठाणे या जिल्ह्यांचा समावेश आहे. एकूण 30 हजार 504 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं असून या नुकसानीचे कृषी विभागाने तातडीने पंचनामे केले आहेत. यात नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक 26 हजार 338 हेक्टर, सांगली 2 हजार 42 हेक्टर, भंडारा 1 हजार 28 तर ठाणे जिल्ह्यात 451 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झाल्याचा अंदाज कृषी विभागानं वर्तवला आहे.
अहवाल राज्य सरकारला पाठवणार : परतीचा पावसानं राज्यात सर्वाधिक नुकसान नाशिक जिल्ह्यात झाले आहे. याबाबत आम्ही तातडीने पंचनामे केले असून जवळपास 26 हजार हेक्टरवरील पिकांची हानी झाली आहे. या संदर्भातील अहवाल जिल्हा प्रशासना मार्फत राज्य सरकारला पाठवण्यात येणार आहे असं कृषी अधिकाऱ्यांनी सांगितलं.
भाजीपाला झाला महाग : परतीचा पावसाचा सर्वाधिक फटका भाजीपाल्याच्या भावावर झाला आहे. किरकोळ बाजारात सर्वच भाज्यांचे भाव वाढल्यानं स्वयंपाक घरामध्ये गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. किरकोळ बाजारात कांदा 60 ते 80 रुपये किलोने खरेदी करावा लागत आहे. बटाटा 60 रुपये किलो, मेथी जुडी 50, कोथिंबीर 40 जुडी, पालक 30 जुडी, टोमॅटो 80 रुपये किलो, भेंडी 70 रुपये किलो, मिरची 100 रुपये किलो, वांगे 80 रुपये किलो.
हेही वाचा -
- पीक विमा कंपनीच्या मनमानी कारभारावर कृषी विभागाचे गंभीर शेरे; अधिकाऱ्यांना खडसावत मुनगंटीवारांनी दिल्या 'या' सूचना - Pik Vima Yojana
- पीक विमा योजनेच्या नावाखाली शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक करण्याचा प्रयत्न केल्यास गय करणार नाही - धनंजय मुंडे - Dhananjay Munde
- 28 हजार वर्षांपूर्वी मानवानं घेतलं अळूचं पीक; दक्षिण पूर्व आशियातून जगभर झाला प्रसार; जाणून घ्या अळूची कहाणी - Alu Leaves Benefits and History