मुंबई : दक्षिण मुंबईतील एका रहिवाशाच्या मोबाईलवर त्यांना वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल ई-चलन दंड भरण्याची सूचना देणारा एसमेस प्राप्त झाला होता. एसमेसमध्ये ॲपची लिंक समाविष्ट होती, जी व्यक्तीला पेमेंट करण्यास सांगते. ॲप डाउनलोड केल्यावर त्यांच्या खात्यातून 3.02 लाख रुपये कट झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी गावदेवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस पुढील तपास करत असल्याची माहिती गावदेवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक भोसले यांनी सांगितलं आहे.
ॲप डाऊनलोड केल्याने झाला फ्रॉड : गावदेवी पोलिसांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार, तक्रारदार राजेश हनुमानदास बाहेती (वय 57) यांनी (दि. 25 फेब्रुवारी)रोजी त्यांच्या मोबाईलवर मेसेज आल्याचं सांगितलं. एसमेसमध्ये असं सूचित करण्यात आलं होतं की, वाहतूक विभागाने वाहतूक नियमांचं उल्लंघन करून राजेश यांच्या वाहनासाठी ई-चलन जारी करण्यात आलं आहे. राजेश बाहेती यांनी तक्रारीत म्हटलं आहे की, या एसमेससोबत (Vahanparivahn.apk) नावाच्या ॲपची लिंक होती, जी डाउनलोड करण्यास सांगितलं होतं. त्यानुसार त्यांनी हे ॲप डाऊनलोड करून, त्याद्वारे दंड भरण्याचा प्रयत्न केला. मात्र, राजेश यांना दंडाची रक्कम भरता आली नाही. उलट त्यांना लाखोंचा फटका बसला.
बँक खात्यातून एकूण 30 वेळा ट्रॅन्जेक्शन : राजेश बाहेती यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, (दि. 1 मार्च)रोजी बाहेती वरळी येथील त्यांच्या कार्यालयात असताना त्यांच्या बँक खात्यातून 10 हजार रुपये डेबिट झाल्याचा संदेश त्यांना आला. बाहेती यांना काही समजण्यापूर्वीच त्यांच्या बँक खात्यातून एकूण 3.02 लाख रुपये डेबिट झाले होते. यानंतर राजेश हनुमानदास बाहेती यांनी गावदेवी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, बाहेती यांच्या बँक खात्यातून एकूण 30 वेळा ट्रॅन्जेक्शन होऊन 3.02 लाख इतके रुपये डेबिट झाले.
पैशाचे व्यवहार बँकेत करावेत : पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, याप्रकरणी बाहेती यांच्या तक्रारीवरून गावदेवी पोलीस ठाण्यात माहिती आणि तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करून, या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. तक्रारदार हे पेडर रोड येथे राहत असून, त्यांचा व्यवसाय आहे. गावदेवी पोलिसांकडून नागरिकांना आवाहन करण्यात आलं आहे की, नागरिकांना मोबाईलवर आलेल्या मेसेजवरील कोणत्याही लिंकवर क्लिक करू नये. शक्यतो बँकेत अथवा संबंधित कार्यालयात जाऊन पैशाचे व्यवहार करावेत.
हेही वाचा :
2 मला अटक होण्याची शक्यता; पण मी लढत राहणार, आमदार रोहित पवारांचा निर्धार
3 "...असले साप उशाला घेऊन झोप येणार नाही", नेमकं काय म्हणाले भास्कर जाधव? वाचा सविस्तर