सातारा Crazy Dog Bite - साताऱ्यातील प्रमुख बाजारपेठांमध्ये धुमाकूळ घालत पिसाळलेल्या कुत्र्याने २८ जणांना चावा घेतला. या घटनेत अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सायंकाळी गर्दीच्या वेळी मोती चौक, राधिका चौक, कोटेश्वर मंदिर परिसरात हा थरार सुरू होता. नगरपालिकेच्या २५ मुकादमांचे पथक कुत्र्याच्या शोधार्थ रवाना करण्यात आलं आहे.
मोती चौकात सुरू झाला थरार - सातारा शहरात ऐन गणेशोत्सवाची धामधूम आणि गणेशभक्तांची गर्दी असताना एका पिसाळलेल्या कुत्र्याने टप्प्याटप्प्याने 28 जणांचा चावा घेतला. यामुळे सातारा शहरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. पिसाळलेले कुत्रे मोती चौक, राधिका चौक, कोटेश्वर मंदिर मार्गे शाहूपुरीकडून करंजे परिसराकडे गेल्याची माहिती मिळाल्यानंतर कुत्र्याच्या शोधार्थ मुकादामांचे २५ जणांचे पथक रवाना करण्यात आले.
चार तासात २८ जणांना चावा - गौरीच्या आगमनाच्या तयारीमुळे शहरात गर्दी असताना मोती चौकात एका पिसाळलेल्या कुत्र्याने लाटकर पेढेवाले दुकानाच्या परिसरात एकाचा चावा घेतला. पिसाळलेले कुत्रे हे भुरकट रंगाचे असून त्याच्या पाठीवर पांढऱ्या रंगाचा चट्टा असल्याची माहिती सातारा नगरपालिकेचे आरोग्य निरीक्षक प्रकाश राठोड यांनी दिली आहे. सायंकाळी साडेसहा ते रात्री साडेदहापर्यंत पिसाळलेल्या कुत्र्याचे चावासत्र सुरू होते.
पिसाळलेल्या कुत्र्यामुळे गणेशभक्त धास्तावले - सातारा शहरात गणेशोत्सवाच्या दरम्यान मोकाट कुत्र्यांचे विघ्न निर्माण झाल्याने गणेश भक्त धास्तावले आहेत. सातारा पालिकेने साडेसहा लाखाची कुत्र्याच्या निर्बिजीकरणाची निविदा काढली आहे. साताऱ्यातील एका संस्थेला हा ठेका देण्यात आला आहे. या संस्थेने आत्तापर्यंत अडीचशे कुत्र्यांचे निर्बिजीकरण केल्याची माहिती आहे. अर्थात कुत्री कधी पकडली. त्यांचे निर्बिजीकरण कधी झाले? हा गुलदस्त्यातला विषय आहे.
हेही वाचा..