सातारा Criminal Identification Parade : पुणे, नागपूरनंतर साताऱ्यात शनिवारी (दि. १०) रेकॉर्डवरील गुन्हेगारांना पोलीस ठाण्यात बोलावून त्यांची झाडाझडती घेण्यात आली. कराड उपविभागातील १९० गुन्हेगारांचे यावेळी 'डिजिटल क्राईम रेकॉर्ड' तयार करण्यात आला. तसेच प्रतिबंधात्मक कारवाई आणि कडक समज देऊन रात्री उशीरा त्यांना सोडण्यात आलं.
गुन्हेगारांची घेतली परेड : महायुतीच्या नेत्यांसोबत गुंडांचे फोटो व्हायरल झाल्यानंतर सराईत गुन्हेगारांची पोलीस हजेरी घेत आहेत. त्याच धर्तीवर शनिवारी कराडमध्ये पोलीस अधिकाऱ्यांनी रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांची परेड घेत कायद्याच्या भाषेत त्यांना दम भरला. गुन्हेगारीला उत्तेजन देणारे रिल्स करणाऱ्यांना कायद्याचा हिसका दाखवला जाईल, असा इशारा देताच अनेक गुंडांनी तिथल्या तिथं इनस्टाग्रामवरील रिल्स आणि अकाऊंट डिलीट केली.
डीवायएसपी कार्यालयात गुन्हेगार हजर : कराड उपविभागात समावेश असलेल्या कराड शहर, कराड ग्रामीण, उंब्रज, मसूर आणि तळबीड या पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील रेकॉर्डवरच्या गुन्हेगारांना शनिवारी डीवायएसपी कार्यालयात हजर राहण्याचा निरोप मिळाल्यानंतर सर्व गुन्हेगार शनिवारी हजर होते. मोकळ्या आवारात बारदान अंथरूण त्यांच्या बसण्याची सोय करण्यात आली होती. प्रत्येक पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांसाठी टेबल-खुर्ची मांडली होती. पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगार त्यांच्या समोर येऊन बसत होते.
१६ जण दोन वर्षांसाठी तडीपार : सराईत गुन्हेगारांचे फोटो काढून त्यांचे डिजिटल क्राईम रेकॉर्ड (डोजीअर) तयार करण्यात आले. तसेच सगळ्यांवर सीआरपीसी १०७, १०९ आणि ११० अन्वये प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. पोलिसांनी मागील सहा महिन्यांत २ टोळ्यांना मोक्का आणि १६ जणांना दोन वर्षांसाठी तडीपार केले आहे. कारवाई यापुढेही केली जाणार असल्याचा इशारा पोलीस अधीक्षक अमोल ठाकूर यांनी दिला.
हेही वाचा -