पिंपरी चिंचवड Pimpri Chinchwad Company : पिंपरी चिंचवड हिंजवडी या ठिकाणी तब्बल 150 कंपन्या असून 5 लाख कर्मचारी येथे काम करतात. हिंजवडीत परिसरात 1 लाखापेक्षा अधिक कार आणि इतर वाहने कामासाठी ये जा करतात. मागील दहा वर्षापासून येथील वाहने तासनतास वाहतूक कोंडीत अडकतात. एखादा किलोमीटर अंतर कापण्यासाठी तासभर लागत असल्यानं "कर्मचारी ऑफिस नको रे बाबा, त्या पेक्षा वर्क फ्रॉम होम बरं" अशी मागणी करत आहेत.
अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी : 150 पैकी तब्बल 37 कंपन्या राज्याबाहेर गेल्या आहेत. येथील सार्वजनिक वाहतूक सक्षम नसल्यामुळं भारतातील सर्वात जास्त चारचाकी, दुचाकी पुणे, पिंपरी चिंचवड मध्ये आहेत. एकूण आयटी कर्मचाऱ्यांमध्ये महिला मुलींचे प्रमाण जास्त आहे. या सर्वांना स्वतःच्या गाड्या घेऊन कामावर यावं लागतं. पुणे शहर, पिंपरी चिंचवडमधील त्यांच्या निवासी ठिकाणापासून किमान 10 ते 20 किमी त्यांना रोज ये जा करावी लागते. वाकड, भूमकर चौक, डांगे चौक येथील वाहतूक कोंडी आणि बेशिस्त वाहन चालकामुळं तसेच वाहतूक शाखेच्या वाहतूक नियंत्रण व्यवस्थेतील कर्तव्य शून्यता यामुळं येथे वाहतुकीला शिस्त लावण्यात अपयश आलंय.
आयटी पार्कसाठी स्वतंत्र धोरण : १९८५ ते १९९० च्या काळात पंतप्रधान राजीव गांधी यांनी दूरदृष्टी ठेवून महाराष्ट्रात पुणे पिंपरी चिंचवड येथे आयटी पार्कसाठी स्वतंत्र धोरण राबवलं. राजीव गांधी यांच्या हत्येनंतर संपूर्ण देशात आणि महाराष्ट्रात माहिती तंत्रज्ञान (IT) आणि इतर वाहन निर्मिती, मध्यम लघु उद्योगाच्या वाढीसाठी उद्योगस्नेही धोरण राबवण्यात किमान तीन दशके केंद्र आणि राज्यसरकारचं संपूर्ण उद्योग आणि कामगार धोरणाकडं दुर्लक्ष झालंय.
मेट्रो प्रकल्पावर १३ हजार कोटी रुपये खर्च : या काळात काँग्रेस आणि भाजपाची सरकारे आलटून पालटून सत्तेवर होती. लोकसभा आणि विधानसभा प्रतिनिधी यांनी या मोठ्या कालखंडात माहिती तंत्रज्ञान आणि वाहन उद्योगाच्या समस्या समजून घेतल्या नाहीत. लोकशाहीमध्ये सभागृहात एकमेकांच्या उखाळ्या काढणे, मोठ मोठे प्रकल्प आणून स्मार्ट सिटीच्या नावाखाली अर्धवट प्रकल्प राबवण्यात आले. आज पिंपरी चिंचवड पुण्यामध्ये मेट्रो प्रकल्पावर १३ हजार कोटी रुपये खर्च होऊनही २००८ पासून सुरुवात केलेला हा सार्वजनिक वाहतूक सेवेचा प्रकल्प पांढरा हत्ती ठरत आहे. या प्रकल्पाचा फायदा ना हिंजवडी आयटीच्या तिन्ही फेजला होणार आहे, ना नव्याने उभारणी केलेल्या चाकण, तळेगाव औद्योगिक कंपन्यांना होणार आहे. चाकण, तळेगाव एमआयडीसीतील कंपन्या आणि कामगार त्रस्त आहेत.
उद्योग धंद्याचे स्थलांतर रोखलं जाणार नाही : आयटी कंपनीतील एकूण अंदाजे चार लाख कामगार कामावर जाण्यासाठी सार्वजनिक वाहतूक सेवा राज्यकर्त्यांना सक्षम करता आली नाही. त्यामुळं मालकीच्या दुचाकी, चारचाकी घेऊन कामावर जाण्यासाठी त्यांची गर्दी वाढली. पिंपरी चिंचवड शहरातील दिशाहीन आणि अपूर्ण असलेले अनेक प्रकल्प, वाहतूक कोंडी अनेक समस्यामुळं येथील उद्योग धंद्याचे स्थलांतर रोखलं जाणार नाही.
कोणाचं राजकारण कारणीभूत ? : मागील तीन दशकात गरवारे, टाटा मोटर्स, बजाज, फोर्स मोटर्स, इंडियन कार्ड क्लोदींग, फर्माईका, जनरल मोटर्स, टाटा नॅनो प्लांट आदी अनेक कंपन्यांनी शहर सोडलं आहे, रबर,प्लास्टिक, फौंड्री व इतर पुरवठादार कंपन्या गुजरात, तामिळनाडू, उत्तराखंड येथे स्थलांतरित झाल्या आहेत. इथे कंपन्यांची आणि नागरिकांची मागणी असूनही मागील तीन दशकात आंतरराष्ट्रीय विमानतळ होऊ शकला नाही, याला कोणाचं संकुचित राजकारण कारणीभूत आहे.
37 कंपन्या राज्याबाहेर स्थलांतरीत : केरळ, गोवा, तामिळनाडू, गुजरात, आंध्रप्रदेश, कर्नाटक येथे उद्योग आणि नागरिकांसाठी आंतरराष्ट्रीय, मालवाहू प्रवासी विमान वाहतूक यासाठी मागील तीन दशकात मोठं विमानतळ निर्माण करण्यात आलं. हिंजवडी आयटी पार्कमध्ये इन्फोसीस, विप्रो, टीसीयस, महिंद्रा, टीसीएस अशा अनेक नामांकित कंपन्या आहेत. या ठिकाणी हजारोच्या संख्येने राज्यभरातील तसेच देशभरातील लोक काम करतात. मात्र, हे कर्मचारी वाहतूक कोंडीत अडकत असल्यानं कंपन्यांचं आर्थिक नुकसान होत आहे. पावसाळ्यात तर वाहतूक कोंडीची समस्या अजून गंभीर होते. त्यामुळं 37 कंपन्या राज्याबाहेर स्थलांतरीत होत आहेत.
महाराष्ट्र विकसित झाला तर.... : हीच समस्या चाकण, रांजणगाव, तळेगाव आदी औद्योगिक क्षेत्रात निर्माण होत आहे. येथील विजेचे लपंडाव, वाहतूक कोंडी, विद्युत दरवाढ, सुलभा सार्वजनिक वाहतूक व्यवस्था प्रत्येक विशिष्ट उद्योगासाठी व्हेंडर पार्क, कामगारांना स्वस्त घरे, पुरेसे पाणी व्यवस्थापन आदी मुलभूत समस्यांकडं राज्यकर्ता आणि विरोधी पक्ष विधानसभेत किंवा लोकसभेत एकत्रितपणे गुणात्मक व्हिजन मिशन घेऊन उद्योगस्नेही, कामगार स्नेही धोरण घेत नाही, तोपर्यंत एकमेकाला दोष द्यायचे, एकमेकाच्या विरोधात रस्त्यावर यायचे, घोषणा बाजी, निषेध करायचे पण उपयोग काय होणार?. त्यापेक्षा उद्योगाचे स्थलांतर का होत आहे, आम्ही काय केलं पाहिजे, यासाठी लोकप्रतिनिधींनी तज्ञ लोकांना एकत्र करून अभ्यास गट नेमावा, राज्य सरकारनं महाराष्ट्र विकसित करण्यासाठी मेहनत घ्यावी, महाराष्ट्र विकसित झाला तर विकसित भारत निर्माण होईल.
ट्रिपल इंजिनचे आणखी एक अपयश : पुणे शहरातील हिंजवडी येथील काही कंपन्या या आत्ता राज्याच्या बाहेर जाणार असल्याचं सांगितलं जातं आहे. याबाबत सुळे म्हणाल्या की हे महाराष्ट्राचे ट्रिपल इंजिन चे आणखी एक अपयश आहे.हिंजवडी आय टी पार्क ही पवार साहेबांनी दूरदृष्टीने उभी केली आहे.तिथल्या मूलभूत सुविधा या संदर्भात मी अनेक प्रयत्न केले पण सरकार गंभीर नाही फक्त घरं,पक्ष फोडण्यात हे सरकार व्यस्त आहे.पुण्यात ड्रग्स माफिया आणि होणारे खून हे या सरकार चे अपयश आहे.पाण्याची परिस्थिती गंभीर आहे.आज राज्यात दुष्काळ आहे.या बद्दल मी सातत्याने बोलत आहे.अस यावेळी सुळे म्हणाल्या आहे.
हे सरकारचं दुर्दैव : काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर म्हणाले, हिंजवडी आयटी पार्क अनेक नामवंत कंपन्या आहेत. या कंपन्यांमध्ये हजारो कर्मचारी कार्यरत आहेत. त्यामुळं या भागात वाहतूक कोंडी होणार नाही. याकडं पोलिसांनी आणि महापालिकेने सुरुवातीपासूनच गांभीर्यानं पाहणं आवश्यक होतं. ते झाले नाही म्हणून आज अनेक कंपन्या पुण्याबाहेर आणि राज्याबाहेर गेल्या आहेत. आणखी काही कंपन्या पुण्याबाहेर स्थलांतरित होण्याचा विचार करीत आहेत. पण, राज्याच्या उद्योग मंत्र्यांना याची काहीही माहिती नाही, हे सरकारचं दुर्दैव आहे.
कामाचा निम्मा वेळ प्रवसात : कुठल्याही सर्वसामान्य माणसाला सकाळी घरून ऑफिसला जायला दोन दोन तास लागत आहेत. तर ऑफिसमधून घरी येताना सुद्धा तेवढाच कालावधी लागत आहे. त्यामुळं कामाचा निम्मा वेळ प्रवसात जात आहे. पुणेकरांची जीवनशैली सुसह्य करण्यासाठी पालिकेनं, वाहतूक पोलिसांनी कार्यरत रहायला हवे. पुढच्या ४०-५० वर्षाचे नियोजन करून काम करायला हवं. याकडं अक्षम्य दुर्लक्ष झाल्यानेच अनेक प्रश्न उद्भवले आहेत, असं रवींद्र धंगेकर यांनी सांगितलं.
हेही वाचा -