मुंबई - मुंबईसह ठाणे आणि भिवंडीतील नागरिकांना पुढचे पाच दिवस पाणी जपून वापरावे लागणार आहे. त्याला कारण म्हणजे बृहन्मुंबई महापालिकेसह ठाणे आणि भिवंडीला पाणीपुरवठा करणाऱ्या पिसे धरणातील न्यूमॅटिक गेट सिस्टीममध्ये बिघाड झाल्याने या तिन्ही महानगरांच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे. महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार, पिसे धरणातील न्यूमॅटिक गेट सिस्टीममध्ये बिघाड झाल्याने 1 ते 5 डिसेंबरपर्यंत याच्या दुरुस्तीचे काम चालणार आहे. या तातडीच्या दुरुस्ती कामामुळे मुंबई शहर आणि उपनगरांसह बृहन्मुंबई महापालिकेमार्फत ठाणे आणि भिवंडी महानगरपालिकेस होणाऱ्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे.
पिसे धरणातील बिघाडामुळे तिन्ही महापालिकांवर परिणाम : बृहन्मुंबई महानगरपालिकेची स्वतःची धरणं आणि तलाव आहेत. यातील महत्त्वाच्या धरणांपैकी पिसे धरणातील न्यूमॅटिक गेट सिस्टीममध्ये बिघाड झाल्याने याचा परिणाम पाणीपुरवठ्यावर होणार आहे. मुंबई महापालिका, मुंबई शहर आणि पूर्व-पश्चिम दोन्ही उपनगरांसह आपल्या मालकीच्या एकूण पाणीसाठ्यातील ठराविक पाणी ठाणे महानगरपालिका आणि भिवंडी महानगरपालिकेला देखील मिळते. अशातच पिसे धरणातील बिघाडामुळे या तिन्ही महानगरपालिकांना होणाऱ्या पाणीपुरवठ्यात 10 टक्के पाणीकपात करण्याचा निर्णय बृहन्मुंबई महापालिकेने घेतलाय.
मुंबई महापालिकेच्या एकूण पाणीसाठ्यात घट : एका बाजूला तांत्रिक कारण असले तरी दुसऱ्या बाजूला मात्र मुंबई महापालिकेच्या एकूण पाणीसाठ्यात घट होत असल्याचे दिसून येते. पावसाळा संपून अवघे दोन महिने उलटले असताना मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांतील पाण्याची पातळी 16 टक्क्यांनी घसरलीय. शुक्रवारी 29 नोव्हेंबर रोजी सातही तलावांचा एकत्रित पाणीसाठा सप्टेंबरमधील 100 टक्क्यांवरून 84 टक्क्यांवर आलाय. गेल्या वर्षीच्या तुलनेत पाण्याची पातळी वाढलीय. पण, ही पाणी पातळी 2022 सालातील पाणी पातळीपेक्षा कमी आहे. नोव्हेंबर 2022 मध्ये पालिकेचा एकूण पाणीसाठा 84.7 टक्के इतका होता. तेच 2023 मध्ये नोव्हेंबर महिन्यात 80.1 टक्के पाणीसाठा होता. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात शहराला पाणीकपातीचा सामना करावा लागला होता.
मागील वर्षाच्या तुलनेत यंदाचा पाणीसाठा थोडा चांगला: 14.47 लाख दशलक्ष लिटर पाणी साठविण्याची एकत्रित क्षमता असलेल्या सात तलावांमधून मुंबईसह ठाणे आणि भिवंडी शहराला पाणी मिळते. यंदाच्या पावसाळ्याच्या अखेरीस तलाव जवळजवळ भरले होते आणि पाणीसाठा 14.40 लाख दशलक्ष लिटरपेक्षा जास्त झाला होता. मागील वर्षाच्या तुलनेत या वर्षीचा पाणीसाठा थोडा चांगला असला तरी मात्र शहराच्या गरजा तलावांच्या क्षमतेपेक्षा जास्त असल्याने पुढील काळात पाणीकपात होण्याची शक्यता वर्तवली जातेय.
मुंबईला दररोज 3,850 दशलक्ष लिटर पाणी: 4,500 दशलक्ष लिटर पाण्याच्या मागणीच्या तुलनेत मुंबईला दररोज 3,850 दशलक्ष लिटर पाणी मिळते. 2021, 2022 आणि 2023 या वर्षांमध्ये पावसाळ्यात तलाव जवळजवळ 100 टक्के भरले होते. मात्र तरीही शहराच्या काही भागांना पाणीटंचाईचा सामना करावा लागला. दिवसेंदिवस मुंबई शहराची लोकसंख्या देखील वाढत असल्याने महानगरपालिकेला मुंबई शहर आणि उपनगरांसह ठाणे, भिवंडी महापालिकेला पाणीपुरवठा करताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.
हेही वाचा-