नवी दिल्ली U19 World Cup Final : ऑस्ट्रेलियानं अंडर 19 विश्वचषक 2024 चं विजेतेपद पटकावलं आहे. दक्षिण आफ्रिकेतील बेनोनी येथे खेळल्या गेलेल्या अंडर-19 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारताचा 79 धावांनी पराभव केला. ऑस्ट्रेलियानं 84 दिवसांत दुसऱ्यांदा भारताला अंतिम फेरीत पराभूत केलं आहे. याआधी टीम इंडियाला वर्ल्ड कप 2023 च्या फायनलमध्ये पराभवाला सामोरं जावं लागलं होतं.
भारतासमोर 254 धावांचं लक्ष्य : अंडर 19 विश्वचषकात भारतानं सर्वाधिक पाच वेळा या स्पर्धेचे विजेतेपद पटकावलं आहे. बेनोनी येथील विलोमूर पार्क येथे खेळाल्या गेलेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारतासमोर 254 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. आदर्श सिंग (47) मुरुगन अभिषेक (42) वगळता इतर खेळाडू कांगारू गोलंदाजांसमोर टिकू शकले नाहीत. मुशीर खान (22) मोठी खेळी करू शकला नाही. अर्शीन कुलकर्णी (3), कर्णधार उदय सहारन (8), प्रियांशू मोलिया (9), सचिन धस (8) या खेळाडूंना दुहेरी आकडा गाठता आला नाही. ऑस्ट्रेलियातर्फे महाली बियर्डमन आणि राफे मॅकमिलन यांनी प्रत्येकी तीन गडी बाद केले. कॅलम विडलरनं दोन गडी बाद केले.
रजस सिंगनं केल्या सर्वाधिक धावा : प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियानं 50 षटकांत 7 गडी गमावून 253 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघ 43.5 षटकांत सर्वबाद झाला. अंडर-19 विश्वचषकाच्या अंतिम फेरीतील ही सर्वात मोठी धावसंख्या आहे. यापूर्वीची सर्वोच्च धावसंख्या 242/3 होती, जी इंग्लंडनं 1998 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध केली होती. ऑस्ट्रेलियाकडून हरजस सिंगनं सर्वाधिक धावा केल्या. त्यानं 64 चेंडूत 55 धावांची खेळी केली. त्यानं तीन चौकारासह तब्बल तीन षटकार ठोकले. कर्णधार ह्यू वेबेन (48) सलामीवीर हॅरी डिक्सन (42) धावा केल्या . सॅम कॉन्स्टास खातं उघडता आलं नाही. रायन हिक्सनं 20, चार्ली अँडरसनने 13 आणि राफ मॅकमिलननं 2 धावांचे योगदान दिलं. ऑलिव्हर पीक 46 आणि टॉम स्ट्रेकर 8 धावांवर नाबाद राहिला. भारताकडून राज लिंबानीनं तीन तर नमन तिवारीनं दोन बळी घेतले. मुशीर खान आणि सौम्या पांडे यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.
भारताचं स्वप्न भंग : कांगारूंनी भारतीय संघाचं वर्षभरात तिसऱ्यांदा विश्वचषक जिंकण्याचं स्वप्न भंग केलं आहे. गेल्या वर्षी जूनमध्ये ऑस्ट्रेलियानं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत भारताचा पराभव केला होता. त्यानंतर गेल्या वर्षी 19 नोव्हेंबर रोजी कांगारूंनी एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम फेरीत भारतीय संघाचा पराभव केला होता. आता 85 दिवसांनंतर ऑस्ट्रेलियानं टीम इंडियाचा तिसऱ्यांदा विजेतेपदाच्या सामन्यात पराभव केला आहे.
ऑस्ट्रेलियाचं चौथे विजेतेपद : अंडर-19 विश्वचषक स्पर्धेतील ऑस्ट्रेलियाचं हे चौथे विजेतेपद आहे. याआधी त्यांनी 1988, 2002, 2010 मध्येही विजेतेपद पटकावलं होतं. ऑस्ट्रेलियानं 14 वर्षांनंतर अंडर-19 विश्वचषक जिंकला आहे. तर भारत पाच वेळा चॅम्पियन आहे. 2000, 2008, 2012, 2018, 2022 मध्ये भारतानं विजेतेपदावर कब्जा केला होता. यासह ऑस्ट्रेलियानं सलग दुसरा अंडर-19 विश्वचषक जिंकण्याचा भारताचा इरादाही उधळला. आतापर्यंत केवळ पाकिस्तानलाच सलग दोनदा अंडर-19 विश्वचषक जिंकता आला आहे.
संभावित प्लेइंग 11 :
- भारत - आदर्श सिंग, अर्शिन कुलकर्णी, मुशीर खान, उदय सहारन (कर्णधार), प्रियांशू मोलिया, सचिन धस, अरावेली अवनीश (यष्टीरक्षक), मुरुगन अभिषेक, राज लिंबानी, नमन तिवारी, सौम्य पांडे.
- ऑस्ट्रेलिया - ह्यू वायबगेन (कर्णधार), सॅम फॉन्स्टस, हरजस सिंग, हॅरी डिक्सन, रायन हिक्स (यष्टीरक्षक), टॉम कॅम्पबेल, कॅलम विडलर, राफ्ट मॅकमिलन, हरकिरत सिंग बाजवा, चार्ली अँडरसन, महली बियर्डमन.
हे वाचलंत का :