मुंबई Ranji Trophy Final 2024 : मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर 41 वेळचा विजेता मुंबई आणि दोन वेळचा चॅम्पियन विदर्भ यांच्यात यंदाच्या रणजी ट्रॉफीचा अंतिम सामना खेळला जातोय. विदर्भाचा कर्णधार अक्षय वाडकरनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर प्रथम फलंदाजी करताना मुंबईनं पहिल्या डावात 224 धावा केल्या. प्रत्युत्तरात विदर्भाचा पहिला डाव 105 धावांत आटोपला. त्यानंतर दुसऱ्या डावात मुंबईनं 418 धावा केल्या. त्यांची एकूण आघाडी 537 धावांची झाली. विदर्भासमोर 538 धावांचं हिमालयाइतकं लक्ष्य ठेवलं. प्रत्युत्तरात विदर्भानं आतापर्यंत दुसऱ्या डावात एकही विकेट न गमावता 52 धावा केल्या आहेत. अथर्व तायडे 27 तर ध्रुव शौरी 22 धावा करुन खेळत आहेत.
मुंबई आजच होऊ शकते विजयी : मुंबईचा संघ आजच पुन्हा या स्पर्धेचा विजेता होऊ शकतो. कारण मुंबईला सामना जिंकण्यासाठी 10 विकेट्सची गरज आहे. तर विदर्भाला विजेतेपदासाठी 538 धावांचं मोठं लक्ष्य गाठायचं आहे. या सामन्याला अजून दोन दिवसांचा खेळ शिल्लक आहे. मात्र विदर्भ संघासाठी सामना अनिर्णित ठेवणं म्हणजे पराभवासारखंच ठरेल. कारण मुंबई संघाला पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर विजेता ठरेल.
विदर्भाला हिमालयाइतकं आव्हान : या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर मुंबई संघानं प्रथम फलंदाजी करत 224 धावा केल्या, ज्यात शार्दुल ठाकूरच्या अर्धशतकाचा समावेश होता. त्याचवेळी विदर्भ संघ पहिल्या डावात 105 धावा करुन गडगडला. अशा प्रकारे मुंबईला पहिल्या डावाच्या आधारे 119 धावांची आघाडी मिळाली. यानंतर मुंबईचा संघ दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी उतरला तेव्हा मुशीर खानचं शतक, श्रेयस अय्यरच्या 95 धावा, कर्णधार अजिंक्य रहाणेच्या 73 धावा आणि शम्स मुलानीच्या 50 धावांच्या जोरावर 418 धावा केल्या. अशाप्रकारे विदर्भाला विजयासाठी 538 धावांचं लक्ष्य दिलंय.
हेही वाचा :