नवी दिल्ली Pakistan vs Bangladesh Test : पाकिस्तान क्रिकेट संघासाठी सध्या काहीही चांगलं घडत नसल्याचं दिसतंय. आधी बांगलादेशविरुद्ध घरच्या मैदानावर लाजिरवाणा पराभव झाला आणि आता आयसीसीनं त्यांना मोठी शिक्षा दिली आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-25 च्या पॉइंट टेबलमध्ये त्यांचं मोठं नुकसान झालं आहे. रावळपिंडी कसोटीदरम्यान स्लो ओव्हर रेटमुळं आयसीसीनं त्यांचे गुण कापले आहेत. पाकिस्तानच नाही तर बांगलादेशलाही दंड ठोठावण्यात आला आहे.
Pakistan docked 6 WTC Points due to slow overrate against Bangladesh. pic.twitter.com/2byo7V6Q5r
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) August 26, 2024
पाकिस्तान आणि बांगलादेशचे गुण कापले : बांगलादेशनं रविवारी पाकिस्तानचा 10 गडी राखून पराभव करत इतिहास रचला. पाकिस्तानविरुद्धच्या कसोटीतील हा त्याचा पहिलाच विजय आहे. या सामन्यानंतर आयसीसीनं पाकिस्तानचे 6 गुण कापले असून संपूर्ण संघाला मॅच फीच्या 30 टक्के दंड ठोठावला आहे. दुसरीकडे, बांगलादेशचेही 3 गुण वजा करण्यात आले आहेत. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेतील गुण वजा म्हणजे अंतिम फेरीत पोहोचण्याच्या दोन्ही संघांच्या आशा मावळल्या आहेत.
आयसीसीनं निवेदनात काय म्हटलं : आयसीसीनं सोमवारी आपल्या निवेदनात म्हटलं की, 'पाकिस्ताननं कसोटीदरम्यान सहा षटकं कमी टाकल्याबद्दल सहा जागतिक कसोटी चॅम्पियनशिप गुण गमावले, तर पाहुण्या बांगलादेशनं तीन षटकं कमी गोलंदाजी केल्याबद्दल त्यांचे तीन गुण कापले गेले.' तसंच पाकिस्तानला मॅच फीच्या 30 टक्के, तर बांगलादेशला 15 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे.
Pakistan and Bangladesh docked crucial #WTC25 points for slow over-rates in the Rawalpindi Test.#PAKvBANhttps://t.co/aRu7icDYHs
— ICC (@ICC) August 26, 2024
बांगलादेशचं मोठं नुकसान : आयसीसीनं गुण कापल्यानंतर पाकिस्तानचे गुण 16 पर्यंत घसरले, ज्यामुळं त्यांची गुण टक्केवारी (PCT) 22.22 वर घसरली. दरम्यान, पाचव्या स्थानावर पोहोचलेल्या बांगलादेशचा पीसीटी 35 वर घसरला आणि ते सातव्या स्थानावर घसरले. पॉइंट टेबलमध्ये आठव्या क्रमांकावर असलेला पाकिस्तान केवळ वेस्ट इंडिजच्या पुढं आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या चालू चक्रात पाकिस्तानचे आठ कसोटी सामने शिल्लक आहेत, तर बांगलादेश या कालावधीत आणखी सात कसोटी सामने खेळणार आहे.
शाकिबलाही दंड : दरम्यान, बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शकीब अल हसनलाही आयसीसीनं पाकिस्तानचा यष्टिरक्षक मोहम्मद रिझवानच्या दिशेनं चेंडू फेकल्याबद्दल फटकारलं आहे. पाकिस्तानच्या दुसऱ्या डावातील 33व्या षटकात शाकिबनं चेंडू रिझवानच्या दिशेनं फेकला होता. 'शाकिबला त्याच्या मॅच फीच्या 10 टक्के दंड आणि आयसीसीच्या आचारसंहितेच्या लेव्हल 1 चं उल्लंघन केल्याबद्दल एक डिमेरिट पॉइंट ठोठावण्यात आला आहे,' असं आयसीसीनं म्हटलं आहे.
हेही वाचा :