लखनऊ IPL 2024 LSG vs RR : संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्स (RR) संघानं इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2024 च्या हंगामात 8 वा विजय नोंदवून प्लेऑफमध्ये प्रवेश मिळवलाय. शनिवारी झालेल्या सामन्यात राजस्थाननं लखनऊ सुपर जायंट्सचा (LSG) 7 गडी राखून पराभव केला. या विजयासह राजस्थान संघाचे आता 16 गुण झाले असून ते गुणतालिकेत अव्वल स्थानावर कायम आहेत. हे गुण प्लेऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी पुरेसे आहेत. मात्र पुढील विजय राजस्थान संघाचा प्लेऑफमधील अधिकृत प्रवेश निश्चित करेल.
राजस्थानचा शाही विजय : राजस्थाननं या हंगामात आतापर्यंत 9 पैकी 8 सामने जिंकले आहेत. केएल राहुलच्या नेतृत्वाखालील लखनऊ संघानं आतापर्यंत 9 पैकी 5 सामने जिंकले आहेत. यासह हा संघ गुणतालिकेत आता चौथ्या स्थानावर आहे. हा सध्याचा सामना लखनऊच्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी इकना स्टेडियमवर खेळला गेला. ज्यामध्ये लखनऊच्या संघानं नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना राजस्थानसमोर 197 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. प्रत्युत्तरात राजस्थान संघानं 19 षटकांत 3 गडी गमावून 192 धावा करत सामना जिंकला. संघासाठी कर्णधार संजू सॅमसननं 33 चेंडूत 71 धावांची नाबाद खेळी तर ध्रुव जुरेलनं 34 चेंडूत 52 धावांची नाबाद खेळी खेळली. याशिवाय जोस बटलरनं 34 आणि यशस्वी जैस्वालनं 24 धावा केल्या. लखनऊकडून यश ठाकूर, मार्कस स्टॉइनिस आणि अमित मिश्रानं 1-1 बळी घेतला.
लखनऊची समाधानकारक मजल : तत्पुर्वी नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना लखनऊ संघानं 5 गडी गमावून 196 धावा केल्या. कर्णधार केएल राहुलनं 31 चेंडूत अर्धशतक केलं. मात्र 48 चेंडूत 76 धावा करुन तो बाद झाला. त्याच्याशिवाय दीपक हुडानं 31 चेंडूत 50 धावांची खेळी केली. एकवेळ लखनऊ संघानं 11 धावांत 2 विकेट गमावल्या होत्या. मात्र त्यानंतर कर्णधार राहुल आणि दीपक यांच्यात 62 चेंडूत 115 धावांची भागीदारी झाली. तर राजस्थान संघाकडून संदीप शर्मानं सर्वाधिक 2 बळी घेतले. याशिवाय आवेश खान, ट्रेंट बोल्ट आणि अश्विन यांना प्रत्येकी 1 बळी मिळाला.
लखनऊ दुसऱ्यांदा पराभूत : या हंगामातील लखनऊ आणि राजस्थान यांच्यातील ही दुसरी लढत होती. यापूर्वीचा सामना 24 मार्च रोजी झाला होता. ज्यात राजस्थान संघानं 20 धावांनी विजय मिळवला होता. अशाप्रकारे राजस्थाननं या मोसमात दुसऱ्यांदा लखनऊचा दणदणीत पराभव केलाय.
हेही वाचा :
- दिल्लीचा 10 धावानं दणदणीत विजय, आयपीएलच्या इतिहासात दिल्लीची सर्वोच्च धावसंख्या - MI vs DC Live Score IPL 2024
- पंजाबच 'किंग'; 262 धावांचा विक्रमी पाठलाग, टी-20 क्रिकेटमधील 20 वर्षांच्या इतिहासातील मोडले अनेक 'रेकॉर्ड' - KKR vs PBKS
- महिन्याभरानंतर आरसीबीचा विजय; धावांचा डोंगर उभारणारा हैदराबादचा घरच्या मैदानावर पराभूत - SRH vs RCB