नवी दिल्ली Shashank Singh : गुजरातविरुद्ध गुरुवारी झालेल्या रोमहर्षक सामन्यात पंजाब किंग्जनं 3 गडी राखून विजय मिळवला. या सामन्यात शशांक सिंग विजयाचा हिरो ठरला. त्यानं गुजरातच्या जबड्यातून सामना काढून पंजाबच्या झोळीत टाकला. या फलंदाजानं आक्रमक खेळी करत 29 चेंडूत नाबाद 61 धावा केल्या. शेवटी त्यानं विजयी चौकार ठोकून संघाला विजय मिळवून दिला.
शशांक सिंगला चुकून खरेदी केलं : शशांक सिंग हा पंजाबचा खास खरेदी केलेला खेळाडू नाही. लिलावाच्या वेळी शशांकबाबत वाद झाला होता. पंजाबच्या सह मालक प्रीती झिंटा आणि नेस वाडिया यांना दुसरा शशांक विकत घ्यायचा होता. लिलावात शशांक नावाचे दोन खेळाडू होते. चुकून त्यांनी या शशांकवर बोली लावली. त्याला संघात समाविष्ट केलं. ते खरेदी केल्यानंतर दोन्ही संघ मालक गोंधळलेले दिसले. कारण त्यांना आणखी एका 19 वर्षीय तरुण शशांकला संघात घ्यायचं होतं. मात्र, त्यानंतर फ्रँचायझीनं त्याच्यासोबत पुढं जाण्याचा निर्णय घेतला.
फ्रँचायझीनं दिलं होतं स्पष्टिकरण : फ्रँचायझीनं नंतर सोशल मीडियावर पोस्ट केले की 'आयपीएल यादीत समान नावं असलेल्या दोन खेळाडूंनी गोंधळ निर्माण केला आहे! मला सांगायला आनंद होत आहे की, योग्य शशांक सिंगचा समावेश करण्यात आला आहे. त्यानं काही उल्लेखनीय कामगिरी केलीय. आम्ही त्याच्या प्रतिभेला उजाळा देण्यासाठी सज्ज आहोत.'
आता याच शशांकमुळं प्रितीच्या चेहऱ्यावर हास्य : गुजरातनं दिलेल्या 200 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायला आलेल्या पंजाबच्या संघानं सुरुवातीलाच आपल्या महत्त्वाचे खेळाडू गमावले. यानंतर पंजाब हा सामना जिंकणार नाही, असं वाटत होतं. पण नंतर शेवटी शेवटच्या 17 चेंडूत शशांकनं आपल्या आक्रमक खेळीच्या बळावर सामन्याचं रुप पालटलं. शेवटी विजयी चौकार मारुन त्यानं आपल्या संघाला विजय मिळवून दिला. त्यानंतर प्रिती झिंटाच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत होता.
हेही वाचा :