बंगळुरु Gautam Gambhir Big Statement : भारत आणि न्यूझीलंड क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांची कसोटी मालिका 16 ऑक्टोबरपासून सुरु होत आहे. भारतीय संघानं अलीकडेच कसोटी मालिकेत बांगलादेशचा क्लीन स्वीप केला. आता घरच्या मैदानावर तिचा सामना न्यूझीलंडशी होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना बेंगळुरुच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरनं पत्रकार परिषद घेऊन आपल्या खेळाडूंच्या फलंदाजीच्या दृष्टिकोनावर मोठं विधान केलं आहे.
Gautam Gambhir:
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 14, 2024
" we want to be a team that can score 400 in a day and also a team that can bat 2 days". 👌🔥 pic.twitter.com/hPstyJ5GX2
संघाच्या फलंदाजीच्या दृष्टिकोनात कोणताही बदल होणार नाही : गौतम गंभीरनं न्यूझीलंड मालिकेपूर्वी कसोटी क्रिकेटमध्ये आपल्या फलंदाजांवर नियंत्रण ठेवणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. जितकी जास्त जोखीम घेतली जाईल तितका फायदा जास्त होईल असा त्याला विश्वास आहे. अलीकडेच भारतीय संघानं बांगलादेशविरुद्धच्या कसोटीत अतिशय वेगवान धावा केल्या होत्या, ज्यामुळं पावसामुळं दोन दिवस एकही चेंडू टाकला गेला नाही तरीही त्यांनी कानपूर कसोटी सामना सात विकेटनं जिंकला होता. गंभीरवर विश्वास ठेवला तर, भारतीय संघ भविष्यातही असाच खेळत राहील.
गौतम गंभीरचं मोठं वक्तव्य : गंभीर म्हणाला, 'आम्हाला आमच्या फलंदाजांवर नियंत्रण ठेवण्याची गरज का आहे? जर ते नैसर्गिक क्रिकेट खेळू शकतात, एका दिवसात 400 ते 500 धावा करु शकतात तर त्यात गैर काय? जोखीम जितकी जास्त, तितका फायदा जास्त, जोखीम जास्त, अपयशाची शक्यता जास्त' या वृत्तीनं आपण पुढं जात राहू. एक दिवस असा येईल जेव्हा आमचा संघ 100 धावांवर बाद होईल पण आम्हाला ते स्वीकारावं लागेल. उच्च जोखमीचे क्रिकेट खेळण्यासाठी आम्ही आमच्या खेळाडूंना पाठिंबा देत राहू. आम्हाला या पद्धतीनं पुढं जायचं आहे आणि परिस्थिती कशीही असली तरी परिणाम साध्य करायचे आहेत.
गंभीरला कसा भारतीय संघ हवा : गौतम गंभीर पुढं म्हणाला, 'मी चेन्नईत सांगितलं होतं की, आम्हाला असा संघ हवा आहे जो एका दिवसात 400 धावा करु शकेल आणि दोन दिवस फलंदाजी करून सामना ड्रॉ करु शकेल. याला पुढं जाणं म्हणतात. याला परिस्थितीशी जुळवून घेणं म्हणतात. हे कसोटी क्रिकेट आहे. जर तुम्ही नेहमी त्याच मार्गावर राहिलात तर तुम्ही पुढं जाऊ शकत नाही. आमच्या संघात असे अनेक फलंदाज आहेत जे दोन दिवस फलंदाजी करु शकतात. सामना जिंकणं हे आमचं पहिलं लक्ष्य नक्कीच असेल. सामना अनिर्णित ठेवण्यासाठी खेळावं लागेल, अशी परिस्थिती निर्माण झाली, तर आमच्यासाठी हा दुसरा किंवा तिसरा पर्याय असेल.'
हेही वाचा :