हैदराबाद Cheteshwar Pujara : फलंदाज चेतेश्वर पुजारा गेल्या एक वर्षापासून भारतीय क्रिकेट संघाच्या बाहेर आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यानंतर त्याला संघातून डच्चू देण्यात आलं. यानंतर पुजारा इंग्लंडमध्ये आपली ताकद दाखवत होता. पुजारानं इंग्लंडच्या काउंटी चॅम्पियनशिपमध्ये ससेक्ससाठी चांगली कामगिरी केली होती. पण आता या संघानं पुजाराला वगळलं आहे. कसोटी स्पेशालिस्ट फलंदाज पुढील वर्षीच्या काउंटी चॅम्पियनशिपसाठी ससेक्स संघात परतणार नाही, कारण इंग्लिश क्लबनं ऑस्ट्रेलियाच्या डॅनियल ह्यूजेसला संघात कायम ठेवण्यासाठी त्याला वगळलं आहे.
Pujara’s Sussex stint ends as club retains Hughes#CheteshwarPujara #Sussex #CountyCricket https://t.co/DSxRRbI3xG
— 9 CRICKET (@9cricketglobal) August 22, 2024
ससेक्सचा मोठा निर्णय : पुजारा 2024 मध्ये सलग तिसऱ्यांदा ससेक्सकडून खेळला. ह्युजेस परत येण्यापूर्वी त्यानं पहिले सात चॅम्पियनशिप सामने खेळले. मोठी गोष्ट म्हणजे ससेक्सकडून खेळल्या गेलेल्या शेवटच्या सामन्यात पुजारानं शानदार शतकही झळकावलं होतं. मिडलसेक्सविरुद्ध त्यानं 129 धावांची खेळी खेळली. त्यापूर्वी त्यानं डर्बीशायरविरुद्ध 113 धावा केल्या होत्या. पण एवढी उत्कृष्ट कामगिरी करुनही ससेक्सनं पुजारचा करार संपुष्टात आणला.
पुजारापेक्षा ह्युजेसला प्राधान्य : "चेतेश्वर पुजाराला करारमुक्त करणं सोपं काम नव्हतं पण डॅनियल ह्युजेस आमच्या गरजेनुसार पुढील हंगामासाठी उपलब्ध असल्यानं आम्हाला आनंद होत आहे," असं ससेक्सचे मुख्य प्रशिक्षक पॉल फारब्रेस यांनी अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. ह्युजेसनं यंदाच्या ब्लास्ट ग्रुप स्टेज मॅचमध्ये 43.07 च्या सरासरीनं 560 धावा केल्या, ज्यात पाच अर्धशतकांचा समावेश होता. त्याची सर्वोत्तम धावसंख्या 96 धावा होती. ह्युज सध्याच्या हंगामात काउंटी चॅम्पियनशिपच्या उर्वरित पाच सामन्यांमध्ये खेळण्यासाठी उपलब्ध असेल.
आता चेतेश्वर पुजारा काय करणार? : चेतेश्वर पुजाराला 5 सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या दुलीप ट्रॉफीमध्येही स्थान देण्यात आलेलं नाही. आता हा खेळाडू रणजी ट्रॉफीमध्ये दिसणार आहे. वरवर पाहता पुजाराची कारकीर्द आता घसरत चालली आहे, पुजाराची भविष्यातील रणनीती काय आहे? हे पाहावं सागेल. चेतेश्वर पुजारा हा भारतीय प्रथम श्रेणी क्रिकेटमधील महान खेळाडूंपैकी एक आहे. क्रिकेटमध्ये त्यानं आतापर्यंत 82 शतकं झळकावली आहेत.
हेही वाचा :