नवी दिल्ली AFG vs NZ Only Test : अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील एकमेव कसोटी सामन्याचा चौथाही दिवस (गुरुवार) मुसळधार पावसामुळं रद्द करण्यात आला आहे. ग्रेटर नोएडा येथील शहीद विजय सिंह पथिक क्रीडा संकुलातील स्टेडियममधील पहिले दोन दिवस ओल्या आउटफिल्डमुळं एकही चेंडू टाकल्याशिवाय खेळ रद्द करण्यात आला, ज्यामुळं मैदानाच्या तयारीवर गंभीर प्रश्न निर्माण झाले. हवामानाचा विचार करता गुरुवारीही कोणत्याही प्रकारचा खेळ होण्याची शक्यता सामना अधिकाऱ्यांनी फेटाळून लावली आहे.
सामनाधिकारी घेणार निर्णय : तथापि, अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी सामना सुरु न झाल्यानंतर, ग्रेटर नोएडा येथील शहीद विजय सिंह पथिक क्रीडा संकुलाच्या स्टेडियमचा भविष्यातील निर्णय मुख्यतः सामनाधिकारी जवागल श्रीनाथ यांच्या अहवालावर अवलंबून असेल. स्टेडियममधील अशा त्रुटींसाठी अनेकदा भारतीय क्रिकेट नियामक मंडळावर (बीसीसीआय) दोष दिला जातो. परंतु, यावेळी या अनियमिततेची संपूर्ण जबाबदारी यजमान अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डावर आहे.
अफगाणिस्ताननं निवडलं मैदान : कारण BCCI नं अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाला पर्याय म्हणून बंगळुरुचं चिन्नास्वामी स्टेडियम आणि कानपूरचं ग्रीन पार्क स्टेडियम ऑफर केलं होतं. परंतु अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डानं या ठिकाणाची निवड करुन खेळाडूंची ओळख आणि कमी खर्च यासारख्या मुद्द्यांना प्राधान्य दिलं. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्ड (ACB) नं ग्रेटर नोएडा हे ठिकाण दिल्ली आणि काबूल (तुलनेनं) च्या सापेक्ष निकटतेमुळं निवडलं. या कसोटी सामन्यात बीसीसीआयची कोणतीही भूमिका नाही. हे ठिकाण पूर्णपणे अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाची निवड होती आणि ग्रेटर नोएडा प्राधिकरणानं त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील सुविधा पुरवल्या होत्या. बीसीसीआयनं 2019 पासून (विजय हजारे ट्रॉफी) इथं कोणताही घरगुती सामना आयोजित केलेला नाही. येथील खराब परिस्थिती पाहता, नजीकच्या किंवा दूरच्या भविष्यात कोणताही सामना या मैदानावर आयोजित होण्याची शक्यता कमीच आहे.
ग्रेटर नोएडाच्या स्टेडियमचं आता काय होणार : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) कोणत्याही आंतरराष्ट्रीय स्थळासाठी मानक प्रोटोकॉलचं पालन करतं. जिथं सामनाधिकारींचा अहवाल पुढील कारवाईचा निर्णय घेईल. आतापर्यंत या कसोटी सामन्यात एकही चेंडू टाकला गेला नाही. सामनाधिकारी श्रीनाथ यांना मैदानाच्या ओल्या आउटफिल्डचं मूल्यांकन करावं लागेल. इथं इतर आंतरराष्ट्रीय स्थळांप्रमाणे ड्रेनेज योग्य नाही. मैदानातील पाणी शोषण्यासाठी सुपर-सॉकरसह पावसापासून आऊटफिल्डचं संरक्षण करण्यासाठी मैदानात पुरेसं कव्हर नाही. पुरेशा प्रशिक्षित ग्राउंड स्टाफच्या कमतरतेमुळं साइटवरील समस्या आणखी वाढल्या आहेत.
काय आहे ICC चा नियम : नोव्हेंबर 2023 मध्ये लागू झालेल्या ICC 'पिच आणि आउटफिल्ड मॉनिटरिंग प्रोसीजर' नुसार, प्रत्येक सामन्यानंतर, सामनाधिकारी (या प्रकरणात श्रीनाथ) खेळपट्टी आणि आउटफिल्डचा अहवाल फॉर्म ICC वरिष्ठ क्रिकेट ऑपरेटर व्यवस्थापकाकडं पाठवतील. 'पिच अँड आउटफिल्ड रिपोर्ट' फॉर्ममध्ये दोन्ही संघांचं पंच आणि कर्णधारांसह सामनाधिकारी यांच्या प्रतिक्रियांचाही समावेश असतो. अशा स्थितीत न्यूझीलंडचा कर्णधार टीम साऊथी काय प्रतिक्रिया देतो हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल. हा अहवाल मिळाल्यानंतर 14 दिवसांच्या आत, आयसीसीचे वरिष्ठ क्रिकेट संचालक व्यवस्थापक ते यजमान मंडळाकडं पाठवतात आणि त्यांना स्टेडियमवर लावण्यात आलेल्या डिमेरिट गुणांची माहिती देतात. आयसीसीच्या कलमानुसार, 'मॅच रेफरीला खेळपट्टी आणि/किंवा आउटफिल्ड असमाधानकारक किंवा अयोग्य म्हणून रेट करण्याचं कारण असेल तर, यजमान मैदानावरील खेळपट्ट्यांना रेटिंग देण्याच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार डिमेरिट गुण दिले जातील.'
कसोटी सामन्यात आतापर्यंत काय घडलं : ओल्या आउटफिल्डमुळं पहिल्या दोन दिवसांचा खेळ वाहून गेल्यानंतर ग्राउंड स्टाफनं मिड-ऑनजवळ दोन ते तीन फूट खोदकाम केलं आहे. त्यांनी प्रभावित क्षेत्रावर कोरडी माती आणि कृत्रिम गवत लावण्याचा प्रयत्न केला, परंतु ते तयार झालं नाही. हद्द एवढी होती की संपूर्ण आउटफिल्ड आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी योग्य वाटलं नाही, कारण ते चिखलानं भरलेलं दिसत होतं. तसंच मैदान सुकविण्यासाठी चक्क मैदानावर टेबल पंख्यांचा वापर केला.
हा सामना WTC चा भाग नाही : ही कसोटी जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा (WTC) भाग नसली तरी ती ICC शी संलग्न आहे. ग्रेटर नोएडा इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट अथॉरिटी द्वारे संचालित, स्टेडियमनं 2016 मध्ये गुलाबी-बॉलचा दुलीप ट्रॉफी सामना आयोजित केला होता. तथापि, कॉर्पोरेट सामन्यांदरम्यान मॅच फिक्सिंगमुळं बीसीसीआयनं सप्टेंबर 2017 मध्ये यावर बंदी घातली होती. तेव्हापासून इथं बीसीसीआयशी संलग्न सामना आयोजित करण्यात आलेली नाही. हे स्टेडियम अफगाणिस्तानसाठी होम ग्राउंड म्हणून काम करत आहे. मात्र, हे स्टेडियम उत्तर प्रदेश क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत येत नाही.
हेही वाचा :