छत्रपती संभाजीनगर Sportspersons Protest : खेळाडूंना मिळणाऱ्या सुविधांचा अभाव अनेक वेळा समोर आलाय. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचा नावलौकिक करुन देखील, त्या बदल्यात शासनानं लागू केलेल्या सुविधा मिळत नसल्यानं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील छत्रपती पुरस्कार विजेते खेळाडूसह राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी उपोषणाचा मार्ग निवडला आहे. आपल्याला मिळालेला पुरस्कार घेऊन ते रस्त्यावर उतरले आहेत. बहुतांश वेळा स्वखर्चानं स्पर्धेत उतरुन, आपला खेळ दाखवून देखील जर सुविधांपासून अभाव असेल तर यापुढं आम्ही खेळावं का नाही असा प्रश्न छत्रपती पुरस्कार विजेते खेळाडू आणि आंदोलक सागर मगरे यांनी विचारला आहे.
पुरस्कार घेऊन रस्त्यावर : कुठलाही खेळ खेळण्यासाठी मेहनत ही करावीच लागते. त्यात शासनाकडून मिळणाऱ्या सुविधा या तशा खूपच कमी असतात. स्पर्धेसाठी जाण्यासाठी तयारी करणं, त्यासाठी रोज सराव करणं, स्पर्धेच्या ठिकाणी जाऊन आपला खेळ दाखवणं इतकी मेहनत करावी लागते. त्यासाठी शासनाकडून कुठल्याच पद्धतीच्या सोयी सुविधा मिळत नाहीत. स्वतःच्या जीवावर आपला खेळ खेळावा लागतो. त्यात राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर जाण्यासाठी खूप मेहनत ही करावी लागते. त्यानंतर देशाला आपल्या खेळातून पदक मिळवून दिल्यावर एक वेगळाच आनंद मिळतो. त्यानंतर सरकारतर्फे काही सोयी सुविधा खेळाडूंच्या पुढील आयुष्याच्या अनुषंगानं मिळतात, मात्र या सगळ्या घोषणाच ठरत आहेत. सरकारतर्फे जाहीर केलेल्या सुविधा मिळत नाहीत, त्यामुळं आता खेळ खेळावा का नाही? असा प्रश्न असल्यानं मिळालेले पुरस्कार परत द्यायची वेळ आमच्यावर आल्यानं पुरस्कार घेऊन आंदोलन करावं लागत असल्याचं मत आंदोलक खेळाडू छत्रपती पुरस्कार विजेते खेळाडू सागर मगरे यांनी व्यक्त केलं.
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय खेळाडू आंदोलनात : खेळाडूंना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं, मुळात स्थानिक पातळीवर खेळण्यासाठी सुविधांचा अभाव आहे. मैदान, हॉल व्यवस्थित नसल्यानं सराव करताना अडचणी येतात. मात्र त्यावर मात करुनही पुढं जात आपल्या खेळात प्राविण्य प्राप्त करतात. मात्र राज्यात खेळाडूंची अवस्था बिकट आहे. ऑलम्पिक खेळामध्ये राज्य खूप मागं आहे. चांगला खेळ खेळता यावा, यासाठी सरकारनं वेगवेगळे पावलं उचलली पाहिजेत. त्याचबरोबर जे खेळाडू खेळात प्राविण्य दाखवतात पुरस्कार प्राप्त करतात अशा खेळाडूंना मानसन्मान हा मिळालाच पाहिजे, त्यामुळं वेगवेगळ्या मागण्यांसाठी विभागीय क्रीडा संकुल इथं आंदोलनात छत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडू, यांच्यासह राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगवेगळ्या खेळात प्रावीण्य दाखवलेले खेळाडू सहभागी झाले. आमच्या मागण्या मान्य न केल्यास आम्हाला खेळ सोडावा लागेल असा इशारा आंदोलन खेळाडूंनी यावेळी दिला.
खेळाडूंनी केलेल्या मागण्या :
- शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार खेळाडूंना सांगली महानगरपालिकेप्रमाणे सर्व शासकीय निम-शासकीय सेवेत थेट नियुक्ती देण्यात यावी.
- 24 मे 2024 रोजी जाहीर केलेल्या 5 टक्के क्रीडा आरक्षणाच्या प्रारुपमध्ये 3 राज्यस्तरीय स्पर्धा व त्यात 1 अथवा 2 पदक असावं. याप्रमाणे क्रीडा आरक्षण असावं तसंच कनिष्ठ गट राष्ट्रीय स्पर्धेत विजेत्या खेळाडूंचा समावेश करुन क्रीडा आरक्षण लागू करावं लागू होईपर्यंत कुठली भरती घेऊ नये.
- क्रीडा शिक्षक भरती सुरु करावी.
- 11 सप्टेंबर 2024 रोजी जाहिर झालेल्या आंतरराष्ट्रीय खेळाडू नियुक्ती अ, ब व क गटातील थेट नियुक्त कोणत्या आधारावर देण्यात आली, याची चौकशी करण्यात यावी आंतरराष्ट्रीय स्पर्धा ही मान्यता प्राप्त होती का ? त्यात 12 पेक्षा अधिक देश सहभागी होते का ? त्यातील क्रीडाप्रकार व उपप्रकार हे 5 टक्के क्रीडा आरक्षण आहेत का ? या सर्व बाबींची सखोल चौकशी करण्यात यावी.
- शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त खेळाडूंना व्यवसायामध्ये सवलत देण्यात यावी. जसं पेट्रोल पंप, गॅस एजन्सी, रेशन दुकान, व तसेच व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्जामध्ये सवलत द्यावी.
- शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडूंना क्रीडा शिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात यावी.
- शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त खेळाडूंना शासनाच्या वतीनं मानधनावर प्रशिक्षक म्हणून नियुक्ती देण्यात यावी.
- तालुका क्रीडा अधिकारी पदासाठी झालेल्या भरती मधील झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी झाली पाहिजे व ज्या परीक्षार्थीचं नाव वगळण्यात आलं त्यांना मुलाखतीसाठी संधी देण्यात यावी.
- गरजू शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त खेळाडूंना म्हाडा, सिडकोचे घर देण्यात यावे.
- प्रोत्साहन म्हणून 17 वर्षाआतील राष्ट्रीय खेळाडूंना छत्रपती संभाजी महाराज क्रीडा पुरस्कार सुरु करण्यात यावा.
हेही वाचा :