अमरावती : तिवसा विधानसभा मतदारसंघात यशोमती ठाकूर या अतिशय सक्षम महिला उमेदवार आहेत. अशा महिलेच्या पाठीशी खरंतर जनतेने उभं राहायला हवं. मी स्वतः त्यांच्या प्रचारासाठी येथे आले आहे. खरंतर मतदारांनी मतदान करताना आपल्या मुलांच्या भविष्याचा विचार करूनच योग्य निर्णय घ्यावा असं, आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू आणि हरियाणाच्या काँग्रेस आमदार विनेश फोगाट यांनी म्हटलंय. काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी आज तिवसा विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी प्रामुख्याने उपस्थित असणाऱ्या आमदार विनेश फोगाट यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.
चांगल्या बदलाची गरज : क्षेत्र कुठलंही असो त्या क्षेत्रात चांगल्या बदलाची गरज आहे. अशा चांगल्या बदलासाठीच मी यशोमती ठाकूर यांच्या प्रचारासाठी आले आहे. खरंतर यशोमती ठाकूर यांच्या उमेदवारी अर्ज करिता मी आली असली तरी, मला यशोमती ठाकूर यांचा आशीर्वाद मिळाला हे महत्त्वाचं आहे. यशोमती ठाकूर यादेखील क्रीडापटू राहिल्या आहेत. यशोमती ठाकूर सारख्या महिलेसोबत आपण उभे राहिलो तर आपली देखील ताकद वाढते. यशोमती ठाकूर सारख्या महिलांची महाराष्ट्रातील जनतेने साथ द्यावी असं आव्हान, आमदार विनेश फोगाट यांनी केलंय.
खेळ असो किंवा राजकारण भावना एकच : खेळ आणि राजकारण हे निश्चितच दोन वेगळे क्षेत्र आहेत. असं असलं तरी या दोन्ही क्षेत्रात काम करताना जी भावना आहे ती केवळ राष्ट्रभक्ती अशी एकच आहे. क्रीडा क्षेत्रात आम्ही जे काही केलं त्यासाठी जनतेने आम्हाला भरभरून आशीर्वाद दिला. आता राजकारणात आम्हाला जनतेसाठी काही करण्याची संधी मिळाली. आता राजकारणाच्या मैदानात देखील खेळाच्या मैदानापेक्षा अधिक चांगली कामगिरी करून दाखवायची असल्याचं आमदार विनेश फोगाट म्हणाल्या.
महाविकास आघाडीचा होणार विजय : हरियाणा असो किंवा महाराष्ट्र कुठल्याही राज्यातील राजकीय आणि सामाजिक परिस्थिती ही निश्चितच वेगळी असू शकते. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा निश्चितपणे विजय होणार असा विश्वास आहे. महाराष्ट्रात प्रचारासंदर्भात वरिष्ठ नेत्यांचे जे काही आदेश असेल त्याचं पालन केल्या जाईल खरंतर मी स्वतः आता काँग्रेसशी जुळली असल्यामुळं मला आपल्या पक्षाच्या कामासाठी आदेशाची गरज नाही असं विनेश फोगाट यांनी स्पष्ट केलंय.
हेही वाचा -
- राष्ट्रवादी शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर; बारामतीत अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवारांमध्ये फाईट, वाचा संपूर्ण यादी
- धनंजय मुंडे, आदित्य ठाकरे, जितेंद्र आव्हाडांसह 'या' दिग्गजांनी दाखल केले उमेदवारी अर्ज; शरद पवार आणि राज ठाकरेंची उपस्थिती
- नेत्यांच्या फोडाफोडीबद्दल शरद पवारांना नोबेल पुरस्कारच दिला पाहिजे, उदयनराजेंचा खोचक टोला