नागपूर : प्रभु श्रीरामच्या पावन पदस्पर्शानं पुनीत झालेल्या रामटेकचा 'गड' कोण सर करणार याकडं नागपूरचं नाही तर राज्याचं लक्ष लागलय. विधानसभा निवडणुकीची घोषणा होताचं भारतीय जनता पार्टी पक्ष आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात चढाओढ सुरू झालीय. तर काँग्रेस पक्षानं आद्यप आपले पत्ते मात्र उघडलेले नाहीत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये रामटेक मतदारसंघातील जनतेनं एकनाथ शिंदेंच्या उमेदवाराला नाकारलं. त्यामुळं, रामटेक विधानसभा निवडणुकीचं चित्र अतिशय रंजक होणार आहे.
रामटेक विधानसभेचा इतिहास : १९६२ साली पहिल्यांदा विधानसभेची निवडणूक झाली. ज्यामध्ये काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला होता. मोहम्मद अब्दुल्ला खान पठाण हे विधानसभेचे पहिले आमदार झाले होते. तर १९६२ ते १९८० पर्यंत येथे काँग्रेसचेच उमेदवार विजयी झाले होते. १९८५च्या निवडणुकीत पहिल्यांदा जनता पक्षाचा उमेदवार येथून विजय झाला होता. त्यानंतर १९९० मध्ये जनता दलानं येथून निवडणूक जिंकली होती. तर १९९१ मध्ये पुन्हा काँग्रेसनं रामटेकची जागा जिंकली होती. मात्र, हा विजय त्यांचा अखेरचा विजय ठरला. १९९५ ते २०१४ पर्यंत येथे शिवसेनेचे उमेदवार विजयी होत आले. २०१४ मध्ये शिवसेना आणि भाजपाची युती तुटल्यानंतर भाजपानं पहिल्यांदाच रामटेकची निवडणूक जिंकली होती. मात्र २०१९ मध्ये ही जागा राखण्यात पक्षाला यश आलं नाही. २०१९ साली अपक्ष उमेदवार आशिष जयस्वाल यांनी रामटेक येथून विजय मिळवला होता.
२०१९ च्या निवडणुकीत उमेदवारांना मिळालेली मतं : २०१९च्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपा आणि शिवसेना एकत्रितपणे लढले तरी देखील अपक्ष उमेदवार आशीष जयस्वाल यांनी येथून दणदणीत विजय मिळवला होता. आशीष जयस्वाल यांना ६७ हजार ४१९ मतं मिळाली तर भाजपा पक्षाचे उमेदवार मल्लिकार्जुन रेड्डी यांना ४३ हजार ०६ मतांवर समाधान मानावं लागलं होतं. काँग्रेस उमेदवार उदयसिंह यादव हे तिसऱ्या क्रमांकावर राहिले त्यांना ३२ हजार ४९७ मतं मिळाली होती.
लोकसभा निवडणुकीत मिळालेली मते -
पक्ष : २०२४ २०१९ २०१४
शिवसेना : ५,३५,२५७ ५,९७,१२६ ५,१९,८९२
काँग्रेस : ६,१३,०२५ ४,७०,३४३ ३,४४,१०१
२०१९च्या विधानसभा निवडणुकीत प्राप्त मते -
आशीष जयस्वाल (अपक्ष) : ६७,४१९
मल्लिकार्जुन रेड्डी (भाजपा) : ४३,००६
उदयसिंह यादव (काँग्रेस) : ३२,४९७
काँग्रेसचा उमेदवार गुलदस्त्यात : विधानसभा निवडणुकीची घोषणा झालेली आहे. मात्र, अद्याप महाविकास आघाडीकडून कोणता पक्ष रामटेकेची जागा लढवणार हे स्पष्ट करण्यात आलं नाही. रामटेकची जागा काँग्रेसच लढवेल असं बोललं जात असलं तरी, काँग्रेस कुणाला संधी देईल याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे. तर माजी मंत्री राजेंद्र मुळक यांचं नाव चर्चेत आहे.
रामटेक मतदारसंघाचं जातीय समीकरण : रामटेक मतदारसंघात २ लाख ८५ हजार ८८९ मतदार आहेत. रामटेक विधानसभा सर्वसाधारण मतदासंघ असून ९० टक्के लोकसंख्या हिंदू आहे. तर याशिवाय मुस्लिम समाज काही प्रमाणात आहे.
विधानसभा मतदारसंघातील प्रमुख समस्या : रामटेक विधानसभा मतदारसंघातील लोकांच्या उपजीविकेचं मुख्य साधन पर्यटन आहे. रामगड मंदिर, पेंच व्याघ्र प्रकल्प यासारखी प्रमुख पर्यटन क्षेत्रं या विधानसभा मतदारसंघात येतात. दररोज हजारो पर्यटक येथे भेट देण्यासाठी येतात. सध्या गड मंदिराचा विकास हा येथील मुख्य मुद्दा आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रामटेकवासी मंदिराच्या पुनर्विकासासाठी तगादा लावत आहेत. यासोबतच रेल्वे मार्ग हाही मोठा प्रश्न आहे. नागपूर ते रामटेक हे अंतर ६५ किलोमीटरपेक्षा जास्त आहे. सध्या जिल्हा मुख्यालयाकडं जाण्यासाठी रस्ता एकमेव मार्ग आहे. रेल्वे मार्ग अस्तित्वात असला तरी त्यावरून धावणाऱ्या गाड्यांची संख्या खूप कमी आहे.
सध्याची राजकीय परिस्थिती : रामटेकमधून २०१९ मध्ये अपक्ष म्हणून निवडून आलेले आशिष जयस्वाल हे आमदार आहेत. शिवसेनेत बंड झाल्यानंतर ते एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले होते. आशिष जयस्वाल यांना शिवसेनेकडून उमेदवारी देखील जाहीर झाल्यानं भारतीय जनता पक्षातील इच्छुक माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांनी बंड पुकारल्यानं भाजपाकडून रेड्डींवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
हेही वाचा -