मुंबई : विलेपार्ले मतदारसंघात भाजपाचे पराग अळवणी, शिवसेनेचे (उबाठा) संदीप नाईक आणि मनसेच्या जुईली शेंडे यांच्यामध्ये तिरंगी लढत होत आहे. या तिरंगी लढतीमध्ये पराग अळवणी यांची हॅट्ट्रिक होणार की मतदारसंघाला नवीन आमदार मिळणार? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
अळवणी यांना सलग तिसऱ्यांदा उमेदवारी : लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून भाजपाच्या उज्वल निकम यांना 51 हजार 325 मतांची आघाडी मिळाली होती. त्यामुळं भाजपासाठी हा सुरक्षित मतदारसंघ मानला जात आहे. यामुळंच या मतदारसंघातून लढण्यासाठी मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार आणि संजय उपाध्याय यांची नावं चर्चेत आली होती. मात्र, भाजपानं विद्यमान आमदार पराग अळवणी यांना सलग तिसऱ्यांदा उमेदवारी दिली आहे. 2014 आणि 2019 मध्ये अळवणी हे दोनवेळा आमदार म्हणून निवडून आले होते.
लोकसभेला काय होतं वातावरण? : लोकसभा निवडणुकीत उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून कॉंग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनी विजय मिळवलाय. त्यावेळी त्यांना 4 लाख 45 हजार 545 मतं मिळाली होती. तर भाजपाचे पराभूत उमेदवार उज्वल निकम यांना 4 लाख 29 हजार 31 मतं मिळाली होती. या लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या 6 विधानसभा मतदारसंघापैकी 5 मतदारसंघात गायकवाड यांना आघाडी मिळाली होती. तर, केवळ विलेपार्ले विधानसभा मतदारसंघात भाजपाचे उज्वल निकम यांना आघाडी मिळाली होती. निकम यांना विलेपार्ले मतदारसंघातून 98 हजार 341 मतं मिळाली होती. तर गायकवाड यांना 47 हजार 16 मतं मिळाली होती. निकम यांना या मतदारसंघात तब्बल 51 हजार 325 मतांची आघाडी मिळाली होती.
- 1987 च्या पोटनिवडणुकीत डॉ रमेश प्रभू विजयी झाले होते. मात्र, हिंदुत्वाच्या नावावर मतं मागण्याच्या मुद्द्यावरुन त्यांची आमदारकी रद्द झाली होती. त्यानंतर त्यांचा आणि शिवसेनाप्रमुख (उबाठा) ठाकरेंचा मतदानाचा हक्क 6 वर्षांसाठी काढून घेण्यात आला होता.
हेही वाचा -