मुंबई Vidhan Sabha Election Campaign : लोकसभा निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीला मिळालेलं यश आणि महाविकास आघाडीचे उद्धव ठाकरे यांनी राज्यभरात प्रचारासाठी केलेले यशस्वी नेतृत्व पाहता आगामी विधानसभा निवडणुकांसाठीही उद्धव ठाकरे यांच्याच खांद्यावर प्रचाराची जबाबदारी देण्याचा विचार महाविकास आघाडीत सुरू आहे. काँग्रेसच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत उद्धव ठाकरे यांच्याकडेच महाविकास आघाडीच्या प्रचाराची धुरा सोपवण्याचं जवळपास निश्चित झालंय.
ठाकरे यांचे काम आणि अनुभव महत्वाचा : विधानसभा निवडणुका अगदी जवळ येऊन ठेपल्यानं महाविकास आघाडीच्या वतीनं राज्यात पुन्हा एकदा जोरदार प्रचार सुरू करण्याबाबत महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक पार पडली. त्या पाठोपाठ काँग्रेसनंही आपली आढावा बैठक घेतली. या बैठकीत काँग्रेसनं उद्धव ठाकरे यांनी केलेलं काम आणि त्यांचं नेतृत्व यामुळं त्यांच्या हाती पुन्हा एकदा महाविकास आघाडीच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचार प्रमुखाचं काम सोपवण्याचं जवळपास निश्चित केलंय. यासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे म्हणाले की, "उद्धव ठाकरे यांची महाराष्ट्रात असलेली प्रतिमा आणि त्यांना मिळणारा प्रतिसाद पाहता विधानसभा निवडणुकीतसुद्धा त्यांनीच महाविकास आघाडीचे प्रचार प्रमुख म्हणून काम करावं , अशा पद्धतीची चर्चा झाली आहे. मात्र, त्यावर अद्याप शिक्कामोर्तब झालेला नाही." तसंच काँग्रेसच्या हायकमांडसोबत या संदर्भात चर्चा करून लवकरच एकत्रित निर्णय घेतला जाईल, असंही लोंढे यांनी स्पष्ट केलं.
मुख्यमंत्री पदाचा विचार नंतर : पुढं ते म्हणाले की, "महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून सध्या कोणालाही समोर आणलं जाणार नाही. कारण निवडणुका झाल्यानंतर निवडून आलेले आमदार आपला नेता निवडतील. त्यामुळं त्याबाबत आत्ताच चर्चा करण्याची गरज नाही. तसंच महाविकास आघाडीच्या संयुक्त जाहीरनाम्याची जबाबदारी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर सोपवली जाण्याची शक्यता आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी लवकरच विधानसभा निवडणुकीसाठी जाहीरनामा तयार करून तो बैठकीत मांडणार आहेत. त्या जाहीरनाम्याला महाविकास आघाडीकडून जनतेसमोर अधिकृतरित्या मांडले जाईल", असंही त्यांनी सांगितलं.
हेही वाचा -
- उद्या मार्मिक आमचा आहे, असं कोणी म्हणेल- नाव न घेता उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना टोला - Uddhav Thackeray News
- शरद पवार, नाना पटोले यांना, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाचा चेहरा मान्य आहेत का - भाजपाचा सवाल - Sanjay Raut
- दिल्लीत लोटांगण घालण्याची टीका करणारे ताल कटोरा मैदानात कशाला गेले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंना खोचक सवाल - Eknath Shinde On Uddhav Thackeray