नागपूर/मुंबई Shivaji Maharaj Statue Collapse : महायुती सरकारला 'गेट आऊट' करण्याची वेळ आली, असं म्हणत शिवसेना - UBT पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला होता. या टीकेला आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलंय. "दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील जनतेनं उद्धव ठाकरेंना 'गेट आऊट' केलं होतं," असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी ठाकरेंना त्यांच्याच डायलॉगमध्ये उत्तर दिलंय. उद्धव ठाकरे शिवाजी महाराजांचं नाव घेतात पण त्यांचं काम औरंगजेब आणि अफजलखानासारखं असल्याचा हल्लाबोल मुख्यमंत्र्यांनी केला.
राज्य सरकारला 'गेट आऊट' करा : छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीनं रविवारी राज्यभरात आंदोलन केलं होतं. मुंबईतील 'गेट वे ऑफ इंडिया' येथे महाविकास आघाडीच्या सर्व प्रमुख नेत्यांनी एकत्र येत 'जोडे मारो' आंदोलन करत राज्य सरकारवर टीका केली. महायुती सरकारला 'गेट आऊट' करण्याची वेळ आल्याचं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. तसंच शरद पवार आणि नाना पटोले यांनीही राज्य सरकारवर निशाणा साधला.
औरंगजेब आणि अफजलखानासारखं काम : उद्धव ठाकरेंच्या 'गेट आऊट' टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्याच डायलॉगमध्ये उत्तर दिलंय. "दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील जनतेनं उद्धव ठाकरेंना 'गेट आऊट' केलंय. त्यांना सत्तेतून 'गेट आऊट' करण्यात आलं. ते आता घरी बसून शिवाजी महाराजांच्या नावानं राजकारण करत आहेत. दोन वर्षापूर्वी कर्नाटकमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्यात आला होता. त्यावेळी महाविकास आघाडीचे नेते कुठे होते? त्यावेळी त्यांनी जोडे मारो आंदोलन का नाही केलं?" असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी महाविकास आघाडीवर टीका केली. "आतापर्यंत उद्धव ठाकरेंनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं राजकारण केलं, पण त्यांचं काम हे औरंगजेब आणि अफजलखानासारखं आहे," असा घणाघातही मुख्यमंत्र्यांनी ठाकरेंवर केला.
विरोधकांनी सहकार्य करावं : "छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्यासाठी दैवत आहेत. त्यांचा पुतळा अचानक पडणं ही निंदनीय घटना आहे, ज्यांच्या चुकांमुळं ही घटना घडली असेल त्यांच्यावर शासनाकडून कठोर कारवाई केली जाईल. पण मी विरोधी पक्षाच्या नेत्यांना सांगू इच्छितो की, त्यांनी यावर राजकारण करणं थांबवावं. छत्रपती शिवाजी महाराजांचा उत्कृष्ट पुतळा पुन्हा त्याच ठिकाणी कसा उभारता येईल यासाठी विरोधकांनी सहकार्य करावं," असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना केलं.
हेही वाचा
- "शिवद्रोही सरकारला 'गेट आऊट' म्हणायची वेळ आलीय"; महाविकास आघाडीचा सरकारवर हल्लाबोल - MVA Protest Mumbai
- "उद्धव ठाकरे, शरद पवार माफी मागणार का?"; महाराजांच्या 'त्या' घटनांचा संदर्भ देत देवेंद्र फडणवीसांचा सवाल - Chhatrapati Shivaji Maharaj Statue
- 'तेल लावलेला पैलवान' उतरला आंदोलनात; छत्रपती शाहू महाराजांचा हात धरुन शरद पवार आंदोलनात सहभागी, पाहा उत्साह - MVA Protest In Mumbai