मुंबई Uddhav Thackeray On Devendra Fadnavis : भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी 2019 मध्ये आपल्याला वचन दिलं होतं, "मी दिल्लीला जायला तयार आहे आणि आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांना मुख्यमंत्री पदासाठी तयार करीन. परंतु त्यांनी ते वचन पाळलं नाही आणि मी बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला मुख्यमंत्री करेन, असं वचन दिलं होतं ते पूर्ण होऊ शकलं नाही. त्यामुळं मला माझ्या लोकांसमोर तोंडघशी पडावं लागलं," असं वक्तव्य उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी एका इंग्रजी वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत केलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्यावरून आता नव्या वादाला तोंड फुटलंय. युती तुटण्याचं मुख्य कारण काय आहे, याबाबतचा आता नवा वाद सुरू झालाय.
स्वतःच्या कुटुंबासाठी आणि स्वार्थासाठी काम : शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनी मात्र ठाकरे खोटं बोलत असल्याचं म्हटलंय. उद्धव ठाकरे यांनी एका इंग्रजी वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीतील उल्लेख चुकीचा असून उद्धव ठाकरे खोटे बोलत आहेत. उद्धव ठाकरे हे स्वतःच्या कुटुंबासाठी आणि स्वार्थासाठी नेहमी काम करत असतात, असं प्रतिउत्तर शिवसेना शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टीनं दिलय.
उद्धव ठाकरे यांचे म्हणणे योग्य : या संदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार विनायक राऊत म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी जर मुलाखतीमध्ये आज स्पष्ट केलं आहे तर ते निश्चितच सत्य असलं पाहिजे. देवेंद्र फडणवीस हे नेहमीच वचन देऊन तोंडघशी पाडणारी व्यक्ती आहेत. उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भात दिलेली अधिकची माहिती जेव्हा आमच्यासमोर येईल आणि भूमिका समजेल तेव्हा त्याबाबत आम्ही अधिक सविस्तरपणे बोलू. परंतु, सध्यातरी ठाकरे यांनी मांडलेली वस्तुस्थिती ही निश्चितच सत्य मानली पाहिजे.
उद्धव ठाकरे खोटारडे : या संदर्भात आमदार संजय शिरसाट म्हणाले की, उद्धव ठाकरे हे अत्यंत खोटे बोलत आहेत. ते खोटारडे आहेत. वास्तविक त्यावेळी आदित्य ठाकरे हे कुठेच या सर्व प्रक्रियेत नव्हते. त्यांना मंत्री सुद्धा करण्यात येणार नव्हतं शेवटच्या क्षणी त्यांना मंत्रिपदाची संधी देण्यात आली. त्यामुळं त्यांना मुख्यमंत्री करण्याचा प्रश्न येतच नाही. उद्धव ठाकरे यांनी जर बाळासाहेबांना एका शिवसैनिकाला मुख्यमंत्री करतो असं वचन दिलं असेल तर तो शिवसैनिक ठाकरे यांच्याच घरातला असायला पाहिजे का? शिवसेनेत फक्त उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे दोनच शिवसैनिक होते का? वास्तविक यांना स्वतःच्या स्वार्थापलीकडं काहीही दिसत नाही. केवळ स्वतःच्या घरात सत्ता आणि मुख्यमंत्रिपद हवं म्हणून युती तुटली हे आता स्पष्ट होत आहे. त्यामुळं उद्धव ठाकरे हे आता खोटे बोलत असून बिनबुडाचे आरोप करत आहेत. फडणवीस यांनी असं वचन दिलं असण्याची शक्यता नाही.
ठाकरे यांचे धृतराष्ट्र प्रेम जागृत : भाजपाचे प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी यासंदर्भात बोलताना म्हटलं की, देवेंद्र फडणवीस अशा पद्धतीचं वचन उद्धव ठाकरे यांना देणं शक्यच नाही. उद्धव ठाकरे हे खोटे बोलत असून आता त्यांचं धृतराष्ट्र प्रेम जागृत झालं आहे. आपल्या मुलाला मुख्यमंत्री करण्यासाठी त्यांनी हा नवा डाव टाकला आहे. वास्तविक उद्धव ठाकरे यांना हिंदुत्व, बाळासाहेब, मराठी माणूस याबाबत कधीही आस्था नव्हती. त्यांना केवळ स्वतःला आणि स्वतःच्या मुलाला मुख्यमंत्री करण्यातच रस होता. हे आता स्पष्ट होत आहे आणि म्हणूनच त्यांच्या या स्वार्थामुळंच युती तुटली. हे आता त्यांच्या वक्तव्यावरूनच स्पष्ट होत आहे. त्यामुळं शिवसेना-भाजपाची युती तुटण्यासाठी उद्धव ठाकरे यांचा स्वतःच्या कुटुंबाप्रती असलेला स्वार्थ आणि सर्वकाही लुटून नेण्याची वृत्ती कारणीभूत असल्याचा आरोप शिवराय कुलकर्णी यांनी केलाय.
हेही वाचा -
- 'राहुल गांधींना वायनाडमध्ये संकट वाटतंय, निवडणुकीपूर्वीच कॉंग्रेसनं मानली हार'; नांदेडमधून मोदींची टीका - PM Narendra Modi Rally
- पंतप्रधान नरेंद्र मोदींचं 'मिशन मराठवाडा'; आज नांदेडसह परभणीत घेणार प्रचारसभा - PM Narendra Modi Rally
- चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात 55.11 टक्के मतदान; अनेक मतदार मतदानापासून वंचित, नेमकं काय घडलं? - Chandrapur Lok Sabha