मुंबई South Central Mumbai Constituency : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे दोन्ही गट आमने-सामने आले आहेत. याच पार्श्वभूमीवर अनेक जुने मित्र आता एकमेकांविरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचं बघायला मिळतय. यापैकीच एक जोडी म्हणजे राहुल शेवाळे आणि अनिल देसाई. आज निवडणुकीमुळं एकेकाळचे मित्र एकमेकांविरोधात उभे राहिले आहेत. या दोन्ही उमेदवारांनी आज (29 एप्रिल) जिल्हाधिकारी कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय.
महायुतीकडून राहुल शेवाळेंना तिकीट : राहुल शेवाळे यांना महायुतीनं दक्षिण मध्य मुंबईतून तिकीट दिलंय. दक्षिण मध्य मुंबईची जागा प्रत्येक अर्थानं प्रमुख मानली जाते. यात केवळ धारावी, माहीम, सायन कोळीवाडा यांसारख्या भागांचाच समावेश नाही, तर चेंबूर आणि काही किनारी भागांचाही समावेश आहे. 2014 आणि 2019 मध्ये शिवसेनेचे नेते राहुल शेवाळे यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ गायकवाड यांचा मोठ्या मताधिक्यानं पराभव करत विजय मिळवला होता. आता 2024 साठी त्यांना पुन्हा महायुतीनं उमेदवारी दिली असून, आज त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित होते.
देसाईंसह सावंतांनीही भरला अर्ज : तर दुसरीकडं अनिल देसाई यांच्या सोबतच दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून अरविंद सावंत यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. यावेळी, ठाकरे गटाच्या या दोन्ही उमेदवारांकडून मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करण्यात आलं. अनिल देसाई आणि अरविंद सावंत हे दोन्ही नेते उद्धव ठाकरे यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जातात. या दोन्ही नेत्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना आदित्य ठाकरे उपस्थित होते.
दोन मित्र भिडणार : 2014 मध्ये राहुल शेवाळे यांना 49.57 टक्के तर एकनाथ गायकवाड यांना केवळ 31.59 टक्के मतं मिळाली होती. यानंतर 2019 च्या लोकसभा निवडणुकीत राहुल शेवाळे यांना 53.30 टक्के मतं मिळाली, तर एकनाथ गायकवाड यांना केवळ 34.21 टक्के मतांवर समाधान मानावं लागलं. यावेळी मात्र, महाविकास आघाडीत ही जागा ठाकरे गटाच्या वाट्याला गेल्यानं अनिल देसाईंना रिंगणात उतरवण्यात आलंय. अनिल देसाई हे ठाकरे गटाचे राज्यसभेचे खासदार असून यावेळी ते पहिल्यांदाच प्रत्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर राहुल शेवाळे आणि अनिल देसाई हे दोघंही एकेकाळचे चांगले मित्र असल्यानं ही लढत पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
काँग्रेसमध्ये नाराजी : या मतदारसंघातून वर्षा गायकवाड यांचे वडील एकनाथ गायकवाड यांनी काँग्रेसची धुरा सांभाळली आहे. वर्षा गायकवाड देखील याच लोकसभा मतदारसंघातील धारावी विधानसभेतून आमदार आहेत. त्यामुळं यावर्षी वर्षा गायकवाड यांनी लोकसभेची तयारी केली होती. मात्र, तडकाफडकी उध्दव ठाकरे यांनी या जागेवर अनिल देसाई यांच्या नावाची घोषणा केल्यानं काँग्रेसमध्ये नाराजीचं वातावरण बघायला मिळतंय.
हेही वाचा -
- बाप्पा यांना पाव रे! अरविंद सावंत, अनिल देसाईंसह राहुल शेवाळे अर्ज दाखल करण्यापूर्वी सिद्धिविनायकाच्या चरणी - Lok Sabha Election
- राहुल शेवाळेंनी घेतली राज ठाकरेंची भेट, 18 वर्षानंतर राज करणार धनुष्यबाणाला मतदान - Lok Sabha Election 2024
- दक्षिण मध्य मुंबई : 'ही' आहेत अरविंद सावंतांच्या विजयाची कारणे, 'या'मुळे झाला देवरांचा पराभव