सोलापूर : विधानसभा निवडणुकांच्या (Maharashtra Assembly Election 2024) तारखा जाहीर झाल्या आहेत. 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक पार पडणार असून 23 नोव्हेंबरला निवडणुकांचे निकाल लागणार आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागलेत. तसंच यादरम्यान होणाऱ्या सभांमध्ये नेतेमंडळींकडून काय वक्तव्यं केली जातात, याकडंही सर्वाचं लक्ष लागलंय. अशातच सोलापूमध्ये बोलत असताना "2024 च्या निवडणुकीत आमच्या पायगुणामुळंच प्रणिती शिंदे (Praniti Shinde) खासदारकीच्या निवडणुकीत विजयी झाल्या", असा अजब दावा काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांनी केलाय.
नेमकं काय म्हणाले? : सोलापूरचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील (Dhavalsinh Mohite Patil) हे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूरमधील काँग्रेस भवनात आले होते. यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. यादरम्यान, "लोकसभा निवडणुकीत माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा दोन वेळा पराभव झाला होता. मात्र, 2024 च्या लोकसभा निवडणुकीत आमच्या पायगुणांमुळं प्रणिती शिंदे खासदारकीच्या निवडणुकीत विजयी झाल्या", असं धवलसिंह मोहिते पाटील म्हणाले.
प्रणिती शिंदेंना ग्रामीण भागातून मिळाली आघाडी : प्रणिती शिंदे यांनी 2024 मध्ये सोलापूरमधून खासदारकीची निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांनी भाजपाचे उमेदवार राम विठ्ठल सातपुते यांचा मोठ्या मताधिक्क्यानं पराभव केला होता. सोलापूरमधून निवडून आलेल्या त्या पहिल्या महिला खासदार आहेत. दरम्यान, सोलापूर लोकसभा मतदारसंघात अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, पंढरपूर, मंगळवेढा, मोहोळ या ग्रामीण भागातून प्रणिती शिंदे यांनी लीड मिळाली होती, याची माहिती धवलसिंह मोहिते पाटील यांनी दिली.
हेही वाचा -
- "रेशन दुकानात प्लास्टिकचा तांदूळ..."; तांदूळ दाखवत प्रणिती शिंदेंचा सरकारवर आरोप - Praniti Shinde On Plastic Rise
- कृतज्ञता दौरा : नूतन खासदार प्रणिती शिंदेंचा दुधाच्या छोट्या गाडीतून प्रवास - Praniti Shinde Travel In Milk Tempo
- “माझ्या वडिलांना काय बोलता? भिडायचे असेल तर…”; राम सातपुते आणि प्रणिती शिंदे यांच्यात रंगला राजकीय कलगीतुरा - lok sabha elections