नवी दिल्ली : संविधानावरून लोकसभेत चर्चा झाल्यानंतर आता राज्यसभेत चर्चा करण्यात येत आहे. शिवसेनेच्या (उबाठा) खासदारांनीही यावेळी संविधानावरील चर्चेत भाग घेतला. शिवेसनेचे खासदार (यूबीटी) अरविंद सावंत यांनी संविधान, आणीबाणी या मुद्द्यांवरून भाजपावर जोरदार टीका केली.
सोमवारी (16 डिसेंबर) राज्यसभेत संविधानावरील चर्चेदरम्यान काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी अशोक चक्र आणि संविधान टाळणारे संविधानाबद्दल बोलत असल्याचा आरोपही केला. चर्चेदरम्यान लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सरकारवर अनेक आरोप केले. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही काँग्रेस आणि नेहरू-गांधी परिवारावर जोरदार हल्लाबोल केला.
संविधानाचा गळा घोटण्याचे काम सुरू-शिवसेनेचे (उबाठा) खासदार अरविंद सावंत यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितलं की, " संसदेत संविधानावर चर्चा कमी आणि आरोप-प्रत्यारोप जास्त होत आहेत. याची सुरुवात एनडीएच्या बाजूनं झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः आपल्या भाषणात संविधानाबद्दल कमी आणि गांधी-नेहरू घराण्याबद्दल जास्त बोलले. संविधानानं काय मौलिक अधिकार दिले आहेत? त्याचे पालन होते का? संविधानाच्या सन्मानाचा प्रस्ताव करतानाच संविधानाचा अवमान करण्यात आला. न्यायपालिका, आमदार, कार्यपालिका, माध्यमदेखील दुर्बल झाले आहेत. हे कुणामुळे झाले? माध्यमांमध्ये सत्य दाखविण्याची हिंमत राहिली नाही. हे कुणामुळे झाले? हा संविधानाचा सन्मान आहे का? आणीबाणीतदेखील आंदोलन करता येत होते. तेव्हा लोकांमध्ये हिंमत होती. हे (भाजपाचे नेते) आणीबाणीत तुरुंगात गेले. साहित्यिकदेखील आणीबाणीविरोधात आंदोलनात होते. पण, आज जर कोणी आंदोलन केले तर ईडी, सीबीआय, प्राप्तिकर आणि नार्कोटिक्स घरी येईल. सध्या, संविधानाचा गळा घोटण्याचे काम सुरू आहे".
भाजपामध्ये संपूर्ण घराणेशाही- पुढे खासदार सावंत म्हणाले, " बाळासाहेब ठाकरे यांनी इंदिरा गांधींच्या आणीबाणीला पाठिंबा दिला. कारण, देशासह संरक्षण क्षेत्रातदेखील बंडखोरी होण्याची शक्यता होती. त्यामुळे देशासाठी शिवसेनेनं आणीबाणीला समर्थन दिले होते. भाजपामध्ये संपूर्ण घराणेशाही आहे. त्यामुळे त्यांनी घराणेशाहीबाबत न बोलले बरे आहे. ही घराणेशाही क्रिकेटपर्यंत गेली आहे. क्रिकेटची बॅट घेतली की माहित नाही, पण ते बीसीसीआयचे अध्यक्ष (जय शाह) झाले".
बाळासाहेबांनी आणीबाणीच्या काळात इंदिरा गांधींना पाठिंबा दिला : आणीबाणीच्या मुद्द्यावर बोलताना शिवसेनेचे (यूबीटी) खासदार सावंत म्हणाले की, "आणीबाणीत बोलण्याचा आणि आंदोलन करण्याचा अधिकार होता. जेपीचे (जयप्रकाश नारायण) यांचे आंदोलन झाले. त्याचवेळी सर्वांनी आंदोलन केलं. आज कोणाची बोलण्याची हिंमत नाही. एनडीए सरकार संविधान रद्द करण्यात आणि सोयीनुसार काम करण्यात सर्वात पुढे आहे. तरीही ते विरोधकांवर आरोप करत आहेत".
- डीएमसाठी संविधान हा धर्म असायला हवा : संभलमध्ये मंदिर शोधून त्यात पूजा करणाऱ्या डीएमच्या मुद्द्यावर ते म्हणाले की, "डीएम एखाद्या धर्माबद्दल बोलायला लावतात का? मंदिरात जाऊन पूजा करणं हे डीएमचं काम आहे का? डीएमसाठी संविधान हाच धर्म असावा." तसंच अशा प्रकरणांतूनच संविधान धोक्यात आल्याचंही खासदार सावंत म्हणाले.
हेही वाचा -
- संसदेचं हिवाळी अधिवेशन 2024 : "देशाच्या पहिल्या अंतरिम सरकारनं..."निर्मला सीतारामण यांची काँग्रेसवर टीका
- संसदेचं हिवाळी अधिवेशन 2024 : विरोधी पक्षातील नेत्यांनी संविधान खिशातच ठेवलं, तर भाजपानं . . . . राजनाथ सिंहांचा हल्लाबोल
- संसदेचं हिवाळी अधिवेशन 2024 : विरोधकांचा प्रचंड गदारोळ, राज्यसभा दिवसभरासाठी तहकूब, लोकसभेत विरोधक आक्रमक