मुंबई Shivsena Uddhav Thackeray vs Eknath Shinde : 2014 साली शिवसेनेनं भाजपासोबतची 25 वर्षांची युती संपुष्टात आली. यानंतर 2019 साली भाजपा आणि शिवसेनेनं एकत्र निवडणूक लढवली. पण सरकार स्थापनेच्या वेळी उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससोबत महाविकास आघाडी करून सरकार स्थापन केलं. कोरोना काळानंतर जून 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांनी बंड करत 40 आमदार आणि 13 खासदार घेऊन भाजपासोबत सरकार स्थापन केलं. शिवसेनेत अभूतपूर्व अशी मोठी फूट पडली. या दोन वर्षात काय घडलं? याचा मागोवा आपण घेणार आहोत.
बाळासाहेब ठाकरे यांनी प्रबोधनकार ठाकरे यांच्या साक्षीनं 19 जून 1966 रोजी शिवसेनेची स्थापना झाल्याचं शिवाजी पार्क मैदानात घोषित केलं. मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी आणि मराठी माणसाला एकत्र आणण्यासाठी 'शिवसेना' या संघटनेची स्थापना करण्यात आली. मराठी माणूस एकत्र येऊ लागल्यानंतर शिवसेना संघटना मोठी होऊ लागली. मुंबईतील खासगी कंपनी, सरकारी कंपनी, बँका या ठिकाणी मराठी माणूस नोकरीला कसा लागेल? यावर संघटनेनं भर दिला. 1995 साली शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांच्या रूपानं शिवसेनेचा पहिला मुख्यमंत्री झाला. स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा निवडणुका आणि लोकसभा निवडणुका असा शिवसेनेचा राजकीय प्रवास राहिला.
"आज शिवसेनेचा 58वा वर्धापन दिन आहे. या देशातील, महाराष्ट्रातील जनतेनं दाखवून दिलंय की, खरी शिवसेना कोणाची आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यामागं या देशातील तमाम शिवसैनिक, युवा, शेतकरी, कष्टकरी, वंचित ठामपणे उभे आहेत. म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा ध्वज या देशाच्या राजकारणात अभिमानानं फडकत आहे."- शिवसैनिक प्रवीण ताम्हणकर
"हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी 1966 रोजी शिवसेनेची स्थापना केली. काही लोकांना वाटतं की, शिवसेना त्यांची आहे. पण मी त्यांना सांगतो आम्ही कट्टर शिवसैनिक आहोत."- शिवसैनिक महेश गावणकर
शिंदेंचं बंड कोणत्या कारणामुळं? : 2019 मध्ये महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर 2020 जानेवारीमध्ये कोरोनाची महामारी आली. मार्च महिन्यात लॉकडाऊन लावण्यात आलं. त्या कालावधीत सर्व काही ठप्प होतं. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे फेसबुक लाईव्हवरून जनतेशी संवाद साधत होते. परंतु याच दरम्यान शिवसेनेतील एक गट नाराज असल्याचं दबक्या आवाजात बोललं जात होतं. महाविकास आघाडीमध्ये एकनाथ शिंदे हे नाराज आहेत, अशीही चर्चा त्यावेळी ऐकायला मिळत होती. आपल्या विचारसरणीच्या विरोधी लोकांसोबत आपण सरकारमध्ये आहोत. आपण यांच्यासोबत राहायला नको, असं एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंना सांगत होते. परंतु उद्धव ठाकरेंनी त्यांची दखल घेतली नाही. जून 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेनेत उभी फूट निर्माण झाली. उद्धव ठाकरे हे वेळ देत नव्हते, असा एकनाथ शिंदेंनी दावा केला. आमदारांवर वर्षा बंगल्यावर तासनतास थांबवून ठेवतात. आमदारांना निधी दिला जात नाही. शिवसेना पक्षाच्या आमदारांना उद्धव ठाकरे भेटत नाहीत, असा बंडखोर आमदारांनी फुटीनंतर दावा केला.
एकनाथ शिंदेंच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ : 40 आमदार आणि 13 खासदारांना घेऊन सुरुवातीला सुरत, गुवाहाटी, गोवा आणि मुंबई असा प्रवास करत शिंदे गटानं भाजपासोबत सरकार स्थापन केलं. यावेळी अनपेक्षितरित्या एकनाथ शिंदे यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ पडली. यामुळं सगळेच आश्चर्यचकित झाले. आपले हे बंड नसून, आपण उठाव केल्याचा दावा एकनाथ शिंदेंनी केला. " ज्या बाळासाहेबांनी आयुष्यभर काँग्रेसचा विरोध केला. त्याच काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसणं हे आपल्या तत्त्वात बसत नाही," असं एकनाथ शिंदेंनी बंडानंतर आपली भूमिका स्पष्ट केली. आजही बाळासाहेबांच्या विचारांची खरी शिवसेना ही आपल्यासोबतच असल्याचं शिंदे वारंवार सांगताहेत.
शिवसेना नाव आणि चिन्ह शिंदेंच्या शिवसेनेला : एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला मोठं भगदाड पाडलं. रोज नगरसेवक, पदाधिकारी आणि नेते हे उद्धव ठाकरेंना सोडून शिंदेंच्या गोटात जात होते. याच दरम्यान शिवसेना पक्ष आणि चिन्हावरदेखील शिंदेंच्या शिवसेनेनं दावा केला. या विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेनं कोर्टात धाव घेतली. खरी शिवसेना कोणाची? यावर अजूनही कोर्टात प्रकरण सुरू आहे. परंतु शिवसेना पक्षाचं नाव आणि 'धनुष्यबाण' चिन्ह हे निवडणूक आयोगानं शिंदेंच्या शिवसेनेला देण्याचा निर्णय घेतला. मात्र या निर्णयानंतर अनेक जुन्या शिवसैनिकांना दुःख झालं. कारण बाळासाहेबांनी रक्ताचं पाणी करून शिवसेना वाढवली. त्याच बाळासाहेबांच्या शिवसेना या पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह ठाकरे आडनावापासून वेगळं झालं. आता शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडं आहे. याच चिन्हावर त्यांनी लोकसभा निवडणूकदेखील लढवली आहे. खरी शिवसेना कोणाची? याबाबत सर्वोच्च न्यायालयात अजूनही प्रकरण सुरू आहे. ठाकरेंच्या शिवसेनेला 'उद्धव बाळासाहेब ठाकरे' असं नाव आणि 'मशाल' चिन्ह हे निवडणूक आयोगानं दिलं आहे. मशाल चिन्हावरच शिवसेना ठाकरे गटानं लोकसभा निवडणुकीत नऊ खासदार निवडून आणले आहेत.
खरी शिवसेना कोणाची? : नुकत्याच लोकसभा निवडणुका पार पडल्या आहेत. शिवसेना फुटीनंतर पहिल्यांदाच शिंदे गट आणि ठाकरे गट हे लोकसभा निवडणुकीला सामोरे गेले. शिवसेना शिंदे गटानं 15 जागा लढवल्या होत्या. त्यापैकी सात जागांवर त्यांना विजय मिळाला आहे. तर शिवसेना ठाकरे गटाकडून 21 जागा लढवल्या होत्या. यात त्यांचे 9 खासदार विजयी झाले आहेत. त्यामुळं खरी शिवसेना ठाकरेंची असल्याचा जनतेनं कौल दिल्याची प्रतिक्रिया शिवसैनिक देत आहेत. कारण, शिवसेनेचे सर्वाधिक नऊ खासदार निवडून आले आहेत. निवडणूक आयोग आणि कोर्टापेक्षा जनतेचा निर्णय आमच्यासाठी महत्त्वाचा असल्याचं शिवसेना ठाकरे गटाचे नेते सांगत आहेत. कट्टर शिवसैनिक ठाकरेंना सोडून कधीही कुठं जाणार नसल्याच्या शिवसैनिकांनी बोलक्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
दोन्हीकडून आरोप-प्रत्यारोप आणि टीका : शिवसेना फुटीनंतर या दोन वर्षात शिंदे गट आणि ठाकरे गट आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. आपल्या वडिलांनी स्थापन केलेला पक्ष शिंदे गटानं चोरून नेल्याची घणाघाती टीका उद्धव ठाकरेंनी केली होती. तर तुम्ही हिंदुत्व सोडलं आणि बाळासाहेबांचे विचार सोडले आहेत, असं प्रत्युत्तर एकनाथ शिंदेंनी दिलं होतं. ज्या काँग्रेसनं बाळासाहेबांवर टीका केली, त्याच काँग्रेससोबत सत्तेसाठी मांडीला मांडी लावून बसला आहात, अशी टीका शिंदे गटाकडून ठाकरे गटावर करण्यात आली. मागील दोन वर्षात राज्यातील महागाई, बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या, महिला अत्याचार, दुष्काळ आदी प्रश्नावरून ठाकरे गटाकडून शिंदे गटावर हल्लाबोल करण्यात येत आहे. परंतु याला शिंदे गटाकडूनही जशास तसं प्रत्युत्तर देण्यात येत आहे. त्यामुळं शिवसेना फुटीनंतर या दोन वर्षात दोन्ही गट आक्रमक होत एकमेकांचा समाचार घेताना दिसत आहेत.
- शिवसेना वर्धापन दिन दोन्ही गटांकडून साजरा करण्यात येत आहे. मात्र खरी शिवसेना कोणाची? हे प्रकरण कोर्टातच आहे. कट्टर आणि निष्ठावंत शिवसैनिकाची मात्र मोठी गोची होत आहे. खरी शिवसेना कोणाला म्हणायची? हाच एका कट्टर, निष्ठावंत आणि प्रामाणिक शिवसैनिकासमोर पडलेला प्रश्न आजही कायम आहे. उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे? कोणता झेंडा घेऊ हाती? अशी सामान्य शिवसैनिकाची अवस्था आहे.
हेही वाचा